हा खेळ सावल्यांचा
रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्यांचा
संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा
‘हा खेळ सावल्यांचा’ या चित्रपटामधलं सुप्रसिद्ध गायक महेंद्र कपूर यांच्या स्वरांतलं हे गीत त्या गाण्याच्या थोड्या वेस्टर्न टचच्या ठेक्यामुळे आणि त्यांच्या आवाजाच्या वेगळ्याच पोतामुळे एकदा ऐकल्यावर कुणाच्याही लक्षात राहील असं आहे. अगदी नुकतंच झालेलं खग्रास चंद्रग्रहण, त्यात बऱ्याच ठिकाणी दिसलेला रक्तवर्णी चंद्र अर्थात ब्लड मून आणि त्या निमित्ताने भूगोल, इतिहास आणि सगळ्याच गोष्टींवर झडलेली घमासान चर्चा या पार्श्वभूमीवर इतक्या पूर्वीच्या काळात ग्रहणासारख्या गोष्टीवर एखादं गीत लिहिलं जाऊ शकतं ही बाब मजेशीर वाटते. खरं तर हे टायटल
सॉंग आहे. ‘हा खेळ सावल्यांचा’ हा तो सिनेमा होता. काशिनाथ घाणेकर आणि आशा काळे यांनी त्यामध्ये भूमिका केलेल्या होत्या. एखाद्या गोष्टीला ग्रहण लागणे हा वाक्प्रचार आपल्याकडे वापरला जातो. मुळात ग्रहण करणे, ग्रहण लागणे आणि एकूणच ग्रहण हा शब्द विचार करण्यासारखा आहे. कारण ग्रहण म्हणजेच गिळणे. खाण्यापिण्यासाठी हा शब्द वापरला जातो. ग्रहण करणे म्हणजे एखादी गोष्ट आपल्या मनात साठवून ठेवणे, समजून घेणे ही सुद्धा क्रिया आहे. मग त्या ग्रहणाशी सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण यांचा काय बरं संबंध असेल? आपल्याला माहित आहे की पूर्वीच्या पुराणकालीन समाजातील समजुतीप्रमाणे राहू हा ग्रह चंद्राला गिळतो अशी एक समजूत होती. तो चंद्राचा ग्रास घेतो. ग्रास म्हणजे घास घेणे म्हणून मग त्याला ग्रहण म्हणतात असं सगळं सांगितलं जायचं. ग्रहणाचे वेध लागणे या गोष्टीवरून एखाद्या गोष्टीचे वेध लागणे हा वाक्प्रचारही झाला. वेध लागणे म्हणजे काय? एखादी गोष्ट प्रत्यक्ष घडण्याच्या अगोदर त्या गोष्टीच्या काही खुणा आपल्याला दिसायला लागतात. किंवा एखादी गोष्ट घडायला हवी किंवा घडणार आहे म्हणून तशा त्या घटनेची आपण वाट बघायला लागतो याला वेध लागणे असं म्हणतात.
मग एकदा का ग्रहण या विषयाच्या चर्चा सुरू झाल्या की त्याला पूर्णविराम मिळतच नसावा. आता तर सोशल मीडियामुळे अशा प्रकारच्या चर्चा इतक्या टोकाला जाऊन केल्या जातात की त्याच्या चंद्रग्रहणाला किंवा सूर्यग्रहणाला आपण घडल्याबद्दल पश्चात्ताप व्हावा! त्यात गंमत अशी आहे, चंद्रग्रहण बिचारं निरुपद्रवी असतं. ते कधीही, केव्हाही, कोणीही बघावं. फक्त फलज्योतिषाप्रमाणे ज्यांना इष्ट अनिष्ट वगैरे सांगितलेलं असेल आणि त्यांना ते पाळायचं असेल त्यांना सोडून बरं का! बरं यात परत गंमत अशी की चंद्र बिचारा प्रेम, कवी, कविता आणि चेहरा या चार गोष्टींमध्ये आपला होणारा वापर सहन न होऊन इतका भागलेला असतो की कुणीतरी
चांदोबा चांदोबा भागलास का
लिंबोणीच्या झाडामागे लपलास का
लिंबोणीचे झाड करवंदी
मामाचा वाडा चिरेबंदी
असं म्हणायची खोटी, की ताबडतोब तो झाडाच्या आड जाऊन पडायला तयार असेल. किंबहुना एकदाचं कायमचं इथेच बसून राहावं असं त्याला वाटत असेल. नाही म्हणजे चंद्र दिसायला देखणा आहे. त्याला एक नाही दोन नाही तर तब्बल सत्तावीस बायका आहेत. (म्हणजे नक्षत्र हो!) सगळं ठीक आहे. पण म्हणून तुम्ही ऊठसूट सौंदर्याचा मापदंड म्हणून त्याला वापरावं? बरं वापरून तरी लोक गप्प बसावेत. पण ते नाही! प्रेयसीच्या चेहऱ्यावरच्या मुरुमांना चंद्रावरच्या खड्ड्यांची उपमा द्यावी? इतका अपमान त्या चंद्राचा खरोखर कुणीही केला नसेल.
