विविध मागण्यांसाठी विणकरांचे ठिय्या आंदोलन
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, अधिवेशनापूर्वी तोडगा काढण्याची मागणी
#social##social
राज्यभरात विणकाम करणाऱ्या विणकाम कामगारांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून विणकरांना सेवा, सुविधा देण्यासाठी सरकारकडे अनेकवेळा मागणी करण्यात आली आहे. मात्र त्याची पुर्तता करण्यात आलेली नाही. सुवर्णसौध येथे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी राज्य सरकारने विणकर संघटनेंच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन तोडगा काढावा, अन्यथा सुवर्णसौधवर भव्य मोर्चा काढून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राज्य विणकर सेवा संघातर्फे देण्यात आला आहे. याबाबत शिरस्तेदार नदाफ यांना निवेदन देण्यात आले.
राज्य विणकर सेवा संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर शनिवारी मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. शेवटचा शनिवार असल्याने सरकारी कार्यालयांना सुट्टी असतानाही विणकरांनी मोर्चा काढला होता. दरम्यान सेवेत असणाऱ्या शिरस्तेदार मौलाली नदाफ यांनी विणकरांच्या समस्या जाणून घेतल्या.
विणकर आर्थिक संकटात असून सरकारकडून सेवा, सुविधा देण्यात याव्यात यासाठी अनेकवेळा सरकारकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र याबाबत कोणताच ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे विणकरांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. यासाठी सरकारकडून ठोस उपाय योजना राबवाव्यात व न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. बांधकाम कामगारांप्रमाणे विणकरांना कामगार कार्ड वितरण करण्यात यावे, सहकारी संघ आणि राष्ट्रीयकृत बँकांमधील संपूर्ण कर्ज माफ करावे, कर्जबाजारीपणामुळे राज्यात 46 विणकरांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी तसेच त्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, परंपरागत विणकर काम करणाऱ्या विणकरांचे पाच ते सहा महिन्याचे वीज बिल सरकारनेच भरावे, केएसडीसी निगमच्या हातमाग कामगारांना व्यवसाय नसल्याने कर्जाखाली दबले जात आहेत. सदर निगमला पुनरूज्जीवन द्यावे, हातमाग कामगारांना कायम स्वरुपी रोजगार मिळावा, अशी व्यवस्था करावी, विणकर सन्मान योजनेंतर्गत वर्षाला 10 हजार रुपये वाढ देण्यात यावी आदी विविध मागण्यांची पुर्तता करण्याची मागणी करण्यात आली. हिवाळी अधिवेशनापूर्वी सरकारने विणकर संघांच्या प्रतिनिधींची बैठक घेवून मागण्यांवर तोडगा काढावा, अन्यथा अधिवेशन काळात सुवर्णसौधवर भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.