Vari Pandharichi 2025: यंदा तुकोबांचा पालखी रथ संस्थानची बैलजोडी ओढणार!
दरवर्षी तुकोबांच्या पादुका पंढरपूरला जाण्यासाठी पालखी रथात विराजमान होतात
पुणे : जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी बैलजोडीचा मान देण्याची वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा यंदापासून देहू संस्थानकडून खंडित केली आहे. त्याऐवजी या वर्षीपासून पालखी रथ संस्थानच्या मालकीचीच बैलजोडी ओढणार आहेत. त्याकरिता तीन नव्या बैलजोड्या खरेदी करण्यात आल्यात.
यात निपाणीजवळच्या आप्पाचीवाडी येथील बैलजोडीचाही समावेश आहे. दरवर्षी तुकोबांच्या पादुका पंढरपूरला जाण्यासाठी पालखी रथात विराजमान होतात आणि हा रथ ओढण्यासाठी पुणे जिह्यातून विविध बैलजोड्यांना हा मान दिला जातो.
परंतु यावषी देहू संस्थानने बाहेरून बैलजोडी न मागवता थेट संस्थानच्या मालकीची बैलजोडी खरेदी करून ती रथाला जुंपण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यामुळे यावषी बैलजोडीसाठी अर्ज मागविण्यात आले नाहीत. तर थेट पालखी रथ संस्थानच्या मालकीची बैलजोडी ओढणार आहे.
संत तुकोबांच्या पालखी सोहळ्यात एकूण तीन बैल जोड्या घेण्यात आल्या आहेत. यापैकी दोन रथाला व एक चौघड्याचे सारथ्य करतील. या तिन्ही बैलजोड्या वेगवेगळ्या ठिकाणच्या आहेत. यातील एक बैलजोडी ही निपाणीजवळील आप्पाचीवाडी येथील बाबूराव अर्जुन खोत यांच्याकडून घेण्यात आली आहे.
पालखी मार्गावर वृक्षारोपण
संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यादरम्यान रस्त्याने ठिकठिकाणी वृक्षारोपणाचा संकल्प करण्यात आला आहे. नवीन पालखी मार्ग हा मोठा झाल्याने त्या मार्गावर वारकऱ्यांना सावलीसाठी झाडे नाहीत. त्यामुळे ठिकठिकाणी वृक्षारोपण करून येणाऱ्या पुढील काही वर्षात याची मोठी डेरेदार झाडे होतील आणि वारकऱ्यांना भविष्यात सावली निर्माण होईल.