For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मनपाकडून यंदा दुप्पट घरपट्टी आकारणीचे चलन

11:21 AM Apr 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
मनपाकडून यंदा दुप्पट घरपट्टी आकारणीचे चलन
Advertisement

ज्येष्ठ नागरिकांसह सर्वसामान्यांतून तीव्र संताप : योग्यप्रकारे घरपट्टी आकारण्याची मागणी

Advertisement

बेळगाव : महानगरपालिकेने आता घरपट्टी वसूल करण्यास सुरुवात केली आहे. घरपट्टी भरण्यासाठी चलन देण्यात येत आहे. मात्र काहीजणांची घरपट्टी दुप्पटीपेक्षाही अधिक वाढविल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत. गोवावेस येथील अॅड. रघुनाथ नागेश दळवी यांना दुप्पटपेक्षाही अधिक घरपट्टी वाढ झाल्याचे चलन देण्यात आले आहे. मागीलवर्षी 2120 रुपये घरपट्टी आकारण्यात आली. तर यावर्षी 4750 रुपयांचे चलन दिले आहे. अशाच प्रकारे आणखी काहीजणांना चलन देताना अधिक वाढ करून दिल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत. तेव्हा मनपाच्या महसूल विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे. एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात होते. घरपट्टीमध्ये काही प्रमाणात वाढ केली जाते. सर्वसाधारण 8 ते 10 टक्के वाढ केली जाते. मात्र अनेकांना दुप्पटपेक्षाही अधिक रक्कम वाढ केल्याबाबतचे चलन दिल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. अॅड. रघुनाथ दळवी यांनी घरपट्टी भरण्यासाठी चलन घेतले. पण घरपट्टीचा आकडा पाहता मागील वर्षापेक्षा दुप्पटहून अधिक होता. त्यामुळे त्यांनी याबाबत संबंधित चलन देणाऱ्या व्यक्तीला विचारले असता त्यांच्याकडून समर्पक उत्तर देण्यात आले नाही. घरपट्टीमध्ये वाढ झाल्याचे सांगण्यात आले. मात्र किती टक्के वाढ झाली आहे? याची संपूर्ण माहिती त्यांना दिली गेली नाही. काही तरी तांत्रिक चूक असेल, असे म्हणून संबंधित वकिलांनी घरपट्टी भरली नाही. याबाबत लवकरच महानगरपालिकेमध्ये जावून त्याची विचारणा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र अशाप्रकारे सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास होत आहे. तो थांबवावा, अशी मागणी होत आहे.

गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी

Advertisement

यावर्षी किती टक्के घरपट्टी वाढ झाली? याबाबत मनपाने योग्यप्रकारे खुलासा करणे गरजेचे आहे. अधिकाऱ्यांना विचारले असता उपनोंदणी कार्यालयाकडून आलेल्या मार्गसुचीनुसार घरपट्टी वाढविल्याचे सांगितले जात आहे. पण प्रत्यक्षात विभागवार किती टक्के वाढ झाली, हे देखील सांगणे महत्त्वाचे आहे. सर्वसाधारण 8 ते 10 टक्के घरपट्टी वाढ झाल्याचे सांगत आहेत. पण काहीजणांच्या घरपट्टीत अधिक वाढ झाली आहे. तेव्हा मनपा आयुक्तांनीच याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात येत  आहे.

Advertisement
Tags :

.