याकडे लक्ष हवेच...
मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे ताणाचा योग्य पद्धतीने निचरा होणे आवश्यक आहे. ताण निर्माण होतो आहे याची जाणीवच नसेल तर तणावमुक्तीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रयत्न करता येणार नाहीत. तणावाचा जर योग्य वेळी निचरा झाला नाही तर तो कचरा मनाच्या एका कोपऱ्यामध्ये साठू लागतो आणि एक दिवस उग्र समस्येचे रुप धारण करतो. नंतर त्यातूनच ताणतणाव निर्माण करणारी ‘मनोवृत्ती’ निर्माण होते आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी ताण येऊ लागतो.
चिंता आणि ताण हे अगदी हातात हात घालून चालत असतात. गरज नसताना केलेली चिंता ताण निर्माण करते. आपल्या मनातील चिंता, दु:ख, राग या भावना मेंदूतील लिंबीक सिस्टीममधील भावनांशी संबंधीत मज्जापेशींच्या उत्तेजीत अवस्थेमुळे व ऑटोनॉमिक नर्व्हस सिस्टीमच्या उद्दीपनाने तयार होतात. मेंदूतील विशिष्ट रसायनेही याला कारणीभूत असतात. अतीव चिंता आणि ताणतणावांमध्ये नॉरएपिनेफ्राईन, एपिनेफ्राईन, डोपामाईन या न्यूरोट्रान्स्मीटरच्या पातळीत बदल होतात हे संशोधनातून सिद्ध झाले आहे. चिंता आणि ताणतणाव यांच्यामुळे शारिरीक, मानसिक, सामाजिक अशा तीनही पातळ्यांवर दुष्परिणाम होताना दिसतात.
खरंतर अगदी नैसर्गिकरीत्या आपल्याला सावध करण्याची प्रक्रिया घडत असते. उदा. समजा वाघ दिसला तर क्षणार्धात आपल्याला भीती वाटते. भीतीच्या भावनेमुळे आपल्या जाणिवा सावध होतात, विचारांचा वेग वाढतो, शरीरात काही रसायने पाझरतात ‘फाईट करणार की फ्लाईट’ हे ठरतं. त्यानुसार आपण तयार होतो. म्हणजेच भीती, चिंता, राग हे आपल्याला पळून जायचे, थांबायचे की लढायचे या निर्णयासाठी तयार करतात. हे इतक्या वेगाने घडतं की या सगळ्या प्रतिक्रिया आपोआपच उमटतात. त्यामुळे फाईट की फ्लाईट या मानसिक संघर्षात आपण सगळेचजण अनेकदा सापडत असतो. अगदी नैसर्गिकरीत्या! अर्थात आवश्यक त्या ठिकाणी हे घडणं योग्यच आहे.
परंतु या सगळ्याकडे आपले लक्ष नसेल वा जाणीवपूर्वक लक्ष दिले गेले नाही आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टीत सतत अशी प्रतिक्रिया दिली गेली तर मात्र सुरूवातीला म्हटल्याप्रमाणे सारेच अवघड होईल. तणावाच्या दिशेने प्रवास सुरू राहील. तणावाचा निचरा होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले गेले नाहीत तर त्यातून अधिक ताणतणाव निर्माण करणारी मनोवृत्तीही तयार होऊ शकते. मग नुसत्या कल्पनेनेही ताण निर्माण होऊ लागतो. ‘प्रतिक्रिया ते ताणाच्या दिशेने वाटचाल’ हा प्रवास जलदगतीने होतो. परंतु आपण सजग राहीलो तर अंध प्रतिक्रिया करण्याची भावनिक मेंदूची सवय आपल्याला बदलता येते. माईंडफुलनेस अर्थात सजगतेची तंत्र यासाठी खूप उपयुक्त ठरतात. ‘सजगता ध्यानाने’ सतत प्रतिक्रिया करण्याची सवय बदलता येते. त्याच्या नियमित सरावाने भावनांची जाण येते. त्यामुळे त्याची तीव्रता वाढण्यापूर्वीच योग्य प्रतिसाद निवडता येऊ लागतो. तणाव व्यवस्थापनासाठी माईंडफुलनेसचे हे टुल खूपच उपयुक्त ठरते. सजगता ध्यान म्हणजे काय ते कसे करायचे हे आपण बघणारच आहोत परंतु त्यापूर्वी ‘ध्यान’ म्हणजे काय हे समजून घेणे गरजेचे आहे. आपल्याकडे ध्यान हा शब्द आध्यात्मिक साधना, उपासना, मोक्षप्राप्ती इ. गोष्टींसोबत जोडला गेल्याने अनेकांना तो गूढ वाटतो. परंतु त्यात गूढ वाटावे असे काही नाही.
आपला मेंदू इतर प्राण्यांपेक्षा विकसीत असल्याने फक्त माणूसच ध्यानाची अवस्था अनुभवू शकतो. पहा हं, इतर प्राण्यांना परिसराचे भान उत्तम असते. कारण त्यांची इंद्रिये माणसाच्या इंद्रियांपेक्षा तीक्ष्ण असतात. आपण नेहमी म्हणतो ना. जरा खुट्ट झालं तरी कुत्रा, मांजर लगेच सावध होतात. ती यामुळेच.
