For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मतदानाचा तिसरा टप्पा

06:48 AM May 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
मतदानाचा तिसरा टप्पा
Advertisement

लोकसभा निवडणुकीसाठीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान आज होत आहे. तळपत्या सूर्याच्या त्रासदायक उपस्थितीतही भारतीय मतदार आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. कोणीतरी आवाहन केले म्हणून, कोणीतरी येण्याजण्याची व्यवस्था केली म्हणून नव्हे तर हे आपले कर्तव्य आहे या भावनेने प्रत्येकाने मतदान केले पाहिजे. हा आग्रह असण्याची गरजच नसून तो कर्तव्याचा भाग असल्याने, हक्क मागणाऱ्या प्रत्येकाने कर्तव्यपूर्ती केलीच पाहिजे. त्यामुळे इतर कोणीतरी मतदान करण्याची अपेक्षा करण्यापेक्षा आपला हक्क आपण बजावणार हा प्रत्येकाचा निश्चय हवा. गेल्या काही दिवसांमध्ये देशातील अनेक मान्यवर नेते या भागात आले आणि त्यांनी आपले विचार जनतेसमोर ठेवले आहेत. वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी आपले जाहीरनामे जनतेसमोर ठेवले आहेत. मात्र यापैकी सर्वांनीच लोकांच्या या प्रश्नांवर प्रत्यक्ष चर्चा करण्यापेक्षा एकमेकांवर टीका करण्यात फार वेळ घालवला. लोकांच्या पुढे असणाऱ्या प्रश्नांवर बोलण्याऐवजी व्यक्तिगत धुनी धुण्यातच आपल्याला अधिक रस आहे हे दाखवून दिले. देशाचे भवितव्य घडवणाऱ्या, प्रत्येक पाच वर्षांनी येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदार कोणत्या पद्धतीचा विचार करत आहे आणि त्याला कोणत्या प्रकारची राज्यपद्धती आवडली आहे याचे उत्तर या मतदानातून मिळत असते. पहिल्या दोन टप्प्यांमध्ये निम्म्याच मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला तर निम्मे लोक निक्रिय राहिले. त्यामुळे त्या त्या भागात येणारा निकाल हा अर्ध्या लोकसंख्येने मनावर न घेतलेला असेल. अशा मंडळींना नंतर तक्रार करण्यास जागा नाही. आपल्याला ज्या पद्धतीचे राज्यकर्ते हवे आहेत त्या पद्धतीचे राज्यकर्ते आणण्यासाठी अनेकदा उत्साहात मतदान होत असते. तर अनेकदा राज्यकर्त्यांवर नाराजी प्रकट करण्यासाठी कमी मतदान होते. ही टक्केवारी फार मोठ्या संख्येने वाढली असे अनेक निवडणुकांमध्ये दिसलेले नाही. निवडणूक आयोगाने पहिल्या दोन टप्प्यांमध्ये आधी जाहीर केलेल्या आकडेवारीपेक्षा नंतरची आकडेवारी वाढली असल्याने त्याबाबत एकीकडे जनता शंका घेत असताना हे मतदान होत आहे. ज्या भागात मंगळवारी मतदान होत आहे, तिथली सुज्ञ जनता आपल्या म्हणण्याचे प्रतिबिंब मतदानातून उमटवून राजकारण्यांना योग्य तो संदेश देईल अशी अपेक्षा आहे. समाजातील सुशिक्षितवर्गाचे प्रमाण वाढत असताना आणि मतदान वाढावे यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवल्या जात असताना मतदानाची टक्केवारी का वाढत नाही, हा व्यवस्थेपुढे मोठा प्रश्न आहे. मात्र त्यावर विचार होताना दिसत नाही. निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या कार्यक्रमानुसार नोकरशाही वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवताना दिसून आली. मात्र नोकरशहांनी जनतेसमोर जाऊन मतदानासाठी कितीही आवाहन केले तरी त्यांच्या म्हणण्याला फारसे महत्त्व नसते. वृत्तपत्रांमध्ये झळकण्यापुरते आणि