हा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारला चपराक : सिद्धरामय्या
प्रतिनिधी/ बेंगळूर
मुडाच्या भूखंड वाटपाच्या बाबतीत माझ्या पत्नीविरुद्ध चौकशीसाठी ईडीने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. हा ऐतिहासिक आदेश केंद्र सरकारला चपराक आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती के. विनोदचंद्र यांच्या आदेशाचे मी नम्रपणे स्वागत करतो. माझ्या दीर्घ राजकीय आयुष्यात मी नेहमीच संविधान आणि कायद्यासमोर नतमस्तक राहिलो आहे. राजकीयदृष्ट्या मला सामोरे जाण्याचे धाडस नसलेल्या भाजप आणि त्यांच्या सहकारी पक्षाने सीबीआय आणि ईडीसारख्या घटनात्मक तपास संस्थांचा गैरवापर केला आहे. माझ्या पत्नीविरुद्ध खोटे प्रकरण दाखल करून जो त्रास दिला तो अत्यंत घृणास्पद आहे. यामुळे मला आणि माझ्या कुटुंबाला झालेला मानसिक त्रास कधीही विसरणार नाही, असेही सिद्धरामय्या यांनी ‘एक्स’ पोस्टमध्ये म्हटले आहे.