यंदा काजूला 165 ते 170 रुपये प्रतिकिलो दर
गतवर्षीच्या तुलनेत समाधानकारक
प्रतिनिधी / बेळगाव
गरिबांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या काजूला यंदा 165 ते 170 रुपये प्रतिकिलो दर मिळू लागला आहे. त्यामुळे उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, अद्यापही दर वाढण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. गतवर्षी 150 रुपये प्रतिकिलो दर मिळाला होता. त्या तुलनेत यंदा 15 ते 20 रुपये वाढीव दर मिळत आहे.
विशेषत: बेळगाव आणि खानापूर तालुक्यात काजूचे क्षेत्र आहे. अलीकडे काजू बागायत क्षेत्रात वाढ झाल्याने एकूण उत्पादनातही वाढ झाली आहे. त्यामुळे उत्पादित काजू बियांना चांगला भाव मिळावा, अशी अपेक्षा उत्पादकांतून व्यक्त होत आहे. त्यानुसार यंदा आतापर्यंत 165 ते 170 रुपयेप्रमाणे दर झाला आहे. येत्या काळात पुन्हा दर वाढेल की कमी होईल, याबाबत शाश्वती नाही. मात्र, व्यापारी आणि विक्रेत्यांकडून काजू खरेदीला सुरुवात झाली आहे. विशेषत: चंदगड तालुक्यातील माणगाव, तुर्केवाडी आणि बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी आणि इतर काही गावांमध्ये काजू खरेदी केली जात आहे.
यंदा मध्यंतरी झालेल्या पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे उत्पादनात काही ठिकाणी मोठी घट झाली आहे. काही ठिकाणी काजू काळपट झाले आहेत. अशा काजूंनाही प्रतिकिलो दोन रुपये कमी दर मिळू लागला आहे. अलीकडे काजू फॅक्टरींची संख्या वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काजू विक्री करणेही सोयीस्कर होऊ लागले आहे. मात्र, शासनाकडून योग्य हमीभाव मिळत नसल्याने काजू विक्रेते आणि व्यापारी ठरवतील त्या दराला विक्री करण्याची वेळ आली आहे.
मागील पाच वर्षांतील यंदाचा काजूचा दर हा सर्वोच्च आहे. आतापर्यंत दीडशे रुपये प्रतिकिलो दराने विक्री झाली होती. मात्र, यंदा 165 ते 170 रुपये प्रतिकिलो दर झाला आहे. शिवाय यामध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.