महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

यंदाचा गणेशोत्सव अन् गोमंतकीयांची व्यथा

06:24 AM Sep 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सध्या गोव्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. दीड दिवशीय, पाच दिवशीय गणेशोत्सवाची सांगता झालेली आहे. फोंडा तालुक्यातील आडपई गावातील पाच दिवसांची प्रसिद्ध गणपती विसर्जन मिरवणूकही काल थाटात पार पडली. आडपई गावात होणारी ही विसर्जन मिरवणूक केवळ फोंडा तालुकाच नव्हे तर संपूर्ण गोव्यात प्रसिद्ध आहे. भव्य चित्ररथ देखावे तयार करून त्यात विराजमान गणरायाला मिरवणुकीसह वाजत-गाजत निरोप देण्याची अनोखी परंपरा आडपई गावाने जपली आहे. यापुढे गोव्यात सात, नऊ, अनंत चतुर्दशी, अकरा, 21 दिवशीय गणेशोत्सव साजरा होणार आहे. एकंदरित संपूर्ण गोवा गणेशोत्सवात रंगून गेला आहे.

Advertisement

 

Advertisement

राज्यात पेडणेपासून काणकोणपर्यंत गणेशोत्सवाची धूम असते. गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या माटोळी सामानाचीही दरवर्षीप्रमाणे लाखोंची उलाढाल यंदा झाली आहे. काही गोमंतकीयांना यातून काहीशा प्रमाणात म्हणा, उत्पन्न लाभले.

गोव्यात सार्वजनिक गणेशोत्सवातही सध्या भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. गोव्यात आज काही गावे वगळता प्रत्येक गावात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्याच्यात आणखीनही वाढ होत आहे. लॉटरी, देणगी स्वरुपात मोठ्या प्रमाणात आर्थिक गंगाजळीही निर्माण होत आहेत. हा निधी सत्कारणी लागणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रामध्ये काही गणेशोत्सव मंडळे झालेल्या आर्थिक लाभातून शाळा दत्तक योजना, गरीब घटकांसाठी मदत, अन्नदान तसेच अन्य विविध समाजोपयोगी उपक्रम राबवित आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून गोव्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीदेखील पाऊले उचलणे आवश्यक ठरते. केवळ उत्सवापुरते, मनोरंजनात्मक कार्यक्रमापुरतेच सीमित न राहता मंडळाचे समाजोपयोगी उपक्रम वर्षभर चालू राहणे गरजेचे आहे. यातूनच समाज, पर्यायाने गोवा राज्य एका वेगळ्या दिशेने वाटचाल करील, अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही.

आज-काल होणाऱ्या सार्वजनिक गणेश उत्सवात केवळ मनोरंजनाचे कार्यक्रम न होता या व्यासपीठावरून वैचारिक समाजप्रबोधन होणे आवश्यक आहे. गणेश उत्सव हा केवळ मूर्तीपूजेचा भाग न मानता हा उत्सव माणसां-माणसांमधील आहे. प्रत्येकांनी इतरांमध्ये देवत्त्व पाहून आपापसातील मतभेद, वैयक्तिक हेवेदावे दूर सारून समाजाला उत्कर्षाच्या दिशेने नेण्यासाठी गणेशोत्सवाच्या निमित्ताने संकल्प करणे आवश्यक आहे.

गोव्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरुप बदलणे आवश्यक आहे. मंडळाचे कार्य धार्मिकतेकडून सामाजिक, शैक्षणिक, वैज्ञानिकतेकडे झुकणे आवश्यक आहे. रस्ता अपघात, चोरी प्रकरणे, विविध वाद, गुन्हेगारी यामुळे गोमंतकीय मेटाकुटीला आला आहे. खारेबांध-मडगाव येथील एका घरातील व्यक्ती चतुर्थीसाठी आपले घर बंद करून दुसरीकडे गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने लांबविण्याचा प्रकार घडला. अशा प्रकारांना आळा घालून गोमंतकीयांचे संरक्षण व गोमंतकीय कितपत सुरक्षित राहतील, याकडे सरकार लक्ष देईल काय, असा सवाल उपस्थित होत आहे. एकंदरित गणेशोत्सव मंडळाच्या कार्यक्रमातून सुदृढ समाज, आदर्श समाज घडणे आवश्यक आहे. त्याचबरोबर गणेशोत्सवात गोमंतकीयांना कुठलाही त्रास जाणवणार नाही, याची दक्षता संबंधित यंत्रणेने घेणे अत्यावश्यक आहे.

यंदा गोव्यात पावसाने कहरच माजविला आहे. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी थोडी उसंत घेऊन नंतर पुन्हा पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे गोमंतकीयांच्या आनंदावर थोडेफार विरजण पडले. अतिवृष्टीमुळे सध्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या ख•sमय रस्त्यातूनच गणेशमूर्ती निवासस्थानी नेताना गणेशभक्तांना मोठी कसरत करावी लागली. गणेश चतुर्थीपर्यंत रस्ते दुरुस्त करण्याचे लोकप्रतिनिधींचे आश्वासन फोल ठरले आहे. दर पावसाळ्यात ख•sमय रस्ते हे गोवा राज्याला निश्चितच शोभादायक नाही. एकीकडे पायाभूत साधनसुविधेमध्ये अव्वल म्हणून शेखी मिरविली जाते व दुसरीकडे अशाप्रकारे ख•sमय रस्ते जनतेच्या पाचवीला पूजले जातात, ही खरोखरच शोकांतिका आहे.

या ख•sमय रस्त्यातून वाट काढताना दुचाकीचालकांना कसरत करावी लागत आहे. यातून शरीरावरही परिणाम होत आहेत. दुचाकी, चारचाकी वाहने रस्त्यावरील ख•dयांत तसेच पाण्यात घातल्याने ती नादुरुस्त होण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे त्यांना आर्थिक नुकसानही सहन करावे लागत आहे. या ख•sमय रस्त्यांपासून गोमंतकीयांना कधी मुक्तता लाभेल, याची प्रतीक्षा आहे. नवीन रस्ता तयार करण्यापेक्षा ख•s रोखणे सध्या महत्त्वाचे आहे.

गोवा हे पर्यटन स्थळ आहे आणि त्याची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात पर्यटनावर अवलंबून आहे. गेल्यावर्षी 85 लाखांहून अधिक पर्यटकांनी गोव्याला भेट दिली. गोवा सरकारने पावसाळी पर्यटनालाही चांगले प्रोत्साहन दिले आहे. अनेक पर्यटक पावसाळ्यात गोव्यात येतात व मनमुराद आनंद लुटतात. बहुतेक रेंट-अ-बाईक किंवा रेंट-अ-कॅब वापरतात. राज्यातील ख•sमय रस्त्यांची अवस्था पाहून पर्यटनावरही त्याचा परिणाम होऊ शकतो.

प्रत्येक पावसाळ्यात रस्त्यांची अवस्था बिकट बनते. यंदा मात्र ती अधिक तीव्र आहे. या रस्त्यांची अशी परिस्थिती का होते? याचे कारण सार्वजनिक बांधकाम खाते, त्याचे कंत्राटदार आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी यांना निश्चितच माहीत आहे. निकृष्ट दर्जाच्या कामांसाठी केवळ ठेकेदाराला दोषी ठरविण्यात येते. निकृष्ट दर्जाचे काम आणि ख•sमय रस्त्यांबाबत रस्ते कंत्राटदारांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. निकृष्ट काम, निकृष्ट साहित्याचा वापर, नियोजनाचा अभाव, पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य व्यवस्था न करणे, पर्यवेक्षणाचा अभाव इत्यादी सर्व कारणांमुळे रस्त्यांची अवस्था बिकट होते. भूमिगत वाहिन्या घालताना  रस्ते खोदण्याचे प्रकार व त्याची योग्यप्रकारे नीगा न राखणे आदी बाबीही रस्त्यांच्या दुर्दशेला जबाबदार आहेत. यात केवळ ठेकेदार दोषी की यंत्रणा भ्रष्ट आहे, याचीही तपासणी होणे गरजेचे आहे.

स्मार्ट सिटीच्या कामांमुळे पणजीला दोन वर्षांहून अधिक काळ त्रास सहन करावा लागत आहे. यातून कधी त्यांची मुक्तता होते, हे पाहावे लागेल. गणेशोत्सव नजीक येऊन ठेपल्यानंतर राजधानी पणजीत अष्टमीची फेरी भरवली जाते. पावसामुळे या विक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला असून ‘मनपा’चे शुल्क कसे काय परवडेल, याबाबत त्यांना चिंता आहे.

राज्यात दीड, पाच दिवशीय गणेशाचे विसर्जन झाल्यानंतर अनेक मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या असल्याचे उघड झाले आहे. काही समुद्रकिनारी अनेक मूर्तींचे अवशेष दिसून आले असून पीओपी मूर्तींवरील बंदीची कार्यवाही झाली नसल्याचे समोर आले आहे. अशा मूर्ती गोव्यात येण्यापासून रोखण्यात सरकारला अपयश आले आहे, हे आता स्पष्ट होत आहे. यावर गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी सरकारवर कडाडून टीका केली आहे. गणेश उत्सव म्हणजे मातीचा उत्सव. जणू या उत्सवातून पर्यावरणाचे रक्षण करा, असा संदेश दिला जातो मात्र आज गोव्यात निसर्गाचा होणारा ऱ्हास बघून संकट आऽवासून उभे आहे. येथील डोंगरावर मोठ-मोठे प्रकल्प आणून डोंगर कापणी करून ऱ्हास होत आहे. याचे संरक्षण करण्याचा आज गणेशोत्सवाच्या माध्यमातून निर्धार करणे आवश्यक आहे.

राजेश परब

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article