For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिल्ली कॅपिटल्सचा तिसरा विजय,

06:58 AM Apr 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
दिल्ली कॅपिटल्सचा तिसरा विजय
Advertisement

गुजरातवर 6 गड्यांनी मात, रिषभ पंत सामनावीर, मुकेश, इशांत, स्टब्स यांचा भेदक मारा

Advertisement

वृत्तसंस्था/ अहमदाबाद

दिल्ली कॅपिटल्सने लो-स्कोअरिंग सामन्यात भेदक गोलंदाजीच्या जोरावर गुजरात टायटन्सचा 6 गड्यांनी पराभव करून तिसरा विजय मिळविला. 6 गुणांसह त्यांनी नवव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर झेप घेतली. 11 चेंडूत नाबाद 16 आणि 2 झेल व दोन यष्टिचीत करणाऱ्या यष्टिरक्षक रिषभ पंतला सामनावीराचा बहुमान देण्यात आला.

Advertisement

आयपीएलमधील या 32 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सचा केवळ 89 धावांत फडशा पाडला. दिल्लीच्या भेदक माऱ्यासमोर रशिद खान वगळता गुजरातच्या फलंदाजांना फार वेळ टिकाव धरता आला नाही. मुकेश कुमारने 3 तर इशांत शर्मा व ट्रिस्टन स्टब्स यांनी प्रत्येकी 2 बळी टिपले. त्यानंतर गुजरातने 8.5 षटकांत विजयाचे उद्दिष्ट गाठत धावगतीही वाढवली. मात्र त्यासाठी त्यांना 4 बळी गमवावे लागले.

जेक फ्रेजर मॅकगर्कने 10 चेंडूत 20 धावा जमविताना 2 चौकार, 2 षटकार मारले. अभिषेक पोरेलने 7 चेंडूत 15, शाय होपने 10 चेंडूत 19, रिषभ पंतने 11 चेंडूत नाबाद 16 व सुमित कुमारने नाबाद 9 धावा जमवित विजयाची औपचारिकता नवव्या षटकात पूर्ण केली. गुजरातच्या संदीप वॉरियरने 40 धावांत 2 तर स्पेन्सर जॉन्सन, रशिद खान यांनी एकेक बळी मिळविले.

मुकेश, इशांत, स्टब्स प्रभावी

आयपीएलमध्ये आतापर्यंतच्या सामन्यांत फलंदाजांचे वर्चस्व दिसून आले होते. पण या सामन्यात प्रथमच गोलंदाजांनी फलंदाजांवर वर्चस्व गाजविले. मुकेश कुमार हा दिल्लीचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 14 धावांत 3 बळी मिळविले तर इशांत शर्माने 8 धावांत 2 व स्टब्सने 11 धावांत 2 बळी मिळविले. गुजरातच्या फलंदाजांमध्ये फक्त रशिद खानने सर्वाधिक 31 धावांचे योगदान दिले. त्याने 24 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार मारला.

दिल्लीने प्रथम फलंदाजी दिल्यावर गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने खलील अहमदच्या गोलंदाजीवर पहिला चौकार मारला. नंतर त्याने इशांत शर्मालाही एक चौकार मारला. पण पुढच्याच चेंडूवर इशांतने बाद केले. त्याचा फुलर लेंग्थ चेंडू गिलने कव्हरवरील पृथ्वी शॉच्या हातात मारला. त्याने 8 धावा जमविल्या. या सामन्यासाठी काळ्या मातीची खेळपट्टी या मोसमात प्रथमच वापरण्यात आली. साई सुदर्शनने लागोपाठ दोन चौकार ठोकत चांगली सुरुवात केली. पण इशांतच्या जागी मुकेश कुमारला गोलंदाजी मिळाल्यावर त्याने पाचव्याच चेंडूवर वृद्धिमान साहाला 2 धावांवर त्रिफळाचीत केले.

वॉर्नरच्या जागी खेळणाऱ्या सुमित कुमारने अप्रतिम क्षेत्ररक्षण करीत साई सुदर्शनला थेट फेकीवर धावचीत केले. त्याने 9 चेंडूत 12 धावा जमविल्या. नंतर कर्णधार रिषभ पंतने चपळाई दाखवताना इशांतच्या गोलंदाजीवर डेव्हिड मिलरचा (2) सूर मारत अप्रतिम झेल टिपला. डीआरएसच्या आधारे तो झेलबाद असल्याचे दिसून आले. यावेळी गुजरातची स्थिती 5 षटकांत 4 बाद 30 धावा जमविल्या होत्या. पंतने नंतर स्टब्सच्या गोलंदाजीवर अभिनव मनोहरला 8 धावांवर यष्टिचीत केले. यामुळे गुजरातने सुपरसब खेळाडू शाहरुख खानला फलंदाजीस पाठवले. पण ही चाल यशस्वी ठरली नाही. पुढच्याच चेंडूवर पंतने त्याला शून्यावर यष्टिचीत केले. डावखुरा स्पिनर अक्षर पटेलने राहुल तेवातियाला 10 धावांवर पायचीत केले. डीआरएसनंतरही पंचांचा निर्णय कायम राहिला. 12 व्या षटकात त्यांची स्थिती 7 बाद 66 अशी झाली होती. पुन्हा गोलंदाजीस आलेल्या खलील अहमदने मोहित शर्माला (2) बाद केले. रशिद खानने मात्र आक्रमक फटकेबाजी करीत कुलदीप यादवला लाँगऑनच्या दिशेने डावातील पहिला व एकमेव षटकार ठोकला. अठराव्या षटकात मुकेश कुमारने त्याची खेळी संपुष्टात आणली. त्याने अपरकट मारण्याचा प्रयत्न केला आणि पंतने त्याचा झेल टिपला. याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर मुकेशने नूर अहमदचा त्रिफळा उडवून गुजरातचा डाव 89 धावांवर संपुष्टात आणला. गुजरातच्या केवळ तीन फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली तर 12 धावा अवांतराच्या रूपात मिळाल्या.

संक्षिप्त धावफलक : गुजरात टायटन्स 17.3 षटकांत सर्व बाद 89 : साई सुदर्शन 9 चेंडूत 12, राहुल तेवातिया 15 चेंडूत 10, रशिद खान 24 चेंडूत 31, गिल व अभिनव मनोहर प्रत्येकी 8, अवांतर 12, मुकेश कुमार 3-14, इशांत शर्मा 2-8, स्टब्स 2-11, अक्षर पटेल 1-17, खलील अहमद 1-18.

दिल्ली कॅपिटल्स 8.5 षटकांत 4 बाद 92 : पृथ्वी शॉ 7, फ्रेजर मॅकगर्क 10 चेंडूत 20, अभिषेक पोरेल 7 चेंडूत 15, शाय होप 10 चेंडूत 19, पंत 11 चेंडूत नाबाद 16, सुमित कुमार 9 चेंडूत नाबाद 9, अवांतर 6. संदीप वॉरियर 2-40, जॉन्सन 1-22, रशिद खान 1-12.

Advertisement
Tags :

.