For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘जमीन’ गमावलेल्यांनी केली पळता ‘भुई’ थोडी!

10:56 AM Mar 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘जमीन’ गमावलेल्यांनी केली पळता ‘भुई’ थोडी
Advertisement

हिडकल जलाशयात जमीन गेलेल्या शेतकऱ्यांचा मोर्चा : कार्यालयाला टाळे ठोकून अधिकाऱ्यांचा पोबारा

Advertisement

बेळगाव : हिडकल जलाशयामध्ये जमीन गमावलेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यात पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांकडून वारंवार टाळाटाळ केली जात आहे. 45 वर्षांचा कालावधी उलटत आला तरी जमीन गमावलेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यात आली नसल्याने हुक्केरी तालुक्यातील मास्तीहोळी गावासह परिसरातील नागरिकांनी पाटबंधारे खात्याच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढून आंदोलन हाती घेतले आहे. कार्यालयाच्या आवारात जनावरे बांधून आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आपली मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना कार्यालयाला टाळे लावून पोबारा करण्याची वेळ आली आहे. हुक्केरी तालुक्यातील मास्तीहोळी, गुडगनट्टी, बिरनहोळी आदी गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी हिडकल जलाशयासाठी संपादित करण्यात आल्या आहेत. जवळपास 2 हजार एकर जमीन संपादित करण्यात आली आहे. 45 वर्षांचा कालावधी उलटत आला तरी जमीन गमावलेल्या बिरनोळी, मास्तीहोळी आदी गावातील शेतकऱ्यांना भरपाई देण्यात आलेली नाही. संपादित करण्यात आलेल्या 2 हजार एकर जमिनीपैकी 394 एकर 26 गुंठे जमीन गमावलेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यात आलेली नाही. अनेकवेळा शेतकऱ्यांनी पाटबंधारे खात्याकडे पाठपुरावा केला असला तरी याची दखल घेण्यात आलेली नाही.

जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली पाटबंधारे खाते, जिल्हा प्रशासन व शेतकऱ्यांची दोन वेळा बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीमध्ये 28 फेब्रुवारी 2024 पर्यंत शेतकऱ्यांना न्याय देण्याचे आश्वासन पाटबंधारे खात्याकडून देण्यात आले होते. मात्र, याची पूर्तता करण्यात आलेली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी पाटबंधारे खात्याच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. तत्पूर्वी चन्नम्मा चौकात दोन तास आंदोलन केले. यानंतर क्लब रोडमार्गे पाटबंधारे खात्याच्या कार्यालयात जनावरे घुसवून आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी घेतलेली भूमिका पाहून कार्यालयातील अधिकाऱ्यांनी कार्यालयाच्या कक्षांना टाळे ठोकून पोबारा केला. पोलिसांकडून शेतकऱ्यांना अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, याला न जुमानता पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्यानुसार पोलिसांकडून शेतकऱ्यांची अडवणूक न करता आंदोलन करण्यास मार्ग मोकळा करून दिला. कार्यालयाच्या आवारामध्येच जनावरे बांधण्यात आली. तर शेतकऱ्यांनी चुली मांडून जेवण तयार केले. या आंदोलनात शेतकऱ्यांसह शेतकरी महिलांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. संतप्त शेतकऱ्यांकडून अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. अनेक वर्षांपासून एकाच कार्यालयात ठाण मांडून असणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली करण्यात यावी. गैरकारभार केलेल्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

Advertisement

चन्नम्मा चौकात दोन तास वाहतूक ठप्प

सरदार्स मैदानावर जमलेल्या शेतकऱ्यांकडून पाटबंधारे खात्याच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचे नियोजन केले होते. मात्र, शेतकऱ्यांना आंदोलन करण्यास पोलिसांकडून अडवणूक करण्यात आली. याला न जुमानता शेतकऱ्यांनी आंदोलन करणारच, अशी ठाम भूमिका घेतली. चन्नम्मा चौकात जवळपास दोन तास जनावरे घेऊन आंदोलन केल्याने वाहतूक व्यवस्थेवर याचा परिणाम झाला. चन्नम्मा चौकातून होणारी वाहतूक सदाशिवनगर व इतर भागातून वळविण्यात आली होती. यामुळे प्रवाशांना पायपीट करावी लागली. तर शालेय विद्यार्थ्यांनाही बस पकडण्यासाठी धावाधाव करावी लागली.

Advertisement
Tags :

.