दोघात तिसरा...मुख्यमंत्रिपद विसरा?
कर्नाटकात सध्या सुरू असलेल्या सत्तासंघर्षावर मात करण्यासाठी हायकमांड मल्लिकार्जुन खर्गे यांना पुन्हा राज्याच्या राजकारणात पाठवणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण, सिद्धरामय्या यांना बदलून डी. के. शिवकुमार यांना मुख्यमंत्रिपदावर बसविले तरी सत्तासंघर्ष उफाळणार, हे निश्चित आहे. नेतृत्वबदल झाला नाही तरी संघर्ष हा होणारच अशी स्थिती आहे. अशा परिस्थितीत मधला मार्ग म्हणून मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
एआयसीसीचे अध्यक्ष व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी विजापूर येथील एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये खळबळ माजली आहे. अधूनमधून मुख्यमंत्रिपदावर एखाद्या दलित नेत्याची वर्णी लागावी, ही मागणी पुढे येत असते. सध्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे पुढील पाच वर्षे आपणच मुख्यमंत्रिपदावर राहणार असे सांगितले आहेत. सिद्धरामय्या यांचा अडीच वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्रिपदावर बसण्यासाठी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची धडपड सुरू आहे. हायकमांडने हस्तक्षेप करीत नेतृत्वबदलाच्या मुद्द्यावर कोणीही उघडपणे वक्तव्य करू नये, असे बजावल्यानंतरही सिद्धरामय्या व शिवकुमार या दोन्ही नेत्यांचे समर्थक आपापल्या नेत्यांच्या बाजूने उघड वक्तव्य करू लागले आहेत. परिस्थिती अशी असताना मल्लिकार्जुन खर्गे यांनी विजापूर येथील एका कार्यक्रमात आपले मन मोकळे केले आहे.
कर्नाटकाच्या राजकारणात परतण्याची त्यांची इच्छा आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आणखी दहा महिने म्हणजे जून 2026 पर्यंत त्यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाल आहे. 83 वर्षांचे मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर सध्या एआयसीसीच्या अध्यक्षपदाबरोबरच राज्यसभेचे विरोधी पक्षनेतेपदही आहे. आणखी दहा महिन्यांनंतर राज्यसभा सदस्यत्वाची मुदत संपल्यानंतर ते राष्ट्रीय राजकारणातच राहणार की कर्नाटकाच्या राजकारणात त्यांचा प्रवेश होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. डी. के. शिवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली कर्नाटकात निवडणुका झाल्या. पक्ष सत्तेवर आला. मुख्यमंत्रिपदावर मात्र सिद्धरामय्या यांची वर्णी लागली. असा अनुभव मल्लिकार्जुन खर्गे यांच्या बाबतीतही झाला आहे. आपण पक्ष सत्तेवर आणला, मुख्यमंत्रिपदावर मात्र एस. एम. कृष्णा यांची निवड झाली, असे सांगत आपल्यावरही एक-दोन वेळा अशी वेळ आली होती, हेच सुचवण्याचे काम मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले आहे.
यापूर्वी दोनवेळा मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचण्याची संधी चालून आली होती. त्यावेळी स्वत:हून त्यांनी माघार घेतली होती. 1990 च्या दशकात तत्कालिन मुख्यमंत्री वीरेंद्र पाटील यांना बाजूला काढून अन्य नेत्याच्या खांद्यावर मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपविण्याची तयारी काँग्रेसने केली होती. त्यावेळीही मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी ठळक चर्चेत होते. त्यावेळच्या राजकीय परिस्थितीनुसार एस. बंगारप्पा यांचे नाव सुचवून ते स्वत:हून बाजूला झाले होते. 2004 मध्ये काँग्रेस-निजद युतीची सत्ता आली त्यावेळी पुन्हा एकदा मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी आघाडीवर होते. स्वत: माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी मुख्यमंत्रिपदासाठी तुम्हीच योग्य आहात, त्यामुळे ते पद स्वीकारा, असे सांगत मुख्यमंत्रिपदासाठी त्यांच्यावर दबाव आणला होता. त्यावेळीही स्वत:च माघार घेत राज्याच्या राजकारणापासूनच अलिप्त राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. त्यानंतरही अधूनमधून मुख्यमंत्रिपदासाठी त्यांच्या नावाची चर्चा होती.
