असे आले ऋतू....
दिवस रात्र बनल्यावरती दिवसाचे बारा बारा तास असे विभाजन झाले. चंद्र सूर्याला काम मिळालं आणि एकमेकांच्या मागे फिरणं कायमचं सुरू झालं. आता देवाने चंद्राच्या प्रदेशातील थंडी म्हणजे हिवाळा ऋतुला बोलावून पृथ्वीवरती प्रदक्षिणा करून यायला सांगितलं. त्याला आपणच जगात श्रेष्ठ असल्यासारखं वाटलं. अभिमानाने छाती फुलून आली. तो थेट पूर्वेकडच्या लोकांच्या भेटीला मुद्दामच गेला. त्या लोकांनी त्याचं मनापासून स्वागत केलं, त्याला ठेवून घेतलं, त्याला हवं नको विचारलं. त्याचं कोडकौतुक केलं. आता तर काय त्याचा अहंकार खूपच वाढला. जगामध्ये फक्त थंडीच लोकांना आवडते असं चित्र उभारलं. जगातील हुशार माणसं, गोऱ्या कातडीची माणसं आपल्याला सर्वोच्च मान देत आहेत हे त्याच्या अगदी मनावरती कोरलं गेलं. हळूहळू थंडी वाढायला लागली. बर्फ पडायला लागला तसतशी तिथले लोक घराच्या आतमध्येच कोंडून राहू लागले किंवा जमिनीखाली जाऊन राहायला लागले. काही लोकांनी तर हा थंड प्रांत सोडूनच दिला आणि दुसऱ्या देशात राहायला गेले. आता सगळ्यांना थंडीचा राग येऊ लागला. कोणीही थंडीचं कौतुक करेना. तिच्याशी नीट बोलेना. प्रत्येकजण कुठे उब मिळते का हे बघण्यासाठी हळूहळू त्या प्रांतापासून दुसऱ्या प्रांताकडे गेला. माणसंच काय पण पक्षी प्राणीसुद्धा उष्णकटिबंधातल्या प्रदेशामध्ये जाऊन राहू लागले. तिथेच आपल्या पिल्लांना जन्म देऊ लागले, वाढवू लागले. हे सगळं पाहून हिवाळा ऋतू अगदी हिरमुसला. त्याचे गाल रुसले. नाकाचा शेंडा लाल लाल झाला. देवबाप्पाने त्याची समजूत काढली आणि त्याच्या मदतीला उन्हाळा ऋतू पाठवला. उन्हाळ्यालादेखील पृथ्वीची प्रदक्षिणा करून यायला मुद्दामच सांगितलं पण त्याला हिवाळ्याची गंमत कळल्यामुळे तो मनातल्या मनात शांत होता. उन्हाळा आल्यानंतर सगळ्या लोकांनी त्याचं आनंदाने स्वागत केलं. अनेक लोक मुद्दाम सुट्ट्या घेऊन बाहेर फिरू लागले. लोकांना उन्हाला कुठे ठेवू, कुठे नको असं होऊन गेलं. लोक फिरायला लागले. शेतामध्ये छान छान पिकं घेऊ लागले. आता हिवाळा ऋतुने आपलं आवरलं आणि पुढच्या भागात जायचं ठरवलं. पुढे कसे स्वागत करतात, कोणास ठाऊक पण इकडे मात्र वेगळीच गोष्ट घडली. अति थंडीत राहणाऱ्या लोकांना उन्हाळा काही फार सोसवेना. उन्हाने त्यांचा जीव कासाविस झाला. पाण्याचे झरे आटायला लागले आणि झाडं सुकल्यामुळे झाडांखाली प्राण्यांना देखील आसरा मिळेनासा झाला. लोकांना काम धंद्याला बाहेर पडता येईना. आता सगळेजण उन्हाळ्याचा रागराग करू लागले. झालं, काय करावं उन्हाळ्यालाही नेमके कळेना. मनातल्या मनात आनंदी असलेला उन्हाळा आता मात्र अगदी उदास झाला होता. ही गोष्ट कळली आणि त्यांनी त्याच्या मदतीला पावसाळा पाठवला. उन्हाचे चटके सहन केल्यानंतर जेव्हा पावसाचा शिडकावा आला, तेव्हा सगळे लोक आनंदाने नाचू लागले. पावसामध्ये लहान मुलं होड्या सोडू लागले. खेळू लागले. बेडूक सुद्धा किडे मिळतील म्हणून आनंदाने उड्या मारत होते. अनेक प्राणी पक्षी पावसामध्ये चिंब भिजू लागले पण दोन-चार दिवसांनी मात्र जोरदार पडणारा पाऊस सगळीकडे पूर आणू लागला. लोकांची घरं किंवा पत्रे उडायला लागले आणि लोकांना जगणं मुश्कील होऊन बसलं. आता मात्र देवाने डोक्याला हात लावला. या तिघांनाही एकत्र पाठवण्यात अर्थ नाही, असं देवाच्या लक्षात आलं आणि मग देवांनी या तीनही ऋतूंचे सहा भाग केले. त्यांच्या जोडीला वाऱ्याला पाठवलं आणि हे सहा ऋतू पश्चिम भागाच्या देशांमध्ये दिसू लागले. वसंत, शरद, हेमंत, ग्रीष्म, वर्षा आणि शिशिर असे हे सहा ऋतू तयार झाल्यानंतर मग मात्र लोकांना या तीनही ऋतूंचे महत्त्व कळले. या तीनही ऋतूंना सहा भागांमध्ये स्वीकारताना लोक अगदी आनंदीत होऊन जायचे. आलेल्या ऋतूचे स्वागत करायचे. जाणाऱ्या ऋतूला नमस्कार करायचे आणि पुन्हा येण्याचं प्रत्येकाला निमंत्रण द्यायचे. अशा प्रकारे सर्वत्र हे सहाही ऋतू सुरू झाले पण थंड प्रदेशात मात्र काही ऋतूंना अजिबातच जागा मिळाली नाही आणि शेवटी त्यांना थंडी वारा आणि पाऊस यांना घेऊनच राहायला लागलं. आपण आजही बघतो, अनेक प्रांतांमध्ये ह्या दोन ऋतूंमुळे बर्फ साठत थंडी जास्त होते आणि मध्येच केव्हातरी पाऊस पडतो आणि थंडगार वारे जगणं नको करतात. तरीही सहा ऋतूंचे सहा सोहळे आम्हाला आमच्या भारतात अनुभवायला मिळतात. म्हणून आम्ही स्वत:ला खूप भाग्यवान समजतो.