यंदा साखर उत्पादनात होणार घट
अतिपावसाचा फटका : चिकोडी, कागवाड तालुक्यातील ऊसशेतीचे मोठे नुकसान, उसाची होणार पळवापळवी
बेळगाव : यंदा अपेक्षेपेक्षा अधिक पाऊस झाल्याने ऊस शेतीला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे साखर उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. शिवाय साखर कारखान्यांकडून उसाची पळवापळवीही पहावयास मिळणार आहे. राज्यात सर्वाधिक उसाचे क्षेत्र हे बेळगाव जिल्ह्यात आहे. मात्र अतिवृष्टीमुळे नदीकाठावरील ऊस पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे एकूण उसाचे उत्पादनही कमी होणार आहे. जिल्ह्यात 18 हून अधिक साखर कारखाने आहेत. मात्र त्यापैकी केवळ एक-दोन साखर कारखान्यांनी गळीत हंगामाला प्रारंभ केला आहे. अति पावसामुळे ऊस तोडणीत ही अडथळा निर्माण होऊ लागला आहे. शिवाय एफआरपीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू ठेवले आहे. शिवाय दरवर्षी बेळगाव जिल्ह्यात ऊस तोडणीसाठी महाराष्ट्रातील ऊसतोड मजूर दाखल होतात. मात्र यंदा महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे अद्याप ऊस तोडणी कामगार सीमाभागात दाखल झाले नाहीत. त्यामुळे यंदा ऊस तोडणीही काहीसी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
नदी काठावरील पिकांना फटका
सप्टेंबर महिन्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे शेतीकामे रेंगाळली होती. आता पावसाने काहीसी उसंत घेतल्यानंतर बळीराजा शेतीकामाकडे वळला आहे. मात्र एकदाच सुगी हंगामाची धांदल सुरू झाल्याने मजुरांचा तुटवडाही निर्माण होऊ लागला आहे. यंदा जुलै-ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीकाठावर पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे कागवाड, चिकोडी, अथणी, हुक्केरी, निपाणी, बेळगाव तालुक्यातील नदी काठावर असलेल्या पिकांना फटका बसला आहे. विशेषत: कागवाड, चिकोडी तालुक्यातील ऊस शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे उसाचे उत्पादनही कमी होणार आहे. दरवर्षी गळीत हंगामाला प्रारंभ झाला की, कारखान्यांकडून उसाची पळवापळवी केली जाते. त्यातच यंदा ऊस शेतीला फटका बसल्याने ऊस मिळविण्यासाठी कारखान्याचे धडपड पहावयास मिळणार आहे. विशेषत: सीमाभागातील ऊस महाराष्ट्रातील साखर कारखाने घेऊन जाण्यासाठी धडपड करतात.