बॅगा तपासणी आणि व्हिडिओ
या या या, तपासा माझ्या बॅगा, तुमचे नाव काय, ओळखपत्र बघू, मोदीची बॅग तपासली का? मोदी शहांच्या बॅगा जाताना तपासा’ असा त्रागा उबाठा सेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे करत आहेत. मागे विमान आहे असा एक व्हिडिओ आणि उध्दव ठाकरे यांची पाठोपाठ दोन दिवस झालेली बॅग तपासणी हे माध्यमात गाजते आहे. ठाकरे हे फोटोग्राफरही आहेत, त्यांनीच हा व्हिडिओ शुट केला आहे आणि तो माध्यमातून दाखवून ते सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. केंद्रिय यंत्रणांवर अविश्वास दाखवायचा, त्यांच्यावर टीका करायची आणि सहानुभूती मिळवायची, असेच या त्राग्याचे वर्णन करावे लागेल. मतदार तितका शहाणा आहे. तो माध्यमे बघतो तशी नेत्यांनी निवडणूक अर्ज भरताना जाहीर केलेली संपत्ती आणि राज्यात विविध भागात वाहन तपासणीत जप्त केलेली कोट्यावधीची रोकडही बघतो आहे. निवडणूक आयोग ही स्वतंत्र स्वायत्त यंत्रणा आहे. त्यांना कायद्याने, घटनेने अधिकार दिले आहेत. कोणाच्या बॅगा तपासाव्यात हा त्यांचा अधिकार आहे. त्यांच्यावर दबाव टाकणे, त्यांचे शुटिंग करुन ते समाजमाध्यमांवर दाखवणे हे सर्वस्वी अयोग्य आहे. अशा करणीतून सहानुभूती मिळवणे आणि आपल्या बॅगा पुन्हा तपासू नयेत यासाठी दबाव निर्माण करणे असा स्पष्ट हेतू दिसतो. शरद पवार यांनीही उद्धव ठाकरे यांची री ओढत विरोधकांना त्रास देतात असा राग आळवला आहे. निवडणूक म्हटले की हे सारे होतेच. पण राज्यात निवडणूक प्रचार अंतिम टप्प्याकडे जात असताना प्रत्येक मतदारसंघात काय सुरु आहे हे जनतेला दिसते आहे. टी. एन. शेषन यांच्यासारखा निवडणूक आयोग अधिकारी म्हणून असता तर आज काय चित्र दिसले असते असा विचार अनेकांच्या मनात येऊन गेला आहे. शेषन यांनी निवडणूक निकोप, नियमात आणि निर्भय वातावरणात कशी घ्यावी याचा वस्तूपाठच घालून दिला होता. हा माणूस दिल्लीत बसून देशातील कानाकोपऱ्यातील हातभट्टी, वडाप, गुंडगिरी, लक्ष्मी दर्शन सारे बंद पाडायचा कुणाची ब्र काढायची हिम्मत होत नसे. आता ते दिवस राहिले नाहीत. निवडणूक आयोगाच्या कारभारावर संशय घेऊन तपासणी यंत्रणांवर दबाव टाकायचा प्रयत्न होताना दिसतो आहे. लोकशाहीच्या दृष्टीने हे फारसे हितकारक व शोभादायक नाही. यंत्रणांना त्यांच्या कार्यपद्धतीप्रमाणे काम करु द्यावे त्यात हस्तक्षेप करु नये, दबाव टाकू नये यातच लोकशाहीचे भले आहे. कुणी अवैध रोकड वाहतूक करत असेल किंवा कुणाच्या महालात किंवा वाहनात अवैध संपती ठेवली आहे अशी खात्रीशीर खबर असली तर ती संबंधित यंत्रणेला द्यावी. म्हणजे धनदांडग्या मंडळींच्या कारवायांना चाप बसेल. अवैध संपत्ती सरकारी तिजोरीत जमा होईल पण असे न होता सहानुभूती आणि दबाव टाकण्याचा प्रयत्न केविलवाणा म्हटला पाहिजे. या व्हिडिओनंतर उलट सुलट प्रतिक्रिया उमटल्या, उमटत