आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू पृथ्वी जयदेव बर्वे हिला यंदाचा 'फर्ग्युसन गौरव' पुरस्कार
विटा प्रतिनिधी
विट्यातील प्रसिद्ध उद्योजक जयदेव बर्वे यांची कन्या आणि आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू पृथ्वी बर्वे हिला यंदाचा अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा 'फर्ग्युसन गौरव' पुरस्कार जाहीर झाला आहे. पुण्यात 'द फर्ग्युसनियन्स' या संस्थेच्यावतीने प्रतिवर्षी विविध क्षेत्रांतील नामांकितांना 'फर्ग्युसन गौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
यंदा माजी प्राध्यापक आणि सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, लष्करातील कामगिरीसाठी मेजर जनरल अशोक तासकर, मुंबई उच्च न्यायालया तील न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे, गायिका आर्या आंबेकर आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू पृथ्वी बर्वे यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. सेंद्रिय शेतीमध्ये सतत नवनवीन प्रयोग करणारे कृषितज्ञ आणि विट्याचे सुपुत्र जयंत तथा बाबा बर्वे यांची पृथ्वी ही नात, तर प्रसिद्ध उद्योजक जयदेव बर्वे आणि बरवा थेरेपी च्या निर्मात्या कामाक्षी बर्वे यांची ती मुलगी आहे.
पृथ्वीने आजवर अनेक वेळा आंतरराष्ट्रीय टेबलटेनिस, पॅरा चॅम्पियनशिपमध्ये सातत्याने भारताच्यावतीने प्रतिनिधित्व करून विजेतेपदही मिळविले आहे. एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, अॅड. विजय सावंत, प्रकाश रेणुसे यांच्या निवड समितीने या पुरस्कारांची घोषणा केली आहे. जानेवारी महिन्यात हा पुरस्कार सोहळा होणार आहे, अशी माहिती संस्थेचे सचिव राजेश जोशी यांनी दिली आहे. दरम्यान अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा 'फर्ग्युसन गौरव' पुरस्कार विट्याची सुकन्या पृथ्वी बर्वे हिला जाहीर झाल्याने विटा शहराच्या शिरपेचात मानाचा मानाचा तुरा खोवला आहे. जानेवारीत पुण्यात होणाऱ्या समारंभात पृथ्वी बर्वे हिला सन्मानपूर्वक हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.