मुख्यमंत्रिपदापेक्षाही मोठ्या पदावर काम केल्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी असला तरी एकदाही आपण मुख्यमंत्री झालो नाही, याची खंत मनात आहे. समविचारी नेते ज्या ज्यावेळी त्यांना भेटतात, त्यावेळी त्यांनी ही खंत बोलून दाखवली आहे. कर्नाटकात सध्या सुरू असलेल्या सत्तासंघर्षावर मात करण्यासाठी हायकमांड मल्लिकार्जुन खर्गे यांना पुन्हा राज्याच्या राजकारणात पाठवणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण, सिद्धरामय्या यांना बदलून डी. के. शिवकुमार यांना मुख्यमंत्रिपदावर बसविले तरी सत्तासंघर्ष उफाळणार, हे निश्चित आहे. नेतृत्वबदल झाला नाही तरी संघर्ष हा होणारच अशी सध्या तरी स्थिती आहे. अशा परिस्थितीत मधला मार्ग म्हणून मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये राजकीय क्रांती होणार, असे मंत्री राजण्णा वारंवार सांगत आहेत. त्यामुळे ते दिवस जवळ आले का? हे एक-दोन महिन्यात स्पष्ट होणार आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांचे चिरंजीव मंत्री प्रियांक खर्गे यांनी आपले राजकीय भविष्य ते आपणच ठरवतात, त्यांचा निर्णय काय असणार आहे, हे सोनिया आणि राहुल गांधी यांनाही मान्य असणार आहे, असे सांगितले आहे. त्यामुळे सत्तासंघर्ष थोपवण्यासाठी मल्लिकार्जुन खर्गे कर्नाटकाच्या राजकारणात परतणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पक्षाचे प्रभारी रणदीपसिंग सूरजेवाला यांनी आमदारांशी चर्चा करून अहवाल दिल्यानंतर आता मुख्यमंत्री सिद्धरामय्या हेही गेल्या दोन-तीन दिवसांपासून प्रत्येक जिल्ह्यातील आमदारांना बोलावून त्यांच्याशी चर्चा करू लागले आहेत. 1 ऑगस्टपर्यंत ही चर्चा होणार आहे. पहिल्याच दिवशी मंगळवारी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना बाजूला ठेवून मुख्यमंत्र्यांनी आमदारांशी चर्चा केली. प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री, मंत्री व आमदार यांना बोलावून त्यांना विश्वासात घेण्याबरोबरच त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी हाती घेतले आहे. सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना प्रतिकूल अशाच असल्या तरी त्यांनी मात्र आपला संयम सोडला नाही. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावाची मुख्यमंत्रिपदासाठी चर्चा झाली तर यात गैर काय आहे? मुख्यमंत्र्यांनी जिल्हानिहाय मंत्रि-आमदारांच्या बैठकीत आपल्याला डावलले, यातही गैर काही नाही, असे सांगत त्यांनी संयमाचे दर्शनच घडवले आहे. अलीकडे सिद्धरामय्या व शिवकुमार यांच्या दिल्लीवाऱ्या वाढल्या आहेत.
विजापूर येथील जाहीर कार्यक्रमात मल्लिकार्जुन खर्गे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर कर्नाटकाच्या राजकीय पटलावर पुन्हा दलित मुख्यमंत्र्याची चर्चा सुरू झाली आहे. ते ज्येष्ठ आहेत, प्रामाणिक आहेत, कोणताही हुद्दा यशस्वीपणे हाताळण्याची त्यांच्यात क्षमता आहे. ते उत्तम व अनुभवी संसदपटू आहेत. मुख्यमंत्रिपदावर त्यांची निवड झाली तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार होणार आहे. कर्नाटकात दलितांना उच्चपद आजही मिळाले नाही. त्यामुळे मुख्यमंत्रिपदासाठी मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव ठळक चर्चेत आले तर यात गैर काय आहे? असा प्रश्न डॉ. एच. सी. महादेवप्पा, संतोष लाड, प्रियांक खर्गे आदी मंत्र्यांनी उपस्थित केला आहे. ही चर्चा सिद्धरामय्या व शिवकुमार या दोन्ही नेत्यांच्या समर्थकात धक्का देणारी ठरली आहे. तब्बल 25 वर्षांनंतर मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपले मन मोकळे केले आहे. याचाच अर्थ कर्नाटकाच्या राजकारणात त्यांचा प्रवेश होणार की दहा महिन्यांनंतर पुन्हा राज्यसभेवर त्यांची वर्णी लागणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.