आहेत पण निवडणूक आयोगाने दबावाखाली न जाता आपले काम सुरू ठेवले आहे, ठाकरे यांच्या बॅगा दुसऱ्या दिवशीही तपासण्यात आल्या आहेत तसेच अन्य नेते व संशयित यांचीही तपासणी सुरु आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत चेक नाक्यावर केलेल्या तपासणीत सापडलेल्या रकमेची बेरीज बघितली की कुणालाही चक्कर यावी अशी भली मोठी बेरीज आहे. हा आकडा आपल्या लोकशाहीचा खरा चेहरा आहे. जगातील सर्वात मोठी, जुनी आणि रुजलेली लोकशाही म्हणून भारतीय लोकशाहीचा गौरव होतो पण अंतरंग तपासले की शहारे येतात. निवडणूक हे युद्ध असते आणि युद्धात साम, दाम, दंड, भेद ही सर्व आयुधे वापरली जातात. आणि दाम करी काम हे सुत्र असल्याने पैशाचा वापर मोठा होतो, हे छुपे सत्य आहे. देशातील प्रत्येक माणसाला जी गोष्ट माहीत आहे, ती गोष्ट सरकारी यंत्रणांना दिसत कशी नाही हाच खरा प्रश्न आहे. जर असा नियम केला की अवैध रक्कम कोठे आहे, कोण वाहतूक करत आहे अशी नेमकी टीप दिली तर टीप देणाऱ्या आणि रक्कम पकडणाऱ्या सरकारी यंत्रणेला त्यातील 10 टक्के रक्कम भेट मिळणार. जप्त रक्कम निवडणूक आयोग, कर्मचारी आणि लोकशाही बळकट करायला वापरणार तर खूप रक्कम सापडेल. नेते व नातेवाईक यांच्या घराची तळघरे, शौचालये आणि फ्लोअर मागचे चोरकप्पे जगजाहीर होतील. लक्ष्मी दर्शन हा निवडणुकीचा प्रमुख भाग होत आहे, हे वास्तव मान्य करुन शेषनसारखे पाच पंचवीस अधिकारी निर्माण होतील असे प्रयत्न केले पाहिजेत. बॅगा तपासणी हा निवडणूक यंत्रणेचा नियमित भाग आहे. ते सर्वांच्या बॅगा तपासतात हे समजून घेतले पाहिजे. त्यांनी ठरवले तर ते जागाही तपासतील. तेव्हा मोठा दणका ठरेल. शेषनचा वारस अवतरला असे लोक म्हणतील आणि सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून सत्ता हा खेळ रोखला जाईल. तूर्त बॅगा तपासणी हे रुटीन आहे आणि सहानुभूती मिळवणे हा स्वभाव आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. निवडणूक काळात आणि नंतरही सुरक्षा हा महत्त्वाचा आणि अनिवार्य विषय असतो. सुरक्षेचे नियम सर्वांनी पाळले पाहिजेत, निवडणूक काळात सुरक्षेकडे दुर्लक्ष झाल्याने आपण राजीव गांधींना गमावून बसलो, हे कुणीही विसरता कामा नये. सुरक्षा यंत्रणेने केलेले नियम हे चॅलेंज करायचे नसतात. त्याचे पालन करायचे असते. मला सगळे ओळखतात, मी अमूक आहे मला पास, परवानगी लागत नाही, असे कुणीही म्हणू नये. आपले सर्व नेते, मंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती हे सुरक्षित राहिले पाहिजेत. त्यासाठीच्या यंत्रणेत कोणतीही ढिलाई वा तडजोड असता किंवा होता कामा नये हे पण लक्षात घेतले पाहिजे. पण टीका टिपणी करताना कोणताही संयम न ठेवता यंत्रणांना सरसकट लक्ष करणे योग्य नाही. राजकारणाचा स्तर घसरतो आहे तो सावरणे, लोकशाहीची मूल्ये बळकट करणे यातच देशहित आहे