एकाच घरात स्वतंत्रपणे राहणाऱ्यांना आता स्वतंत्र घर, वीज पाणी जोडणी
गोवा सरकारचा महत्त्वाचा निर्णय
पणजी : एकाच घरात राहणाऱ्या परंतु स्वतंत्रपणे राहणाऱ्या कुटुंबांना आता स्वतंत्र घर तसेच वीज आणि पाणी जोडणे प्राप्त करून देण्याचा महत्त्वाचा निर्णय गोवा सरकारने घेतला असून या संदर्भातील अधिसूचना पालिका संचालनालयाने जारी केली आहे. या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा निर्णयामुळे नगरपालिका तसेच पणजी महापालिकेच्या क्षेत्रातील असंख्या कुटुंबीयांना त्याचा लाभ होणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विकसित गोवा हे उद्दिष्ट समोर ठेवून हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. विभक्त कुटुंबांना स्वतंत्रपणे आणि स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी हा निर्णय घेण्याची गरज पडली असल्याचे सांगितले.
कुटुंबे एकत्रित एकाच घरात राहतात खरी परंतु प्रत्येकाचा स्वतंत्र व्यवहार चालतो व एकाच ठिकाणी वीज आणि नळ जोडणी असल्यामुळे त्यांच्यासमोर बऱ्याचवेळा गंभीर प्रसंग निर्माण होतात यासाठीच सरकारने वरील निर्णय घेतला आहे. अनेक घरांमध्ये एकापेक्षा जास्त कुटुंबे राहतात त्यांच्या सोयीसाठी म्हणून हा निर्णय घेतला यामुळे आता कोणीही संबंधित पालिका क्षेत्रात राहणाऱ्यांनी आपल्या पालिकेकडे अर्ज केला तर त्याचा विचार होऊ शकतो. यासाठी मूळ मालकीच्या गुंतागुंतीची प्रमाणपत्रे व अन्य माहिती देण्याची गरज पडणार नाही. परंतु सह रहिवाशी असल्याचे काही पुरावे सादर केल्यानंतर संबंधितांना या योजनेचा लाभ दिला जाईल मात्र बेकायदेशीर बांधकामे असलेल्यांना या योजनेचा लाभ उठविता येणार नाही.