महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अत्यंत जिवाभावाने माझी भक्ती करणाऱ्यांची अवगती होत नाही

06:39 AM Nov 13, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय एकोणतिसावा

Advertisement

भगवंत उद्धवाला म्हणाले, माझा वास सर्वांच्यात असल्याने, ज्याची चित्तशुद्धी झालेली आहे त्या भक्ताला समोर दिसणाऱ्या सर्व भूतात माझे दर्शन होते. त्यामुळे अत्यंत प्रीतीने तो त्यांच्याबरोबर व्यवहार करत असतो. असे केल्याने उद्धवा, त्याला चारही मुक्ती शरण येतात. सर्वत्र समदृष्टी ठेवणारे माझे भक्त आध्यात्मिक दृष्ट्या एव्हढ्या उच्च पातळीवर पोहोचलेले असतात की, त्यांना मुक्ती मिळवण्यासाठी वेगळी अशी कोणतीही खटपट करावी लागत नाही. आपला उद्धार व्हावा म्हणून जे मला अनन्य शरण येतील त्यांनी एक पथ्य म्हणून आजपर्यंत करत आलेल्या साधनेचा, उपासनेचा अभिमान सोडला पाहिजे. असे जे करतील त्यांना स्वरूपाची प्राप्ती करून द्यायचं काम माझ्याकडे लागलं म्हणून समज आणि मी ते निश्चितपणे पार पडतो. उद्धवा हा माझा शब्द आहे. काही भक्त, माझी भक्ती करण्याच्या बदल्यात माझ्याकडून त्यांना हवे असेल ते मिळावे अशी अपेक्षा ठेऊन माझी भक्ती करतात. अर्थात ते करत असलेली माझी भक्ती अनन्य असल्याने त्यांना हवे ते देऊन मी त्यांना यथावकाश मुक्त करतो. माझ्या अनन्य भक्तीची ताकदच अशी आहे की, ती करणारा माझा भक्त माझा अत्यंत लाडका असतो त्यामुळे तो कधीच अधोगतीला जात नाही. अशा वेळी माझं आणि भक्ताचं नातं आई आणि मुलाच्या नात्यासारखे असते. लहान मूल जेव्हा एखादी गोष्ट हवी म्हणून आईच्या पायावर लोळण घेऊन तिच्या पायाला मिठी घालते आणि तिला त्याचे म्हणणे मान्य करायला भाग पाडते. बालकाने असे केल्यावर वेळ पडल्यास जवळचे सर्व धन खर्च करून का होईना पण आई मुलाचा हट्ट पुरवते. त्याप्रमाणे जो माझी अनन्य भक्ती करतो आणि त्याबदल्यात माझ्याकडे ज्या ज्या इच्छा करतो त्या त्या मी पूर्ण करतो आणि नंतर त्यांना मुक्ती प्रदान करतो. ज्याप्रमाणे आईला कळवळून रडणाऱ्या मुलाची अवस्था बघवत नाही त्याप्रमाणे इच्छित वस्तू न मिळणाऱ्या अनन्य भक्तांची अवस्था मला बघवत नाही. त्यांना जे काही हवे असेल ते देण्याची शक्ती माझ्यात नाही असे थोडेच आहे? त्यात भक्तांचा कैवार घेणारा मी मी श्रीपती असल्याने त्यांना हवे असेल ते सर्व देतो त्यांच्या भक्तीला भुलून त्यांचे मनोरथ पूर्ण करत असताना त्यांची कधीही अधोगती होऊ देत नाही. अरे, लोकांच्या बाबतीत मी एव्हढा कनवाळू असतो की, मरताना एखाद्याच्या तोंडी योगायोगाने किंवा चुकून जरी माझे नाव आले तर तो राजा आहे का रंक आहे हे पहात न बसता मी त्याचाही उद्धार करतो. देवांचे हे वचन ऐकूनच दूरदृष्टीने माणसे मुलांची नावे राम, कृष्ण, हरि अशी कुठल्या ना कुठल्या देवाची ठेवतात. निदान शेवटी त्यांना हाक मारण्याच्या निमित्ताने का होईना, मरताना देवाचे नाव तोंडी यावे अशी त्यांची इच्छा असते. भगवंत पुढे म्हणाले, उद्धवा मी भक्तावर कृपा तर करतोच पण माझ्या कृपेमुळे भक्त एव्हढा सामर्थ्यवान होतो की, त्याने जर एखाद्याकडे नुसते बघितले तर तोही माझा अनन्य भक्त होतो. असा माझा सामर्थ्यशाली भक्ताची कधी अवगती होईल ही कल्पनाच मला सहन होण्यासारखी नाही. भक्तासाठी मी काय वाटेल ते करायला तयार असतो त्यांची यादी सांगायचीच झाली तर ती भली मोठी होईल. तरी पण त्यातले मुख्य मुख्य प्रसंग सांगतो. ऐक, गर्भवास सोसून मी अंबरीश राजाला महर्षी दुर्वासांच्या त्रासातून मुक्त केले, हिरण्यकश्यपूचा नाश करून प्रल्हादाचे रक्षण केले, हातात सुदर्शनचक्र घेऊन गर्भातल्या परीक्षिताचे रक्षण केले. अशाप्रकारे हर प्रयत्नाने मी भक्तांचे रक्षण करण्यास सज्ज असताना माझ्या भक्ताला मी अधोगतीला जाऊन देईनच कसा? उद्धवा, एखाद्या गवताच्या पात्याने जरी माझी भक्ती केली तर त्या पात्यासारख्या शुल्लक गोष्टीचाही मी उद्धार करतो मग अत्यंत जिवाभावाने जे माझी भक्ती करतात त्या माझ्या भक्तांची अवगती होणारच नाही.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article