हे आहे ’घटस्फोट’ मंदीर
‘घटस्फोट’ घेण्यासाठी सर्वसाधारणत: न्यायालयात जाण्याची पद्धत आहे. तथापि, या जगाच्या पाठीवर एक मंदीर असे आहे, की जिथे लोक घटस्फोट घेण्यासाठी जातात. विवाहसौख्य दीर्घकाळ मिळावे, अडचणी दूर व्हाव्यात, कुटुंबातील सगळी माणसे सुखरुप रहावीत आणि शांती-समाधान-समृद्धी मिळावी, यासाठी खरेतर बहुतेक माणसे मंदिरात जातात. मंदिरातील देवतेला साकडे घालतात. नवस बोलतात. कौल लावतात. पण हे मंदीर असे आहे, की तेथे घटस्फोट होतात.
हे मंदीर जपानमध्ये असून ते ‘मात्सुगाओका टोकेई जी’ या नावाने ओळखले जाते. या मंदिरात इतिहास काळापासून घटस्फोट मिळण्याची सोय आहे. विशेषत: ज्या महिला आपल्या संसारात सुखी नाहीत आणि ज्यांना विवाहबंधन तोडण्याची इच्छा आहे, अशा महिला या मंदिरात येतात. येथील धार्मिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना त्यांच्या पतीपासून घटस्फोट मिळतो. ही सेवा येथे विनामूल्य उपलब्ध करुन दिली जाते. प्राचीन काळात जपानमध्येही महिलांना घटस्फोट मागण्याचा अधिकार नव्हता. पतींना किंवा पुरुषांना मात्र त्यांच्या इच्छेनुसार पत्नीला घटस्फोट देण्याचा अधिकार होता. त्यामुळे महिलांवर अन्याय होत असे. या अन्यायातून त्यांची सुटका करण्यासाठी हे मंदीर स्थापन करण्यात आले होते. ते किमान 800 वर्षे जुने असण्याची शक्यता आहे. समाजात इतरत्र महिलांना जो अधिकार मिळत नाही, तो या मंदिरात मिळतो. त्यामुळे वैवाहिक जीवनात अन्याय सहन कराव्या लागलेल्या महिलांना येथे येऊन आपल्या पतीपासून घटस्फोट घेता येतो. या मंदिरात पुरुषांचा अधिकार चालत नाही. अलिकडच्या काळात खरेतर घटस्फोट घेण्याची प्रक्रिया आज जगभरात (काही धर्मांध देशांचा अपवाद वगळता) खूपच सोपी झाली आहे. तरीही या मंदिरात घटस्फोटेच्छू महिलांची गर्दी असते. येथे महिलेने मिळविलेला घटस्फोट समाजात वैध मानला जातो. यासाठी एकच अट आहे, ती म्हणजे घटस्फोट घेणाऱ्या महिलेला या मंदिरात तीन वर्षे वास्तव्य करावे लागते. ही प्रक्रिया पूर्ण झाली की महिला विवाहबंधनातून मुक्त केली जाते.