पाटण तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ
नवारस्ता :
पाटण तालुक्यातील मल्हारपेठ परिसरातील विहे येथील बंद घरातून अज्ञात चोरट्यांनी साडेआठ तोळे सोने आणि रोकड लंपास नेल्याची ताजी घटना असतानाच पुन्हा विहे आणि उरूल या दोन ठिकाणी घरफोडी झाली आहे. यामध्ये चोरट्यांनी दोन तोळे सोने, पन्नास हजाराची रोकड लंपास करून धुमाकूळ घातला आहे.
शनिवार 28 जून रोजी रात्री विहे येथील आनंदराव मोरे यांच्या बंद घरातील साडेआठ तोळे सोने व वीस हजार रोकड लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर विहे येथील मनोज जंबुरे यांच्या घरामध्ये 30 रोजी चोरट्याने प्रवेश केला. तेथील दोन तोळे सोने व पन्नास हजार रुपये चोरून नेले आहेत.
दरम्यान, त्याच दिवशी जंबुरे कुटुंब पंढरपूर या ठिकाणी देवदर्शनाला गेले होते. घर बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी संपूर्ण घराची झडती घेऊन नुकसान करून चोरी केली आहे. तर कराड-पाटण मार्गावर विहे येथे असणारे दोन दुकान गाळे देखील फोडले. मात्र त्यामध्ये त्यांना काही मिळाले नाही. याशिवाय उरूल येथे शेतामध्ये असणाऱ्या प्रकाश निकम यांचा बंद असणारा बंगला फोडून घरातील साहित्याची चोरी झाली आहे.