गुंतवणुकीसाठी उद्योगांना हीच योग्य वेळ
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन : ‘इन्व्हेस्ट गोवा’ परिषदेत गोव्यावर सखोल चर्चा,देशातील उद्योगांशी गोव्याचे सामंजस्य करार
पणजी : गोवा राज्य हे आता केवळ पर्यटनक्षेत्रावर अवलंबून राहिलेले नाही. त्यामुळे उद्योजकांनी केवळ पर्यटनस्थळ म्हणून न पाहता आपल्या उद्योगांसाठी येथे गुंतवणूक करण्यासाठी पुढे येऊन संधीचे सोने करून घ्यावे. कारण गोव्यात आता समुद्र किनाऱ्यांपलिकडेही खूप काही आहे. राज्याचा औद्योगिक विकास झपाट्याने होत आहे. त्यामुळे देशातील मोठ्या उद्योजकांना गोवा राज्यात गुंतवणूक करण्यासाठी योग्य वेळ असून त्यांनी गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. दोनापावला येथील पंचतारांकीत हॉटेलमध्ये भारतीय उद्योग महासंघाच्या सहकार्याने काल सोमवारी घेण्यात आलेल्या ‘इन्व्हेस्ट गोवा 2024’ या परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, उद्योगमंत्री माविन गुदिन्हो, गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, टीव्हीएस सप्लाय चेन सोल्युशन लि. चे अध्यक्ष आर. दिनेश, भारतीय उद्योग महासंघाचे संचालक चंद्रजित बॅनर्जी, रसना इंटरनॅशनल लि. चे माजी अध्यक्ष पीऊझ खंबाट्टा, नेदरलँडचे उपमहावाणिज्य राजदूत थेअरी व्हॅन हेल्डन, भारतीय उद्योग महासंघाच्या उपाध्यक्ष तथा व्ही. एम. साळगावकर अॅण्ड ब्रदर्स प्रा. लि., कंपनीच्या अध्यक्षा स्वाती साळगावकर, डब्ल्यूईएफ इंडियाचे पुऊषोत्तम चंद्रा कौशिक, डिलाईट इंडियाचे पार्टनर सतीश गोपलिपा, टीव्हीएस इंडस्ट्रीज अॅण्ड लॉजिस्टिक पार्कचे प्रमुख रामनाथ एस., धेंपो ग्रुप ऑफ कंपनीचे चेअरमन श्रीनिवास व्ही. धेंपे उपस्थित होते. उपस्थितांमध्ये इतर उद्योजकांसमवेत ‘तऊण भारत’चे समूह प्रमुख तथा सल्लागार संपादक किरण ठाकूर हेही उपस्थित होते.
गुंतवणुकदारांची गोव्याला पसंती मिळावी
मुख्यमंत्री म्हणाले, जागतिक गुंतवणुकदारांच्या पसंतीचे केंद्र म्हणून भारताच्या किनारपट्टीलगत वसलेले गोवा हे प्रमुख राज्य ठरेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत आता जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जात आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या पाठबळाचा गोवा राज्याला मोठा लाभ झाला आहे. देशाच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये एक प्रमुख यशोगाथा गोवा राज्यात घडेल आणि सर्वच उद्योग क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीसाठी पहिल्या पसंतीचे केंद्र म्हणून गोवा राज्य ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
गोवा होणार प्रभावी लॉजिस्टिक केंद्र
उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांनी गोव्याला लाभलेल्या भौगोलिक स्थितीचे धोरणात्मक फायदे यावर भर देत, गोवा प्रभावी लॉजिस्टिक केंद्र म्हणून कशा प्रकारे विकसित होऊ शकेल हा मुद्दा ठामपणे मांडला. राज्याच्या या क्षमतेचा प्रभावी उपयोग करण्यासाठी आणि राज्यामध्ये अतिरिक्त सुविधा उभारण्यासाठी एक आश्वासक पाऊल उचलत गोवा शासनाने एक सर्वसमावेशक धोरण सादर केल्याचे त्यांनी सांगितले.
महत्वाच्या सामंजस्य करारावर सह्या
‘इन्व्हेस्ट गोवा 2024’ परिषदेतील महत्त्वाच्या घडामोडींमध्ये टीव्हीएस इंडस्ट्रियल अँड लॉजिस्टिक पार्क आणि गोवा गुंतवणूक प्रोत्साहन आणि सुविधा मंडळ यांच्यामध्ये; तसेच पै काणे समूह आणि गोवा गुंतवणूक प्रोत्साहन आणि सुविधा मंडळ यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
संकेतस्थळाचे अनावरण, शशी सोनी यांचा सत्कार
यावेळी ‘गोवा-आयडीसी नियमन संहिता 2023’ आणि गोवा-आयपीबीच्या संकेतस्थळ यांचे अनावरण करण्यात आले. तसेच ‘गोवा-आयडीसीच्या डिजिटल पब्लिक गुड’चे तांत्रिक प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री सावंत आणि उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांच्या हस्ते वेर्णा औद्योगिक वसाहतीमध्ये कार्यरत असलेल्या ह्यूजेस प्रिसिजनच्या अध्यक्षा श्रीमती शशी सोनी यांचा महिला उद्योजकता क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला.
