For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

देवस्थानच्या भावना दुखावल्याने तणाव

01:26 PM May 20, 2024 IST | VISHAL_G
देवस्थानच्या भावना दुखावल्याने तणाव
Advertisement

फातर्पे श्री शांतादुर्गा देवस्थान, महाजनांना अपशब्द : श्रेया धारगळकर, नमिता फातर्पेकर यांना अटक : श्रेया धारगळकरने मागितली जाहीर माफी

Advertisement

प्रतिनिधी / मडगाव

फातर्पा येथील श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण संस्थान समिती व समस्त महाजनांची सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी कुंकळ्ळी पोलिसांनी श्रेया धारगळकर (रा. उत्तर गोवा) व नमिता फातर्पेकर (फातर्पा) या दोघांना काल अटक केली. श्रेया धारगळकर यांनी संस्थान समिती व महाजनांची जाहीर माफी मागितली. या प्रकरणातील अन्य एक संशयित अभिषेक नाईक याला काल रविवारी रात्री उशिरापर्यंत अटक झाली नव्हती.

Advertisement

सोशल मीडियावर श्रेया धारगळकर हिने व्हिडिओ जारी करून फातर्पा येथील श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण संस्थान समिती व समस्त महाजनांबद्दल अशोभनीय व अपमानजनक उद्गार काढले होते. हा व्हिडिओ फेसबुकवर व्हायरल झाल्याने त्याचे तीव्र पडसाद फातर्पा व कुंकळ्ळी परिसरात उमटले. काल रविवारी संस्थान समितीने श्रेया धारगळकर, नमिता फातर्पेकर व अभिषेक नाईक यांच्या विरोधात कुंकळ्ळी पोलिस स्थानकात तक्रार नोंद केली होती.

तक्रार नोंद केल्यानंतर या तिघांना संध्याकाळी 4 वाजेपर्यंत अटक करावी तसेच जाहीर माफी मागावी अन्यथा कुंकळ्ळीत राष्ट्रीय महामार्ग रोखून धरण्याचा इशारा श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण संस्थानाचे अध्यक्ष कवेंद्र देसाई व समितीच्या इतर पदाधिकाऱ्यांनी दिला होता. देवस्थान समिती व समस्त महाजनांनी घेतलेली आक्रमक भूमिका पाहून पोलिसांनी श्रेया धारगळकर व नमिता नाईक या दोघांना संध्याकाळपर्यंत अटक केली. त्यात श्रेया धारगळकर यांना मडगाव पोलिस स्थानकात ठेवण्यात आले.

मात्र, त्यांना कुंकळ्ळी पोलिस स्थानकावर आणले जात नसल्याने संतप्त महाजन व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. यावेळी काही जणांनी पोलिसस्थानकात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना रोखून धरले. नंतर श्रेया धारगळकर व नमिता फातर्पेकर यांना कुंकळ्ळी पोलिस स्थानकावर आणले गेले. यावेळी संतप्त महाजन व नागरिकांनी त्यांचा तीव्र शब्दात निषेध केला.

श्रेया धारगळकरने मागितली जाहीर माफी

सोशल मीडियावर संस्थान समिती व महाजनांची बदनामी करणाऱ्या श्रेया धारगळकर हिने कडक पोलिस बंदोबस्तात संतप्त संस्थान समिती, महाजन व नागरिकांची जाहीर माफी मागितली. त्यानंतरच संतप्त जमाव शांत झाला.

आपण त्यांना घाबरत नाही...

सोशल मीडियावर श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण संस्थान समिती व समस्त महाजनांची बदनामी केल्याने संस्थान समिती व महाजनांमध्ये संतापाची लाट उसळली होती. नाईक देसाई समाजाची ताकद दाखवून देऊ असा इशारा संस्थान समितीचे अध्यक्ष कवेंद्र देसाई यांनी दिला होता. पोलिसांनी संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन श्रेया धारगळकर व नमिता फातर्पेकर यांना अटक केली.

यावेळी पोलिस संरक्षणात असलेल्या श्रेया धारगळकर आपल्या मोबाईलवरून या तणावग्रस्त परिस्थितीचे चित्रिकरण करत होत्या. पोलिसांनी त्यांना चित्रिकरण करू नका, तसे केल्याने परिस्थिती आणखी बिघडणार असल्याचे सांगितले तरी आपण उपस्थित जमावाला घाबरत नसल्याचे विधान तिने केले. तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झालीय, याची किंचितही पर्वा श्रेया धारगळकर हिच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती. उलट संपूर्ण प्रकार ‘एन्जॉय’ करीत असल्याचे वाटत होते.

कुंकळ्ळी पोलिसांनी श्रेया धारगळकर व नमिता फातर्पेकर या दोघांना अटक केली तर या प्रकरणातील तिसरा संशयित अभिषेक नाईक याला काल उशिरापर्यंत अटक झाली नव्हती. त्याला अटक करण्यात येईल अशी माहिती कुंकळ्ळी पोलिसांनी दिली.

श्रेया धारगळकर हिने फातर्पा येथे येऊन नमिता फातर्पेकर हिच्या घरात बसून काही कागदोपत्रांचा उल्लेख करून कुंकळ्ळीतील श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण संस्थान समिती व महाजनांवर आरोप केले होते. तसेच फातर्पाच्या सरपंच शीतल नाईक यांच्यावरही आरोप करणारा व्हिडिओ फेसबुकच्या माध्यमांतून व्हायरल केला होता.

श्रेया धारगळकर हिला फातर्पा व कुंकळ्ळी गावचा इतिहास ठाऊक नाही. तिने तसेच नमिता फातर्पेकर यांनी केलेल्या आरोपात कोणतेच तथ्य नाही. विनाकारण संस्थान समिती व महाजनांची बदनामी केलेली आहे. असे प्रकार आम्ही कोणत्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही तसेच देवस्थानच्या जागेत ज्यांनी अतिक्रमण केलेले आहे. ती सर्व अतिक्रमणे हटविली जाणार असल्याची माहिती संस्थान समितीने दिली आहे.

पोलिसांनी अटक केलेल्या श्रेया धारगळकर व नमिता फातर्पेकर यांची काल उशिरा पर्यंत सुटका झाली नव्हती. त्यांची सुटका केल्यास पुन्हा तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी त्यांची सुटका न करण्याचा निर्णय घेतला होता.

Advertisement
Tags :

.