For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दुष्काळात तेरावा

06:52 AM Nov 29, 2023 IST | Tarun Bharat Portal
दुष्काळात तेरावा
Advertisement

मागच्या दोन ते तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या अवकाळी पावसाने महाराष्ट्र राज्याला चांगलाच तडाखा दिल्याचे दिसते. या पावसाने अंदाजे एक लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे केलेले नुकसान म्हणजे ‘दुष्काळात तेरावा’च म्हटला पाहिजे. नैत्य मोसमी पावसावरच देशातील शेती अवलंबून आहे. तथापि, यंदाच्या वर्षी पाऊस लांबल्याने खरीप हंगाम ताणाताणीत गेला. त्यानंतर ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये अनेक भागांत अतिवृष्टी वा ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने हंगामात कशीबशी तगवलेली पिकेही जमीनदोस्त झाली. परिणामी उत्पादन घटले नि बळीराजाचा खिसा रिताच राहिला. त्यामुळे सगळ्या आशा एकवटल्या होत्या, त्या रब्बीच्या हंगामावर. परंतु, या हंगामातही शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आल्याचे पहायला मिळते. आधी परतीच्या पावसाने पाठ फिरविली नि आता अवकाळीने दणका दिला. त्यामुळे यातून सावरणे  नक्कीच अवघड असेल. अवकाळी वा गारपिटीचा पाऊस आणि नुकसान हे मागच्या काही वर्षांतील समीकरणच होऊन बसले आहे. मान्सूनपूर्व काळात वा मान्सूनोत्तर काळात कधीही गारपीट होते नि सारे काही होत्याचे नव्हते, हे चित्र अलीकडे वारंवार बघायला मिळते. यंदाही मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र तसेच मराठवाडा, विदर्भासह राज्याच्या विविध भागातील पिके मातीमोल झालेली दिसतात. प्राथमिक माहितीनुसार, बुलढाण्यात 32 हजार हेक्टरवर, नाशकात 30 हजार, नगरमध्ये 15 हजार, तर पुणे, नाशिक, जळगाव, सातारा, वाशिम, यवतमाळ, परभणी आदी भागांतही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जळगाव पट्टा हा केळीच्या पिकासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, पावसाने येथील केळीपीक पार आडवेतिडवे करून टाकले. नाशिक जिल्हा द्राक्षपिकासाठी ओळखला जातो. तेथील द्राक्षबागांची तर अतोनात हानी झाली आहे. थंडी ओसरताना द्राक्षपीक हातात येते आणि त्यातून द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांच्या हातात दोन पैसे येतात. पण गारपिटीच्या एका फटक्यात द्राक्ष वेलींची पाने व काड्या तुटून पडल्या, तर फुलोरा अवस्थेतील बागांचे नुकसान झाले. शिवाय आता पुढच्या टप्प्यात रोगराईचाही धोका असेलच. पुणे जिल्ह्यातही वेगळी स्थिती नाही. हातातोंडाशी आलेल्या पिकांची वाताहत झाल्याने शेतकरी संकटात आहे. जुन्नर, आंबेगावसह जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात भात कापणी व झोडणीची लगबग सुरू होती. त्यात अवकाळीने बिब्बा घातल्याने भाताचा पेंढा, नाचणी, वरईच्या गंजी भिजल्या. तर कुठे बटाटा, कांद्याला फटका बसला. विदर्भ, मराठवाड्यात कपाशीच्या पिकावर पावसाने बोळा फिरविला. परभणी, हिंगोलीसह अनेक भागात ज्वारीसह अन्य पिके आडवी झाली. कुठे तूर हातातून गेली. तर कुठे गहू, कलिंगड, पपई, टोमॅटो व अन्य भाजीपाला मातीमोल झाला. सातारा व परिसरात ऊस पिकाचे फडच्या फड उन्मळून पडले. तर महाबळेश्वर-जावळी पट्ट्यात स्ट्रॉबेरीचे नुकसान झाले. हे सर्व चित्र