तिसरे रेल्वेगेट उड्डाणपूल बनला मृत्यूचा सापळा
ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात : कामगारांसह वाहनचालकांचे होताहेत हाल
बेळगाव : शहरातील टिळकवाडी येथील तिसरे रेल्वेगेटवरील रस्त्याची पूर्णत: दूरवस्था झाली आहे. उड्डाणपुलावर ठिकठिकाणी तब्बल फूटभर खड्डे पडले असल्याने हा मृत्यूचा सापळा बनला आहे. दररोज हजारो वाहने या ठिकाणाहून जात असतानाही दुरुस्तीकडे मात्र रेल्वे प्रशासनासह राज्य सरकारचेही दुर्लक्ष होत आहे. एखाद्या निष्पापाचा बळी गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा प्रश्न वाहनचालक उपस्थित करीत आहेत. तिसरे रेल्वेगेटवर 2022 साली उड्डाणपूल बांधण्यात आला. उड्डाणपूल बांधल्यापासूनच अनेक वाद निर्माण झाले होते. उड्डाणपुलाच्या कामाबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. उद्घाटनाच्या आठच दिवसांमध्ये भराव खचल्याने तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली.
मागीलवर्षीच्या पावसाळ्यात रस्त्यामध्ये खड्डे पडल्याने ठिकठिकाणी काँक्रिट घालण्यात आले होते. त्यानंतर चांगल्या दर्जाचा रस्ता करणे गरजेचे होते. परंतु वर्षभर आहे त्याच रस्त्यावर वाहतूक सुरू ठेवण्यात आली. यावर्षी जून महिन्यात झालेल्या पावसामुळे मोठे खड्डे पडले. त्यातच अनगोळ येथील चौथे रेल्वेगेट उड्डाणपूल बांधकामासाठी बंद करण्यात आल्याने या रेल्वेगेटवरील भार वाढला. त्यामुळे दररोज हजारो वाहनांची ये-जा सुरू आहे. उड्डाणपुलाच्या झालेल्या दूरवस्थेबाबत माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी दोनवेळा आंदोलन करूनही अद्याप दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे खड्डे चुकवत नागरिकांना प्रवास करावा लागत आहे.
खड्ड्यांसोबत आता धुळीचाही त्रास
उड्डाणपुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालक हैराण झाले असताना आता धुळीचाही त्रास सहन करावा लागत आहे. मागील चार दिवसांत पडलेल्या उन्हामुळे खड्ड्यांमधील धूळ मोठ्या प्रमाणात उडत असून अवजड वाहन गेल्यानंतर धुळीचे साम्राज्य पहायला मिळत आहे. एखादा मोठा अपघात होण्यापूर्वी उड्डाणपुलावरील रस्त्याचे काम करण्याची मागणी केली जात आहे.
म. ए. युवा समितीचे रेल्वेमंत्र्यांना पत्र
तिसरे रेल्वेगेट येथील उड्डाणपुलाच्या झालेल्या वाताहतीसोबत दुसऱ्या बाजूच्या अपूर्ण असलेल्या कामाबाबत महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र पाठवले आहे. उड्डाणपुलाचे काम पूर्ण होऊन तीन वर्षे झाली तरी अद्याप दुसऱ्या बाजूच्या पुलाचे काम ठप्प आहे. उद्घाटनानंतर काहीच दिवसांत रस्त्याची दुर्दशा झाल्याने नैर्त्रुत्य रेल्वेने कंत्राटदाराला दंड ठोठावला होता. सध्या या रस्त्याची भीषण परिस्थिती झाली असून उड्डाणपुलाची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी पत्राद्वारे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी केली आहे.