गुंतवणुकदारप्रिय धोरण राबविणार : लॉरेन्स
शाश्वत आणि पर्यावरणपूरक उद्योगांवर लक्ष केंद्रित करून गुंतवणूक अनुकूल वातावरण निर्माण करण्याच्यादृष्टीने गोवा औद्योगिक विकास महामंडळाने एक पाऊल पुढे टाकले आहे. लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून गोव्याच्या बलस्थानाचा लाभ घेताना गुंतवणूकदारप्रिय औद्योगिक धोरण राबवण्याबाबत विचार केला जाईल, असे गोवा-आयडीसीचे चेअरमन आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी सांगितले.
गेव्याला गुंतवणुकीसाठी सहकार्य करु : दिनेश
आपणा सविश्वास आहे की इन्व्हेस्ट गोवा परिषदेच्या माध्यमातून राज्याच्या विद्यमान व्यवसायक्षेत्राचा विकास होण्यास मदत होईल. गोव्याच्या अर्थव्यवस्थेला उच्च विकासाच्या मार्गावर आणू शकतील अशा नवीन क्षेत्रांचा शोध घेण्यास भारतीय उद्योग महासंघ मदत करेल. सीओई-सीआयआय-इन्स्टिट्यूट ऑफ लॉजिस्टिक्सद्वारे लॉजिस्टिक धोरणाची निर्धारित उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी गोवा सरकारला ज्ञानसहाय्य आणि उद्योगांचा सहभाग वाढविण्यासाठी महासंघ सहकार्य करेल, असे भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष आर. दिनेश यांनी सांगितले.
गोव्याला नव्या उंचीवर नेणार : अभिषेक
गोव्याची औद्योगिक यशोगाथा नव्या उंचीवर नेत राज्याला औद्योगिक गुंतवणुकीचे आकर्षक केंद्र म्हणून जगासमोर मांडणे हे आमचे उद्दिष्ट आहे. मोक्याचे स्थान आणि उत्कृष्ट पायाभूत सुविधा यामुळे गुंतवणुकदारांसाठी गोवा एक आकर्षक पर्याय बनले आहे. राज्यामध्ये उत्पादन, आयटी, आयटीईएस, लॉजिस्टिक आणि वेअरहाउसिंग क्षेत्रांना उद्योगाचा दर्जा देण्यात आला आहे, असे गोवा-आयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रविमल अभिषेक यावेळी म्हणाले.
गुंतवणुकीसाठी गोव्याला प्रथम प्राधान्य द्यावे
माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी यांनी सांगितले की, राज्यातील फार्मा उद्योगाची मजबूत उपस्थिती लक्षात घेता गोवा हे संशोधन आणि विकासाचे केंद्र बनू शकते. गोवा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या पायाभूत सुविधांचा राज्य वापर करू शकते, जिनोमिक्सच्या क्षेत्रात काम करू शकते आणि त्याभोवती एक प्रभावी व्यावसायिक परिसंस्था तयार करू शकते. हे किनारी राज्य ऑफ-शोअर बँकिंगसह विविध वित्तसेवांचे जागतिक केंद्र बनू शकते. त्यामुळे उद्योजकांनी गुंतवणुकीसाठी गोव्याला प्रथम प्राधान्य द्यावे, असेही ते म्हणाले.
गोवा उद्योजकांना अनुकूल : श्रीनिवास धेंपो
धेंपो उद्योग समूहातर्फे वार्का येथे 200 खोल्यांचे पंचतारांकीत रिसॉर्ट उभारण्यात येणार आहे. राज्य सरकारने उद्योजकांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा निर्माण केलेल्या आहेत. सरकारने उद्योजकांना घातलेले नियम उद्योगांना अनुकूल असे आहेत. त्यामुळे यापुढे उद्योजकांनी मानसिकता बदलून सकारात्मक पावले टाकण्याची गरज आहे. पर्यावरणभिमूख वीज प्रकल्प उभारण्यासाठी धेंपो उद्योग समूह सरकारला सहकार्य करण्यास तयार आहे, असे धेंपो उद्योग समूहाचे चेअरमन श्रीनिवास धेंपो यांनी सांगितले.
पाककला संस्था स्थापण्याची योजना : बॅनर्जी
गोवा राज्यामध्ये एक प्रभावी प्रादेशिक पाककला संस्था स्थापन करण्याची योजना सादर केली आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट भारतातील प्रादेशिक खाद्यपदार्थांच्या विकासाला प्रोत्साहन देणे, त्यांच्यामध्ये दडलेल्या महत्त्वपूर्ण जागतिक क्षमतेचा उपयोग करणे हे आहे. ही पाककला संस्था या प्रदेशाच्या उद्योग व पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी एक अनोखी आणि प्रभावी ठरेल, असे भारतीय उद्योग महासंघाचे महासंचालक चंद्रजित बॅनर्जी यांनी सांगितले.