For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘त्या’ विद्यार्थ्यांना बारावी उत्तीर्ण गृहित धरणार

11:12 AM Dec 19, 2023 IST | Tarun Bharat Portal
‘त्या’ विद्यार्थ्यांना बारावी उत्तीर्ण गृहित धरणार
Advertisement

दहावी नापास विद्यार्थ्याने आयटीआय केल्यास बारावी उत्तीर्ण गृहीत धरणार : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा

Advertisement

पर्वरी : दहावी नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी एक वर्ष आयटीआय प्रशिक्षण घेतल्यास दहावी तसेच दोन वर्षे आयटीआय प्रशिक्षण घेतल्यास बारावी उत्तीर्ण असे गृहीत धरले जाणार असून तो उमेदवार सरकारी नोकरीसाठी पात्र असेल. तसेच अशा विद्यार्थ्यांसाठी आयटीआय केंद्रात नवनवीन कोर्स सुरू करण्यात येणार आहेत. सरकारी नोकरीसाठी अप्रेंटिसशीप करणे यापुढे सक्तीचे राहील. अप्रेंटिसशीप केलेल्या उमेदवारालाच सरकारी नोकरीमध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. येथील गोवा शालान्त मंडळाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर त्यांच्या समवेत पर्यटनमंत्री रोहन खंवटे, साळगावचे आमदार केदार नाईक, समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, वास्कोचे आमदार दाजी साळकर, शिक्षण खात्याचे सचिव प्रसाद लोलयेकर, शिक्षण संचालक शैलेश झिंगडे, गोवा शालान्त मंडळाचे अध्यक्ष भागीरथ शेटये, उपाध्यक्ष ठाणेकर, पेन्ह दि फ्रांका पंचायतीचे सरपंच स्वप्नील चोडणकर व अन्य उपस्थित होते.

पदवी शिक्षणावेळी कोर्सची मुभा

Advertisement

गोवा शालान्त मंडळाने अनेक नवनवीन विषयांचा समावेश करून दहावी व बारावी परीक्षा देणाऱ्या मुलांचा ताण कमी केला आहे. त्यामुळे ते जास्त गुण मिळवू शकतात. तसेच राज्यात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सुरू केले असून टप्प्याटप्प्याने उच्च शैक्षणिक स्तरावर लागू करण्यात येणार आहे. एखाद्या विद्यार्थ्याला पदवीचे शिक्षण घेत असताना अन्य कोर्स करण्याची मुभा दिली आहे.

गोव्यातही बाह्या शिक्षणाची सुविधा

गोव्याबाहेरील बोगस शिक्षण संस्थांना नियंत्रणात आणण्यासाठी गोवा शालान्त मंडळ गोव्यात बाह्य शिक्षणाची सुविधा देणार आहे. यासाठी मंडळाने तालुकावार शाळा निश्चित करून ही सुविधा द्यावी असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी केले.

पर्वरीत नवनवे प्रकल्प : खंवटे

भाजप सरकारच्या काळात गोवा हे राज्य चौफेर प्रगती करीत असून त्याचा लाभ येथील जनतेला मिळत आहे. नवनवीन प्रकल्प पर्वरी मतदारसंघात येत आहेत ही माझ्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी केले. पर्ये येथील भूमिका हायस्कूलच्या मुलांनी सादर केलेल्या समई नृत्याने आणि हरमल पंचक्रोशी हायस्कूलच्या मुलांच्या स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरवात झाली. भगिरत शेटये यांनी स्वागत केले तर ठाणेकर यांनी आभार मानले. सुभाष जाण यांनी सूत्रसंचालन केले.

Advertisement
Tags :

.