दु:खदायक होय. शेतीला जोडधंदा म्हणून काही शेतकरी शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या तसेच अन्य पशू वा जनावरांचेही पालन करीत असतात. परंतु, गारपिटीच्या तडाख्यात सापडल्याने काही भागांत पशुधनासही हानी पोहोचल्याचे दिसून येते. आता अवकाळी पावसाच्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्याआधारे अहवाल द्यावा, असे निर्देशही देण्यात आले आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे म्हटले आहे. परिस्थिती खरोखरंच अत्यंत कसोटीची आहे. त्यामुळे अशा काळात कागदी घोडे न नाचवता शेतकऱ्यांना लवकरात लवकर कशी मदत करता येईल, हे शासनाने पहायला हवे. शेती हा तसा जोखमीचाच व्यवसाय. परंतु, बदलत्या हवामानामुळे ही जोखीम अधिकच वाढलेली आहे. कधी एकाच वेळी पावसाळा, हिवाळा, उन्हाळा असे तिन्ही ऋतू बघायला मिळतात. तर कधी दोन ऋतूंचे मिश्रण दिसते. अतिवृष्टी, ढगफुटी, पावसाचा ताण, त्याचबरोबर थंडीच्या व उष्णतेच्या लाटा अशा वातावरणातील कितीतरी चढ उतारांना पिकांना सामोरे जावे लागते. त्यातून पीक जगवणे, तगवणे, हे एक महाआव्हानच. किंबहुना, कोणतीही ओरड न करता जगाचा पोशिंदा शेतकरी हे काम इमानेइतबारे करत असतो. मात्र, या बळीराजाला, त्याच्या शेतीला कुठे दोन, पाच सवलती दिल्या, की लगेच आपल्याकडे ओरड सुरू असते. तसे पाहिल्यास शेतीकरिता जगात इतरत्रही सबसिडी दिली जाते नि ती द्यायलाच हवी. पीकविमा, हा शब्द फार गोंडस वाटत असला, तरी त्या आघाडीवरही बऱ्याच अडचणी निर्माण होत असतात. सगळ्या कागदपत्रीय दिव्यातून पार पडल्यानंतरच कुठेतरी शेतकऱ्याच्या हातात पैसे पडतात. हे चित्र बदलले पाहिजे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, दीडपट हमीभाव देऊ, ही आश्वासने नक्कीच चांगली आहेत. ही आश्वासने ऐकायला खरोखरच छान वाटतात. परंतु, ती प्रत्यक्षात येण्यासाठी आपल्याकडील परिस्थितीत मूलभूत बदल होणार आहेत काय, याचे उत्तर मिळाले पाहिजे. शेतीच्या दृष्टीने हवामान विभागाचा अंदाज, हा घटकही अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आता तसे अंदाजही बऱ्यापैकी खरे ठरतात. मात्र, गारपीट वा अतिवृष्टीचा अंदाज तत्काळ शेतकरी वा तत्सम घटकांपर्यंत पोहोचतो का, हा संशोधनाचा विषय ठरावा. आजचे युग हे इंटरनेटचे आहे. त्यामुळे अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्यातून शेतकऱ्यांपर्यंत हे अंदाज लगोलग पोहोचले नि शेती वा शेतमालाच्या रक्षणासाठी तात्काळ उपाययोजना झाल्या, तर काही प्रमाणात नुकसान टळू शकते. त्यादृष्टीकोनातून या पातळीवर पावले उचलणे, ही काळाची गरज ठरते. या वर्षी पावसाने ताण दिल्याने मराठवाड्यात केवळ 40 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. इतर भागांत 70 ते 75 टक्के असे प्रमाण आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा 20 टक्क्यांनी जलसाठा कमी असल्याचे आढळते. हे सारे दुष्काळाचेच चिन्ह म्हणता येईल. दुष्काळाच्या अशा या सावटात अवकाळी पावसाने दणका दिल्याने हे वर्ष कठीण राहणार, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. हे पाहता पुढच्या टप्प्यातील टंचाईची स्थिती व संभाव्य गारपिट वा अवकाळीचे संकट याचा सामना करण्यासाठी तयार रहावे लागेल.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :

.