For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाकिस्तानच्या या गावाची स्वत:ची राज्यघटना

06:12 AM Nov 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
पाकिस्तानच्या या गावाची स्वत ची राज्यघटना
Advertisement

अत्यंत कठोर आहेत कायदे

Advertisement

प्रत्येक देशाची स्वत:ची राज्यघटना आणि नियम तसेच कायदे असतात. परंतु पाकिस्तानात असे एक गाव आहे, ज्यावर देशाची राज्यघटना लागू होत नाही. या गावाची स्वत:ची राज्यघटना आणि नियम-कायदे आहेत. हे गाव स्वत:ची अनोखी ओळख आणि कायद्यांसाठी ओळखले जाते. परंतु येथील नियम आणि कायदे अत्यंत कठोर आहेत आणि येथे राहणाऱ्या लोकांना त्याचे पालन करावे लागते.

गावाचा इतिहास अन् परंपरा

Advertisement

हे गाव शतकांपासून स्वत:च्या अनोख्या परंपरा आणि प्रथांचे पालन करत आले आहे. पाकिस्तानातील अंसार मीणा हे गाव पंजाब प्रांतात आहे. हे गाव स्वत:चे अनोखे प्रशासन आणि कठोर कायद्यांमुळे नेहमी चर्चेत राहेत. येथील लोक स्वत:च्या जीवनाच्या प्रत्येक पैलूला एका खास प्रकारच्या राज्यघटनेच्या अंतर्गत नियंत्रित करतात. ही राज्यघटना पूर्णपणे गावातील स्थानिक नेत्यांकडून तयार केली जाते आणि लागू करण्यात येते. येथे एक प्रकारचे स्वयंशासन असून राज्य किंवा सरकारचा येथे कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप चालत नाही.

गावातील लोक स्वत:च्या आर्थिक घडामोडी, सामाजिक संरचना आणि सांस्कृतिक परंपरांना स्थानिक राज्यघटनेनुसारच पार पाडतात. याचबरोबर गावात राहणारे लोक येथील कठोर कायद्यांचे पालन करतात, जे त्यांच्यासाठी सुरक्षा आणि शांततेचे प्रतीक आहे.

गावातील कायद्याचे स्वरुप

अंसार मीणा गावात ग्रामस्थांशी चर्चा करून सर्वांशी सल्लामसलत केल्यावर 20 सूत्री राज्यघटना लागू करण्यात आली आहे. यात हुंडा, हवाई गोळीबार, विद्यार्थ्याच्या स्मार्टफोन वापरावर बंदी घालण्यात आली आहे. याचबरोबर विवाहसोहळ्यांमधील खर्च कमी करण्यासाठी नियम लागू करण्यात आले आहेत. कुणाचा मृत्यू झाल्यावर काय करावे हे ठरविणारे नियमही लागू आहेत. गावातील लोक आनंदाने या नियमांचे पालन करतात.  या नियमांमुळे ग्रामस्थांची स्थिती सुधारेल, वायफळ खर्च बंद होतील असे त्यांचे मानणे आहे.

नियम अत्यंत खास

अंसार मीणा गावात लोक कुठल्याही विवाहात व्यवहारादाखल 100 रुपयांपेक्षा अधिक अहेर करू शकत नाहीत. याचबरोबर विवाहसोहळ्यांकरता तांदूळ वाटण्याची प्रथाही बंद करण्यात आली आहे. या गावात विवाहसोहळ्यातील भोजनाकरता लाखो रुपये खर्च करावे लागत नाहीत. पाहुण्यांचे स्वागत चहा आणि बिस्किट देऊन केले जाते. तेथील नव्या राज्यघटनेच्या अंतर्गत 14 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना दुचाकी चालविण्याची अनुमती नाही. तसेच विद्यार्थ्यांना मोबाइलचा वापर करता येत नाही. या गावात अनोळखींना प्रवेश करता येत नाही आणि अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यावर बहिष्कार टाकला जातो.

Advertisement
Tags :

.