भाजप उमेदवारांची तिसरी यादी जाहीर
आतापर्यंत एकूण 38 उमेदवार निश्चित : उत्तरेत 24, दक्षिणेत 14 नावांची घोषणा
प्रतिनिधी/ पणजी
राज्यातील दोन्ही जिल्हा पंचायतीसाठी येत्या दि. 20 रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत दोन याद्यांच्या माध्यमातून 29 उमेदवारांची घोषणा केलेल्या भारतीय जनता पार्टीने काल बुधवारी तिसरी यादी जाहीर करून आणखी नऊ उमेदवारांची घोषणा केली आहे.
भाजपने रविवारी आपल्या 19 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर मंगळवारी 10 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करून उमेदवार संख्या 29 वर नेली होती. काल बुधवारी तिसऱ्या यादीद्वारे त्यात आणखी 9 उमेदवारांची भर घालण्यात आली आहे. त्यानुसार आतापर्यंत त्यांच्या घोषित उमेदवारांची संख्या 38 वर पोहोचली आहे. त्यात उत्तरेत 24 आणि दक्षिणेत 14 उमेदवारांचा समावेश आहे. उमेदवारी अर्ज दाखल प्रक्रिया दि. 1 डिसेंबरपासून प्रारंभ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर बहुतेक सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या निवडक उमेदवारांच्या नावांची घोषणा करणे सुरू केले आहे. त्यात आतापर्यंत भाजप आणि आपकडून प्रत्येकी तीन याद्या, तर काँग्रेसकडून एकमेव यादी जाहीर करण्यात आली आहे.