निवडणूक आयोगाच्या फाईलमध्ये कात्रणरूपाने साठण्यापुरते हे काम चांगले आहे. सरकारी योजनांचे लाभार्थी, ठेकेदार, पुरवठादार, खाजगी उमेदवार आणि कनिष्ठ नोकरवर्ग यांना घेऊन किंवा सरकार दरबारी मानमरातब मिळवणारे, पुरस्कारांचे आणि सरकारी समित्यांवर झळकणारे समाजातील इलीट क्लासचे प्रतिनिधी यांचा प्रभाव लोकांवर पडत नाही. एखादाच नोकरशहा जनतेशी आधीपासून बांधिलकी मानून त्यांच्याशी जोडला गेला असेल तर त्याच्या आवाहनाचा लोकांच्यावर चांगला परिणाम होतो. मात्र अलीकडच्या काळात राज्यातील अनेक नोकरशहा जनतेपासून स्वत:ला दूर ठेवण्याचा वारंवार प्रयत्न करतात. लोकांशी जोडल्या जाणाऱ्या उपक्रमापासून दूर राहण्याबरोबरच आपल्या कार्यालयात ठराविक वेळेतच लोकांनी भेटले पाहिजे असे सांगून त्यांच्यासाठी दरवाजे बंद करणारे अधिकारी वाढत असल्याने लोकांचा आणि अधिकाऱ्यांचा थेट संपर्क संपलेला आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनाला फारसे महत्त्व उरत नाही. त्याची प्रचिती गेल्या दोन टप्प्यात आलेली आहेच. तरीसुद्धा उर्वरित सगळ्या टप्प्यांमध्ये हीच प्रक्रिया राबवली जाईल. कारण निवडणूक आयोगाने ठरवून दिलेले कार्यक्रम उरकणे हा या व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग ठरतो. याशिवाय सरकारी यंत्रणेमध्ये असलेल्या मनुष्यबळाची कमतरता, बाहेरून विविध विभागातील लोकांना निवडणुकीच्या कामावर घेण्यासाठी आणि त्यांच्याकडून काम करून घेण्याची होणारी कसरत, त्यातून जबाबदारी टाळण्यासाठी वेगवेगळ्या विभागाच्या लोकांकडून लढवल्या जाणाऱ्या युक्त्या या सगळ्या अडथळ्यांना पार करत थकवणाऱ्या अशा या कामावर कोणी प्रेम करावे म्हटले तर ते खूपच अवघड आहे. ही या सगळ्या मागची दुसरी बाजू! त्यामुळे सरकारी आवाहनापेक्षा प्रत्येकाने स्वत:च्या जबाबदारीला जागून मतदान करणे आवश्यक ठरते. सध्या ज्या भागात मतदान होणार आहे तिथल्या अनेक समस्या केंद्र सरकारशी संबंधित आहेत. लोकांना आपल्या प्रश्नाबाबतचा आवाज मतदानातून उमटवता येणे शक्य आहे. आपल्या मागण्यांकडे होणारे दुर्लक्ष, जनतेला गृहीत धरून रखडवल्या जाणाऱ्या योजना या सगळ्याकडे निक्रियपणे पाहणारे लोकप्रतिनिधी यांना आपल्या प्रश्नांची जाणीव करून देण्यासाठी निवडणूक ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. त्यातून उमटणारा आवाज जितका प्रभावी असेल तितकी लोकशाही अधिक बळकट होते. त्यामुळे लोकांच्या प्रश्नांकडे राजकारणी अधिक गंभीरपणे लक्ष देऊ लागतात. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक शिवाय कोकण अशा मोठ्या टप्प्यात आज मतदान होत आहे. इथल्या जनतेच्या विचारांचे प्रतिबिंब मतदानातून उमटले तरच या भागातील प्रश्नांकडे राजकीय पक्ष अधिक गांभीर्याने पाहू शकतील. त्यामुळे जनतेचा आवाज म्हणून जनतेने या मतदान प्रक्रियेकडे पाहिले पाहिजे. जे काम आपल्या मागण्यांच्या माध्यमातून होऊ शकत नाही ते संघटितरित्या मतदानातून निर्माण होणाऱ्या दबावामुळे होऊ शकते. त्या दृष्टीने या भागातील अनेक प्रश्न मार्गी लागणे अंतिमत: जनतेच्याच हाती आहे. त्यामुळे आपली ही शक्ती जनतेने कायम ठेवणे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर मतदान करणे आवश्यक आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :

.