त्याचा पृष्ठभाग किती ओबडधोबड असतो त्याच्या खऱ्याखऱ्या प्रतिमा दाखवणाऱ्या सॅटेलाईटनेसुद्धा त्याचा इतका अपमान केला नसेल. बरं एवढं सगळं करून भागत नाही लोकांचं. मग आणखीन वेगवेगळे उद्योग ग्रहणकाळात चालू होतात. कारण पूर्वापार पाळल्या जाणाऱ्या काही जनरीतींप्रमाणे किंवा कदाचित पूर्वीच्या लोकांच्या अनुभवांवर विसंबून असेल पण काही पथ्यं पाळायला सांगितली जातात. ती म्हणजे ग्रहणाचे वेध लागल्यापासूनच्या काळात जेवणखाण करू नये असं म्हणतात. विशेषत: गर्भवती स्त्रियांनी ग्रहण पाळावं असं म्हणतात. म्हणजे ग्रहणकाळात त्यांनी कोणतीही हालचाल करू नये. देवाचं नाव घेत शांत आणि स्वस्थ पडून राहावं. काहीही खाऊ, पिऊ नये असं म्हटलं जातं. ग्रहण लागताना जलाशयात म्हणजे नदी, तलावासारख्या ठिकाणी स्नानाला जाण्याची पद्धत असते. ग्रहण सुटल्यावर समुद्रस्नान करण्याची पद्धत अनेक ठिकाणी असते. ग्रहण हा पर्वकाळ समजला जातो. त्यामुळे अनेक देवस्वाऱ्या, विशेषत: कोकणात, यावेळी समुद्रस्नानाला बाहेर पडतात. आणि ग्रहणकाळात केले जाणारे विशिष्ट कुलाचार त्या देवस्थानाकडून रीतसर केले जातात. ही झाली एक बाजू. याची दुसरी बाजू आता अशी आहे की पाश्चिमात्य देशात ग्रहण पाहणारे आणि त्याचा अभ्यास करणारे लोक प्रचंड मोठ्या प्रमाणात आढळतात. त्या जगात ग्रहणाविषयी आपल्यासारख्या समजुती मुळीच पाळल्या जात नाहीत. गर्भवती स्त्रिया, लहान मुलं, मोठी माणसं सर्वजण आवडीने, आनंदाने आणि योग्य ती काळजी घेऊन ग्रहणासारखी महत्त्वाची भौगोलिक घटना पाहण्याचा आनंद घेतात. तिथे त्यांना काही होत असेल किंवा नसेल हा वेगळा भाग असतो. पण अमुकने ग्रहण पाहिलं म्हणून तिच्या मुलाला असं झालं अशी तिकडून तरी बातमी ऐकू येत नाही. अशा सगळ्या घटना आणि सर्वांना माणूस म्हणून विधात्याने सारखं घडवलेलं असतानाही पृथ्वीवर राहणाऱ्या वेगवेगळ्या मानवसमूहांचं आपापल्या विश्वासाप्रमाणे परस्परविरोधी वागणं नेहमी बुचकळ्यात पाडून जातं. घटना एकच असते. परिणामही अर्थात सारखेच असणारच. परंतु मानवी समूह, मानवी वर्तन यात जी तफावत असते तीच तफावत विचारात आणि मग पर्यायाने आचारातही दिसून येते.
भौगोलिक घटना या गेली लाखो वर्षं आकाशात घडतच आहेत. आपापल्या अनुभवावर आधारित परंपरा आणि रिवाज प्रत्येक मानवसमूहात निर्माण होतात. आणि त्याप्रमाणे पुढे ते पाळले जातात हेच खरं.
एक गोष्ट नक्की की ग्रहण म्हणजे पृथ्वीवर येणारा नैसर्गिक प्रकाश मोठ्या प्रमाणात कमी होणे. असं म्हटलं जातं की महाभारतामध्ये युद्धात जयद्रथवध केला गेला त्या वेळेला ग्रहणकाळच होता. त्यावरूनच पुढे हा सूर्य आणि हा जयद्रथ अशी म्हणही जन्माला आली. त्याचा अर्थ असा की एखाद्या गोष्टीला साक्षी प्रमाण अचूक देणे. या ग्रहणामुळे प्राणी आणि पक्षी सुद्धा हमखास फसतात. खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळेला सूर्याचं घड्याळ पाळणारे पशुपक्षी फसगत होऊन आपापल्या घरट्याकडे परतायला लागतात. ते वेगवेगळे आवाज काढतात. अस्वस्थ होतात. याचा अर्थ ग्रहणाचा त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. मानवापेक्षा त्यांचे जीवन अतिशय नैसर्गिक असतं. आणि पूर्ण नैसर्गिक जीवन जगणारे जीव जेव्हा सैरभैर होत असतील त्या वेळेला मानवाच्या दृष्टीने ती घटना निश्चितच धोकादायक असू शकते. किमान माणसाने स्वत:ची काळजी घेणं आवश्यक आहे. आपल्या पूर्वजांनी यासाठीच काही गोष्टींची भीती घालून तर ठेवली नसेल? ग्रहणाच्या वेळेला हवा अशुद्ध असते असं म्हटलं जातं. पूर्वीच्या काळी ग्रहण सुटल्यावर सर्वांनी डोक्यावरून आंघोळ करण्याची प्रथा होती. अर्थात ज्याच्या त्याच्या विचारसरणीचा प्रश्न आहे. परंतु आरोग्याच्या दृष्टीने तर ही सोय केलेली नसेल? असा प्रश्न पडतो. तसे प्रश्न अनेक आहेत. फक्त ते गाण्यावरून सुरू होतात एवढंच! तो खेळ मात्र दिवसरात्र सुरूच राहतो..
- अॅड. अपर्णा परांजपे-प्रभु