परंतू मेंदूतज्ञांच्या मते निओ कॉर्टेक्स, प्री फ्रंटल कॉरटेक्स हा मेंदूचा पुढील भाग त्यांच्यामध्ये विकसीत झालेला नसतो. त्यामुळे त्यांना आत्मभान नसते. सोप्या भाषेत सांगायचे तर सर्व प्राणी जागरुक (Awarा)असतात परंतु त्यांना आत्मभान(एात्,ि!00045awarाहे) नसतो. ते वैशिष्ट्या मानवाकडे असल्यानेच तो स्वत:चे ध्येय ठरवून त्यानुसार वाटचाल करु शकतो, तसेच भविष्याचे नियोजन करु शकतो. आत्मभानामुळे आपण मनातील विचार भावना यांचे भान ठेवू शकतो. हेच भान जपणे किंवा जाणत राहणे हेच ध्यान! ‘एखादी कृती जाणीवपूर्वक करणे म्हणजे ध्यान असे म्हणता येईल.
पहा हं. आपण बोलताना एखाद्याला सांगतो. अमूक एखादे काम ध्यान देऊन कर..लक्षपूर्वक कर..म्हणजे काय तर जेव्हा आपण एखादी कृती ध्यान देऊन म्हणजेच लक्षपूर्वक करतो त्यावेळी ती यांत्रिकतेने होत नाही. नाहीतर बऱ्याच गोष्टी, कृती आपण यांत्रिकतेने करत असतो. उदा. आंघोळ, दात घासणे, जेवणे, अगदी गाडी चालवतानाही काहीवेळा तसे होते. म्हणजे आपण हाताने ती कृती करतो परंतु मन तिथे नसते ते विचारांमागे पळत असते.
कोणतीही गोष्ट आपण पहिल्यांदा करायला शिकतो तेव्हा ती लक्षपूर्वक करतो. आपला मेंदू त्यामध्ये गुंतलेला असतो. उदा. सुरुवातीला गाडी शिकताना आपले सगळे लक्ष तिथेच असते. पुढे सराव झाल्यानंतर मेंदू ते काम आपल्या सहकाऱ्यांकडे डेलीगेट करतो, अर्थात मज्जारज्जूकडे सोपवतो. कारण विचार करणे हे मानवी मेंदूचे अधिक महत्त्वाचे काम आहे. ती कृती सरावाची झाल्यावर तसे केले गेले नाही तर आपण नवीन कोणतीही गोष्ट शिकू शकणार नाही. त्यामुळे ते नैसर्गिक रीतीने घडत असते. म्हणजेच कृतीची सवय झाली की ती यांत्रिकतेने घडू लागते. त्यामुळे अनेकदा कृती सुरु राहते आणि मन मात्र भूतकाळ, भविष्य यातच पळत राहते.
त्यामुळे मानसिक दमणूक तर होतेच आणि काही वेळा विचार आणि वास्तव यातले भान राहत नाही. जाणीवपूर्वक लक्ष देण्याने अर्थात ध्यानाने विचारांच्या प्रवाहात वाहणे थांबते.
ज्यावेळी कोणतीही भावनिक प्रतिक्रिया येत असते तेव्हा आपला भावनिक मेंदू काम करत असतो. सतत अशा प्रतिक्रिया करत रहाण्याच्या सवयीमुळे राग, चिंता, नैराश्य अशा विघातक भावनांची वारंवारता वाढत जाते. हळूहळू या भावना तीव्र होऊ लागतात. भावनिक मेंदूतील हा भाग खूप उत्तेजित होतो आणि आपल्या वैचारिक मेंदूला काम करण्याची संधी मिळतच नाही. त्यामुळे अंध प्रतिक्रिया आणि बेभान कृती घडतात.
ध्यानामुळे हे बदलता येते. सततच्या विचारांच्या गर्दीत वाहत जायची मेंदूची सवयही आपल्याला बदलता येते. बऱ्याचदा अतीविचार करण्याच्या सवयीमुळेच तणाव निर्माण होतात. तणाव व्यवस्थापनाच्या दृष्टीने सजगता ध्यानाचे तंत्र खूपच उपयुक्त ठरते. सजगता ध्यान म्हणजे माझे शरीर आणि मन यांच्याप्रती साक्षीभाव वाढवायचा. शरीरातील संवेदना, मनातील भावना साक्षीभावाने पाहायच्या, पण याचा अर्थ जबाबदारी नाकारायची आणि आनंदाचा, सुखाचा त्याग करायचा असे नाही. तर ज्यावेळी एखादी परिस्थिती, गोष्ट बदलता येत असेल त्यावेळी ती कर्ता होऊन ती बदलायची, आनंददायी गोष्टीचा आनंद ‘भोक्ता’ होऊन घ्यायचा आणि ज्या गोष्टी वा परिस्थिती आपल्या अवाक्याबाहेरची आहे त्यावेळी पॅनिक न होता ‘साक्षी’ होण्याचा प्रयत्न करायचा. नियमित सरावाने हे शक्य होते. परंतु यासाठी सराव मात्र आवश्यक हे अगदी खरे. असा सराव नियमितपणे केला तर बऱ्याच गोष्टी सोप्या होतील हे मात्र निश्चीत!!
- अॅड. सुमेधा संजिव देसाई