तिसरे रेल्वेगेट उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
रस्ता डांबरीकरणाचे काम पूर्ण : गुरुवार रात्रीपासून वाहनांचा सुसाट प्रवास
बेळगाव : टिळकवाडी येथील तिसरे रेल्वेगेट उड्डाणपुलावरील रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम अखेर गुरुवारी पूर्ण झाले. त्यामुळे रात्री हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. 13 दिवसांनी रस्ता खुला झाल्याने दुसरे रेल्वेगेट परिसरात होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत झाली. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. उड्डाणपुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 7 नोव्हेंबरपासून रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. यापूर्वी घालण्यात आलेला मुरूम काढून खडी टाकून रस्ता नव्याने तयार करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या देखरेखीखाली रस्त्याचे काम मागील तेरा दिवसांपासून सुरू होते.
सध्या डांबरीकरणाचे एक कोटिंग करण्यात आले असून आठवडाभरानंतर पुन्हा एक कोटिंग केले जाणार आहे. अवजड वाहनांच्या वाहतुकीनंतर रस्त्यावर कोणता परिणाम होणार याची पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर डांबरीकरणाचे दुसरे कोटिंग केले जाणार आहे. गुरुवारी रात्री उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे मागील तेरा दिवसांपासून वाहतूक कोंडीत अडकत असलेल्या नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. नवीन रस्त्यामुळे उड्डाणपुलावरून सुसाट वेगाने वाहने उद्यमबागच्या दिशेने धावत होती. उड्डाणपूल खुला करण्यात आल्याने शहरात होणारी वाहतूक कोंडीदेखील कमी होणार आहे.