उद्यमबाग कामगारवर्गाच्या जीवाशी खेळ : ओव्हरब्रिजचे काम निकृष्ट दर्जाचे, रस्त्याची डागडुजी करण्याची वाहनधारकांची मागणी
बेळगाव : निकृष्ट प्रतीच्या कामामुळे अवघ्या दोन वर्षांत टिळकवाडी येथील तिसरे रेल्वेगेट ओव्हरब्रिज अनेक ठिकाणी खचला असून ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहेत. रस्त्यामध्ये तब्बल गुडघाभर खड्डे पडल्याने मागील चार दिवसांत 6 ते 7 अपघात घडले आहेत. उद्यमबाग औद्योगिक वसाहतीत कामाला जाणाऱ्या कामगारांसाठी हा रस्ता धोकादायक ठरत असून हा सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या तिसरे रेल्वेगेट येथील ओव्हरब्रिजचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. ओव्हरब्रिज पूर्ण करण्यासाठी लागलेला कालावधी, जनरेट्यामुळे घाईघाईने संपविण्यात आलेले काम यामुळे अल्पावधीतच ओव्हरब्रिज खचला आहे. ओव्हरब्रिजसाठी टाकण्यात आलेला भराव दिवसेंदिवस खचत असून यामुळे रस्त्यावर खड्डे पडत आहेत. ओव्हरब्रिजवर करण्यात आलेले डांबरीकरणही अत्यंत निकृष्ट प्रतीचे होते. ओव्हरब्रिजच्या काँक्रिटवरील सर्व डांबरीकरण उखडून निघाले आहे. तरीदेखील बेळगावमधील एकही लोकप्रतिनिधी यावर एक अवाक्षर काढण्यास तयार नाहीत.
शहरातून उद्यमबागला जाण्यासाठी रेल्वे ओव्हरब्रिजचा वापर होतो. मागील पंधरा दिवसात ओव्हरब्रिजवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. डांबरीकरण उखडल्याने ठिकठिकाणी खडी साचली आहे. दोन दिवसांपूर्वी दुचाकी खड्ड्यामध्ये अडकल्याने उद्यमबाग येथील कामगाराला गंभीर दुखापत झाली. याप्रमाणेच इतर अपघातही झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून खड्ड्यामध्ये बॅरिकेड लावण्यात आला आहे. वाहनांची संख्या पाहता लावण्यात आलेला बॅरिकेड वाहतुकीसाठी अडथळा ठरत आहे.
दोन वर्षे होण्यापूर्वीच उड्डाणपुलाची वाताहत
ऑक्टोबर 2022 मध्ये उड्डाणपुलाचे उद्घाटन झाले होते. अद्याप दोन वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच उड्डाणपुलाची वाताहत झाल्याने गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दररोज शेकडो कामगारांची या मार्गावरून ये-जा असल्यामुळे उड्डाणपुलावरील रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी करण्यात येत आहे.