ही तर लोकशाहीची थट्टा!
सत्ताधाऱ्यांच्या डिनर डिप्लोमसीवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र आक्रमक
बेळगाव : नेतृत्वबदलाचा गोंधळ सुरू असताना कोणत्या पुरुषार्थासाठी बेळगाव येथे अधिवेशन भरविण्यात आले आहे? असा प्रश्न भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी शुक्रवारी उपस्थित केला आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून नेतृत्वबदलाची चर्चा सुरूच आहे. पत्रकारांशी बोलताना विजयेंद्र म्हणाले, हिवाळी अधिवेशनाआधी तुमच्यातील नेतृत्वासंबंधीची समस्या सोडवून घ्या, असे आम्ही सांगितले होते. तरीही काँग्रेसमधील गोंधळ संपण्याची चिन्हे दिसत नाही. बेंगळूरमध्ये ब्रेकफास्ट मिटिंग झाली. बेळगावात लंच, डिनर सुरू असल्याचेही विजयेंद्र यांनी सांगितले. लोकशाहीची केलेली ही थट्टाच असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री खुर्चीसाठी सुरू असलेला संघर्ष केवळ काँग्रेस पक्षाची अंतर्गत समस्या नाही. मुख्यमंत्री संपूर्ण राज्याचे असतात. संपूर्ण राज्यात सत्ता चालवण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. याचा विसर पडू नये. केवळ दिखाव्यासाठी बेळगावात अधिवेशन भरवू नका. तुमच्यातील संघर्ष संपेपर्यंत अधिवेशन पुढे ढकला, असा सल्लाही आपण दिला होता. ब्रेकफास्ट, लंच, डिनर मिटिंग घेण्यात सरकारला प्रशासनाचा विसर पडला आहे. गेल्या तीन-चार महिन्यांपासून सत्तासंघर्ष वाढला आहे. त्यामुळेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन चिघळले. डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील आमदारांचा एक गट मुख्यमंत्र्यांना पदावरून उतरविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे प्रशासन पूर्णपणे कोलमडल्याचेही त्यांनी सांगितले.
आपल्या समर्थकांसाठी गुरुवारी रात्री जेवणावळीचे आयोजन केल्याच्या वृत्ताचा उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी इन्कार केला आहे. अधिवेशनासाठी आपण बेळगावला आलो आहोत. लोक प्रेमाने जेवण पाठवून देत आहेत. काही जण घरी बोलवत आहेत. म्हणून त्यांना नाही म्हणता येत नाही. माझ्या मतदारसंघातील एक तरुण बेळगावात काम करतो आहे. माझ्या आवडीचे जेवण करून पाठवतो, असे तो सांगतो आहे. त्याला नाही कसे म्हणणार? असा प्रश्नही डी. के. शिवकुमार यांनी उपस्थित केला आहे. आपण कोणत्याही प्रकारचे शक्तिप्रदर्शन करत नाही. काँग्रेसचे सर्व आमदार एक आहोत. आपण काँग्रेस गटाचे आहोत. माझ्यासोबत कोणीही येऊ नये, माझ्या बाजूने कोणीही बोलू नये, असेही शिवकुमार यांनी सांगितले.