For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महुआ मोईत्रा यांना तिसऱ्यांदा नोटीस

06:33 AM Jan 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
महुआ मोईत्रा यांना तिसऱ्यांदा नोटीस
Advertisement

बंगला खाली करण्याची सूचना

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांना सरकारी बंगला तत्काळ रिकामा करण्याची नोटीस पाठविण्यात आली आहे. संसदेच्या मालमत्ता संचालनालयाने त्यांना ही नोटीस पाठवली. पॅश फॉर क्वेरी प्रकरणात महुआ यांचे लोकसभा सदस्यत्व 8 डिसेंबर 2023 रोजी रद्द करण्यात आल्यानंतर त्यांना दोनदा बंगला रिकामा करण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, अद्याप कार्यवाही न झाल्याने आता तिसरी नोटीस बजावण्यात आली आहे.

Advertisement

महुआ यांना तात्काळ बंगला रिकामा करण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार येत्या आठवड्यातच मालमत्ता संचालनालयाचे अधिकारी त्यांच्या बंगल्यावर भेट देऊन बंगला रिकामा झाला की नाही याची खात्री करतील, असे केंद्रीय गृहनिर्माण आणि व्यवहार मंत्रालयातील एका सूत्राने सांगितले.

यापूर्वी महुआ यांना 7 जानेवारीपर्यंत बंगला रिकामा करण्यास सांगण्यात आले होते. 8 जानेवारी रोजी त्यांना बंगला अद्याप का रिकामा केला नाही, अशी नोटीस बजावली. यानंतर 12 जानेवारीला त्यांना दुसरी नोटीस पाठवण्यात आली. त्यानंतर आता 16 जानेवारीला तिसरी नोटीस पाठवण्यात आली असून बुधवारी सदर नोटीस त्यांना प्राप्त झाली आहे.

भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मोईत्रा यांच्यावर पैसे घेऊन लोकसभेत प्रश्न विचारल्याचा आरोप केला होता. याबाबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार केली होती. या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या शिष्टाचार समितीच्या अहवालात त्यांना दोषी ठरवण्यात आले होते. त्यानंतर 8 डिसेंबर 2023 रोजी महुआ यांच्या हकालपट्टीचा प्रस्ताव लोकसभेत मांडण्यात आला होता. यादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वादावादी झाली. महुआ यांनी लोकसभेतून आपल्या हकालपट्टीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तसेच निशिकांत दुबे यांच्या आरोपांविरोधात महुआ मोईत्रा यांनी दिल्ली उच्च न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला होता. हे प्रकरण सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

Advertisement
Tags :

.