करीत असता यत्न ज्ञात्याच्या ही मनास ही । नेती खेचूनि वेगाने इंद्रिये दांडगी चि की ।
अध्याय दुसरा
भगवंत म्हणाले, ज्याप्रमाणे संकटाची जाणीव झाल्यावर कासव आपले अवयव आत ओढुन घेते, त्याप्रमाणे स्थितप्रज्ञ पुरुष त्याची इंद्रिये, विषयापासून आवरून धरतो. त्याचा आहार त्याच्या ताब्यात असतो. उचित आहार घेणाऱ्या पुरुषाला विषयसेवन नकोसे वाटते. माणसाचे विकार बरेचसे त्याच्या आहारावर अवलंबून असतात. साधक नित्य नियमाने जीभ सोडून इतर इंद्रियांच्यामार्फत भोगावयाच्या विषयांचा त्याग करतात पण जिभेला मात्र आळा घालत नाहीत. जे जिभेला आळा घालू शकत नाहीत त्यांनी इतर विषय कितीही वर्ज्य केले तरी ते विषय त्यांना हजार मार्गाने येऊन चिकटतात. म्हणून जिभेचे विषय प्रयत्नाने कमी करता येत नाहीत कारण त्यावाचून जगणे शक्य नाही. पण अर्जुना! जो साधक परब्रम्हाशी एकरूप होईल, त्याची रसनेंद्रियाची लालसा शिथिल होईल. ब्रह्म मीच आहे, हे अंगात भिनले की, शरीराचा विसर पडतो. त्यामुळे त्याला व्यवहाराचे भान रहात नाही अशावेळी इंद्रियेही त्यांच्या कार्यातून निवृत्त होतात.
ह्यावरून हे लक्षात येते की, माणसाने त्याच्या आहाराबाबत अत्यंत जागरूक राहिले पाहिजे. समोर आवडीचा पदार्थ दिसला की तो खावासा वाटतो. हे म्हणजे आपण इंद्रियांच्या ताब्यात जाण्यासारखे आहे. हे लक्षात घेऊन आपण इंद्रियांचा दास न होता त्यांचे मालक व्हायचा प्रयत्न केला पाहिजे. समोरचा पदार्थ खाण्याचा मोह जरी झाला तरी तो खाल्ल्यावर आपल्याला पचेल का ह्याचा आधी विचार करावा. तसेच आपले पोट भरलेले असले तरी आवडतोय म्हणूनही काहीवेळा पदार्थाचे अधिक सेवन केले जाते ते निश्चितच आपल्या प्रकृतीला हानिकारक असते. तेही टाळणे योग्य होईल. इंद्रियांच्या आहारी न गेल्यास ते शक्य होते. सुरवातीला कधी आपण त्यात यशस्वी होतो तर कधी आपल्याला आवडत्या वस्तू खाण्याचा मोह आवरत नाही पण म्हणून प्रयत्न न सोडता मोह टाळण्याचा प्रयत्न करत राहिल्यास हळूहळू त्यात यश मिळत जाते.
इंद्रियांच्या अफाट ताकदीबद्दल पुढील श्लोकात भगवंत सांगत आहेत. ते म्हणाले, सामान्य माणसाची गोष्ट तर सोडूनच द्या, बुद्धिमान व्यक्तीही इंद्रियांनी दाखवलेल्या प्रलोभनांना सहजी फशी पडतात. जोपर्यंत माणसाच्या इच्छा शिल्लक असतात तोपर्यंत बुद्धिमान व्यक्तीने कितीही प्रयत्न केला तरी अतिशय बलवान इंद्रिये त्याचे मन जबरदस्तीने विषयांकडे ओढतात आणि त्याला मोहित करतात.
करीत असता यत्न ज्ञात्याच्या ही मनास ही । नेती खेचूनि वेगाने इंद्रिये दांडगी चि की ।।60 ।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतानी अर्जुनाला असे सांगितले की, इंद्रियांना ताब्यात ठेवण्यासाठी साधक सतत प्रयत्न करत असतो परंतु जोपर्यंत त्याला काही ना काही इच्छा होत असतात तोपर्यंत इंद्रिये त्याच्या स्वाधीन होत नाहीत. माणसाला कोणतीही इच्छा झाली की, त्यांची ज्ञानेंद्रिये क्रियाशील होऊन त्याला त्या इच्छेला अनुरूप अशी माहिती पुरवू लागतात, जेणेकरून त्याने इच्छेच्या तृप्तीसाठी प्रयत्न करायला उद्युक्त व्हावे.
इंद्रिये स्वाधीन व्हावीत म्हणून साधक स्वत:भोवती साधनेची घरटी बांधतात, मनाला मुठीत ठेवण्यासाठी यमनियमाचे कुंपण घालतात. एव्हढे करून सुद्धा इंद्रिये अशी प्रतापी असतात की, ती साधकाला विषय भोगाचे आकर्षण दाखवून व्याकुळ करतात, मी मी म्हणणाऱ्या विद्वानाला खेड्यातला अशिक्षित माणूस व्यवहारात हातोहात फसवतो त्याप्रमाणे तप करणाऱ्या साधकाला सिद्धीच्या रूपाने प्राप्त झालेले विषय सहजी भुलवतात.
क्रमश: