‘त्या’ तेरा जणांना साडेतीन वर्षे कारावास
वरिष्ठ अधिकाऱ्याला खोट्या विनयभंगात गोवले : प्रत्येकी 86 हजारांचा दंड
बेळगाव : हेस्कॉमच्या मुख्य कार्यकारी अभियंत्याला विनयभंगाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवणाऱ्या महिला अधिकाऱ्यासह तेरा जणांना 3 वर्षे 6 महिने कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. जिल्हा मुख्य सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एल. विजयलक्ष्मीदेवी यांनी हा निकाल दिला आहे. याबरोबरच प्रत्येकी 86 हजार रुपये दंडाचीही शिक्षा सुनावण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात खळबळ माजलेल्या आपल्याच कनिष्ठ अधिकाऱ्यांनी वरिष्ठांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अडचणीत आणणाऱ्या या प्रकरणाकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. प्रदीर्घ सुनावणीनंतर मंगळवार दि. 25 जून रोजी न्यायालयाने सर्व तेरा आरोपींना दोषी ठरवले होते. गुरुवारी दुपारी या खटल्याचा निकाल जाहीर करण्यात आला.
साहाय्यक अभियंत्या बी. व्ही. सिंधू, नाथाजी पाटील, अजित पुजारी, मलसर्ज शहापूरकर, सुभाष हल्लोळ्ळी, इराप्पा पत्तार, मल्लिकार्जुन रेडीहाळ, भीमप्पा गोडलकुंदरगी, राजेंद्र हळींगळी, सुरेश कांबळे, इरय्या हिरेमठ, मारुती पाटील, द्राक्षायणी नेसरगी या तेरा जणांना शिक्षा ठोठावण्यात आली आहे. विशेष सरकारी वकील म्हणून मुरलीधर कुलकर्णी यांनी काम पाहिले. या निकालासंबंधी विशेष सरकारी वकिलांनी पत्रकारांना माहिती दिली. राज्यातील अत्यंत महत्त्वाचा हा खटला होता. कनिष्ठ अधिकाऱ्यांनी वरिष्ठावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अडचणीत आणले होते. या प्रकारामुळे एका निष्पाप व निरपराध अधिकाऱ्याला नाहक त्रास सहन करावा लागला होता. न्यायालयाने या प्रकरणातील सर्व तेरा जणांना 3 वर्षे 6 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावल्याचे त्यांनी सांगितले.
आता हेस्कॉम कोणती कारवाई करणार?
आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला अडचणीत आणण्यासाठी विनयभंगासारख्या गंभीर गुन्ह्यात अडकवणाऱ्या तेरा जणांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. आता त्यांच्यावर हेस्कॉम कोणती कारवाई करणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. या शिक्षेला आव्हान देण्यासाठी त्यांना मुभा आहे. तीन वर्षाच्या वर शिक्षा झाली असेल तर उच्च न्यायालयात दाद मागितली पाहिजे. सेवानियमानुसार 48 तासांहून अधिक काळ न्यायालयीन कोठडीत असल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होते. आता हेस्कॉमच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे.