दिग्गजांचे भवितव्य मशीनबंद, 70 टक्क्यांवर मतदान
शिराळ्यात उच्चांकी 78.80 टक्के मतदान : मिरज, जत, पलूस कडेगावमध्ये अनेक गावात रात्री उशिरापर्यंत रांगा : शनिवारी मतमोजणी
सांगली : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात आठही विधानसभा मतदार संघात चुरशीने सरासरी 70 टक्क्यांवर मतदान झाले. किरकोळ प्रकार वगळता सर्वत्र शांततेत मतदान झाले. जिल्हयातील अनेक गावात ग्रामपंचायतीप्रमाणे चुरशीने मतदान झाले. तर शिराळा विधानसभा मतदार संघात उच्चांकी 78.80 तर इस्लामपूर मतदार संघात 76 टक्के मतदान झाले. अनेक मतदारसंघात रात्री उशीरापर्यंत मतदारांनी रांगा लावल्या होत्या. शनिवार 23 रोजी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी होणार असून दिग्गजांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. मतदानाचा वाढलेला टक्का कोणाला तारणार आणि कोणाला फटका बसणार याची उत्सुकता लागली आहे.
बुधवारी सकाळी सात वाजता मतदानाला सुरूवात झाली. सकाळी नऊ ते दहा वाजेपर्यंत मतदानाला गती आली. पण त्यानंतर दुपारी तीन वाजेपर्यंत मतदारांची फारशी गर्दी नव्हती. द्राक्षबागांसह शेतीकामामुळे मतदारांची गर्दी कमी होती. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढण्यासंदर्भात कार्यकर्त्यांसह प्रशासनही साशंक होते. दुपारनंतर मात्र मतदारांची मतदान केंद्रावर मोठी गर्दी झाली. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अनेक मतदान केंद्रावर मोठया रांगा लागलेल्या दिसत होत्या. आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत सरासरी सुमारे 65 टक्के मतदान झाले होते.
परंतू सांगली, मिरजसह जत, पलूस कडेगाव, मतदार संघातील अनेक गावात रात्री उशीरापर्यंत मतदारांनी रांगा लावल्या होत्या. त्यामुळे आणखी चार ते पाच टक्के वाढ होऊन मतदानाचा टक्का सत्तरी पार करेल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. जिल्ह्यातील अनेक गावांत 75 टक्कयांपेक्षा जास्त मतदान झाल्याने मतदानाची टक्केवारी गत विधानसभा निवडणुकीपेक्षा आठ ते दहा टक्क्यांवर वाढण्याची शक्यता आहे. सांगली विधानसभा मतदार संघात आ. सुधीर गाडगीळ यांनी राजवाड्यात, तर पृथ्वीराज पाटील आणि जयश्री पाटील यांनी जलभवन मतदान केंद्रावर मतदान केले. या मतदार संघात सकाळी सात वाजल्यापासूनच चुरशीने मतदान सुरू होते.
पृथ्वीराज पाटील यांनी घेतले जयश्री पाटील यांचे आशीर्वाद
सांगली विधानसभा मतदार संघात काँग्रेस महाआघाडीची उमेदवारी पृथ्वीराज पाटील यांना मिळाल्यानंतर जयश्रीताई पाटील यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे या मतदार संघात चुरस निर्माण झाली आहे. पण एका मतदान केंद्रावर जयश्री पाटील आणि पृथ्वीराज पाटील आमने सामने आले. त्यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी जयश्री पाटील यांना वाकून नमस्कार करत आशिर्वाद घेतले. त्याची मतदान केंद्रावर त्याची चर्चा दिवसभर सुरू होती.
कुपवाडमध्ये बोगस मतदान झाल्याचा प्रकार
कुपवाडमध्ये आर.पी.पाटील विद्यालयात बोगस मतदान झाल्याचा प्रकार भाजपाच्या पदा†धकाऱ्यांनी उघडकीस आणला. नजरचुकीने प्रकार घडल्याने केंद्रावरील निवडणुक अधिकाऱ्यांची घटनेबाबत दिलगिरी व्यक्त केली. मिरज विधानसभा मतदार संघात बुधवारी सरासरी 65 टक्के मतदान झाले. गत विधानसभेच्या तुलनेत मतदानाचा टक्का 10 टक्क्यांनी वाढला. काही मतदान केंद्रांवर मशिद बंद पडल्याचा प्रकार घडला. शहरात बऱ्याच प्रभागात रांगा दिसून आल्या. खा. विशाल पाटील यांनी शहरासह ग्रामीण भागातील अनेक गावांना भेटी दिल्या.
जिल्ह्यासह राज्यात चर्चेत आलेल्या जत विधानसभा मतदारसंघात अतिशय चुरशीने सरासरी 70 टक्के मतदान झाले आहे. जत शहर आणि पांडोझरी येथील किरकोळ वादावादीचा प्रकार वगळता शांततेत मतदान झाले आहे. 2019 ला जतेत 64 टक्के मतदान झाले होते, यावेळी मात्र वाढलेले नव मतदार आणि निवडणुकीतील चुरस यामुळे मतांची टक्केवारी वाढली आहे. वाढलेल्या मतदानाचा टक्का कोणाला पावणार याचीच चर्चा सुरू झाली आहे. पलूस कडेगाव मतदार विधानसभा मतदार संघातील एकतर्फी वाटणारी निवडणूक शेवटच्या टप्यात रंगतदार झाली. पुणे, मुंबई, येथील मतदारांच्यासाठी खास सोय करण्यात आली होती. पलूस तालुक्यात उमेदवार आमदार डॉ. विश्वजीत कदम, शरद लाड, महेंद्र लाड, शिवाजीराव कदम, विश्वतेज देशमुख, पृथ्वीराज देशमुख यांनी मतदान केंद्रावर भेटी देवून आढावा घेतला.
कवठेमहांकाळ विधानसभा निवडणुकीसाठी कवठेमहांकाळ तालुक्यात चुरशीने मतदान झाले. किरकोळ वादावादी वगळता सर्वत्र शांततेने मतदान पार पडले. महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे उमेदवार रा†हत सुमन आर आर पाटील व महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्यामध्ये सामना झाल्याचे स्पष्टपणे मतदारांच्या रांगेतून होते. दुपारी एक दीडच्या दरम्यान मतदानाचा वेग वाढला. तीन नंतर मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर रांगेत उभे होते.
इस्लामपूर विधानभा मतदार संघात चुरशीने पण शांततेत सरासरी 76 टक्के इतके विक्रमी मतदान झाले. सकाळ पासूनच मतदानाची गती चांगली होती. दुपारी 3 वाजेपर्यंत सरासरी 54 टक्के तर पाच वाजेपर्यंत सरासरी 70 टक्के इतके मतदान झाले होते. मतदारांमध्ये उत्साह होता. बहुतांशी मतदान केंद्रावर सलग रांगा होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आणि निशिकांत भोसले-पाटील यांच्यात एकास एक लढत झाल्याने चरुस निर्माण झाली आहे. चुरस असलीतरी मतदार संघात किरकोळ वाद वगळता मतदान शांततेत झाले. खानापूर विधानसभा मतदारसंघात अंदाजे 70 टक्के मतदान झाले. दिवसभर मतदान करण्यासाठी खानापूर, आटपाडी तालुके आणि विसापूर सर्कलमधील गावातून उत्साह आणि चुरस जाणवत होती. काही गांवांतून तर रात्री उशीरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती.