For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निपाणीचे दोघे दूधगंगा नदीत बुडाले

12:21 PM Jul 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
निपाणीचे दोघे दूधगंगा नदीत बुडाले
Advertisement

काळम्मावाडी धरणानजीक नदीच्या डोहात दुर्घटना : एकाला वाचवताना दुसराही गेला वाहून

Advertisement

राधानगरी/निपाणी : पावसाळी पर्यटनासाठी गेलेल्या निपाणीतील दोघांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी सकाळी 11 च्या सुमारास घडली. राधानगरी येथील काळम्मावाडी धरणानजीक दूधगंगा नदीच्या काळोखी डोहात ही दुर्घटना घडली. गणेश चंद्रकांत कदम (वय 18, रा. आंदोलन नगर, निपाणी) आणि प्रतीक संजय पाटील (वय 22, रा. आंदोलननगर, निपाणी) अशी बुडालेल्या युवकांची नावे आहेत. संध्याकाळी उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते. मात्र अतिवृष्टीमुळे यात अडथळे आल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली. मंगळवारी पुन्हा आपत्कालीन पथकाच्या सहकार्याने शोध घेतला जाणार आहे.

याबाबत राधानगरी पोलीस स्थानकातून मिळालेली माहिती अशी की, निपाणी शहरातील आंदोलननगर परिसरातील बारा वर्गमित्र क्रूझर वाहन (क्र. एमएच 13 ए.सी. 2603) या वाहनाने दूधगंगा धरण परिसरात पावसाळी पर्यटनासाठी गेले होते. यातील गणेश कदम हा पाण्यामध्ये उतरत असताना पाय घसरून पाण्याच्या डोहात पडला. त्याचवेळी काठावर असणारा वाहनचालक प्रतीक पाटील याने पाण्यात उडी मारून गणेशला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण गणेशने त्याला घट्ट मिठी मारल्याने दोघेही पाण्यामध्ये बुडाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संतोष गोरे, उपनिरीक्षक खंडू गायकवाड, कर्मचारी रघुनाथ पोवार, भैरवनाथ पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Advertisement

यावेळी आपत्कालीन स्थितीत मदत करणारे स्थानिक नागरिक धोंडीराम राणे, जयसिंग केळुसकर यांनी पाण्यात उतरून शोधकार्य सुरू केले. चार तासांच्या शोध कार्यानंतरही मृतदेह हाती लागले नाहीत. काळम्मावाडी परिसरात पावसाचा जोर अधिक असल्याने पाण्याचा प्रभाव वाढत असल्याने बचावकार्यात अडथळे येत असल्याने सायंकाळी पाचनंतर शोधमोहीम थांबवण्यात आली. दरम्यान, घटनास्थळी बघ्यांची आणि संबंधित नातेवाईकांची गर्दी झाली होती. तर नातेवाईकांचा आक्रोश हा सगळ्यांची मने हेलावून टाकणारा होता. अधिक तपास राधानगरी पोलीस करत आहेत. गणेश याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ तर प्रतीक याच्या पश्चात आई, भाऊ, चुलते असा परिवार आहे.

कुटुंबीय व नातेवाईकांची घटनास्थळी धाव

पर्यटनासाठी बारा वर्गमित्र व चालक प्रतिक असे 13 जण गेले होते. त्यापैकी 11 जण सुखरूप आहेत.  या घटनेची माहिती समजताच निपाणी येथून टाऊन प्लॅनिंगचे अध्यक्ष निकु पाटील, वसंत धारव, संदीप इंगवले सामाजिक कार्यकर्ते विनोद बल्लारी, रवींद्र इंगवले, बाळू शिंदे, रणजीत मगदूम, तुकाराम सुतार, सागर पाटील, विजय सुतार, अनिल श्रीखंडे, नितीन उपाळे यांच्यासह आंदोलननगर व परिसरातील नागरिक, कुटुंबीय व नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली.

शोधकार्यासाठी दिनकर कांबळे यांना पाचारण 

काळम्मावाडी धरणाच्या डोहात बुडालेल्या दोन तऊणांचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रशासन, पाटबंधारे विभाग, कुटुंबीय व नातेवाईकांनी कोल्हापूर येथील स्कुबा डायविंग आपत्कालीन जीवरक्षक दिनकर कांबळे यांना पाचारण केले आहे. कांबळे हे मंगळवारी सकाळी प्रत्यक्ष डोहात बुडालेल्या दोन तऊणांचा शोध घेणार आहेत,  माहिती आंदोलननगर येथील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र इंगवले व टाउन प्लॅनिंगचे अध्यक्ष निकु पाटील यांनी दिली.

सोशल मीडियावर माहिती घेतली

सदर युवकांनी पर्यटनाला जाण्यापूर्वी सोशल मीडियावर या पर्यटनस्थळाची माहिती घेतली होती. अलीकडच्या काळात पर्यटनासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळी स्थळे दाखवत पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र याठिकाणी नागरिकांच्या जीवास धोका कितपत आहे, याची माहिती दिली जात नाही. त्यामुळे सोशल मीडियावर माहिती घेताना संबंधित पर्यटनस्थळी असण्राया धोक्यांची जाणीवही करून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे, हे यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे.

पर्यटनस्थळी सावधगिरी बाळगा

राधानगरी तालुक्यातील पर्यटनासाठी धोका असलेल्या ठिकाणी पर्यटकांनी जाऊ नये. पर्यटनस्थळी असलेल्या नियमांचे पालन करावे. सार्वजनिक बांधकाम विभागालाही यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. धोकादायक स्थळे पर्यटनासाठी बंद केली जाणार आहेत. तसेच माहीत नसलेल्या पर्यटनस्थळी जाताना स्थानिक नागरिकांच्या मदतीने आढावा घेऊन पर्यटनास जावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी केले.

लोणावळ्याची घटना ताजी असतानाच....

रविवारी लोणावळा येथील भूशी डॅमवर जंगलातून येणाऱ्या बॅक वॉटरवरील धबधब्यावर अचानक पाण्याचा प्रवाह वाढून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली होती. या घटनेचे व्हिडिओ रविवारी तसेच सोमवारी सर्वत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ते ताजे असतानाच सोमवारी काळम्मावाडीनजीक ही घटना घडली. सदर काळोखी डोहात घडलेली ही दीड महिन्यातील दुसरी घटना आहे. यापूर्वी मे महिन्याच्या अखेरीस येथे पर्यटनासाठी आलेला कोरोची (ता. हातकणंगले) येथील युवक बुडाल्याची घटना घडली होती. त्यानंतर सोमवारी घडलेल्या या घटनेने पर्यटनाचा आनंद लुटताना सावधगिरी बाळगण्याची गरज व्यक्त होत होती.

आदल्या दिवशी अभियांत्रिकीला प्रवेश अन्

दरम्यान, मृत गणेश हा नुकताच अर्जुननगर येथील देवचंद महाविद्यालयातून बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झाला होता. त्याचे वडील चंद्रकांत कदम यांनी मुलांना चांगल्या प्रकारचे उच्चशिक्षण द्यायचे ठरवले होते. त्यानुसार उलाढाल करून आदल्या दिवशीच कोल्हापुरातील नामांकित विद्यालयात साडेतीन लाख रुपये भरून गणेश याला अभियांत्रिकी शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता. मात्र दुसऱ्याच दिवशी गणेशच्या दुर्घटनेचे वृत्त कानी पडताच त्याच्या कुटुंबीयांची अवस्था पाहून प्रत्येकाचे मन हळहळले. तसेच प्रतीक याच्या वडिलांचे चार वर्षांपूर्वी निधन झाले आहे. यानंतर प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करत त्याने वाहन व्यवसायात जम बसवला होता. मात्र अचानक त्याच्या जाण्याने कुटुंबीयांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा ठरला.

Advertisement
Tags :

.