Sangli Special Story : चोरटे विमानाने पळाले…पण शेवटी जाळ्यात सापडले !
गांधीधाम–बेंगळुरू एक्सप्रेसमधील २३ तोळ्यांची सोन्याची चोरी;
सांगली : गांधीधाम-बेंगळुरू एक्सप्रेसमधील सोन्या चोरीच्या प्रकरणाने सांगली-मिरज परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवर थेट प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. २३ तोळ्यांचे दागिने चोरल्यानंतर ही टोळी सलग ३ शहरांतून फिरते… आणि अखेर गोव्याहून विमानाने थेट दिल्लीला उड्डाण करते.
निवडणूक काळात कडेकोट बंदोबस्त असल्याचा दावा केला जात असताना ही टोळी कोणाच्या नजरेत न येता प्रवास करत राहते. हा प्रश्न या घटनेतून ठळकपणे पुढे येतो. ८ दिवसांच्या तपासानंतर उलगडलेला हा थरारक प्रवास…
२६ नोव्हेंबर. गर्दीने खचाखच भरलेली एक्सप्रेस. मिरज रेल्वे स्थानकावर उतरण्याच्या गडबडीत सुरत येथील महिलेच्या बॅगमधील २३ तोळ्यांचे दागिने ५ सदस्यांची टोळी हातोहात चोरते. तक्रार नोंद होताच लोहमार्ग पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.
सुरुवातीचे धागेदोरे मिरज रेल्वे यार्डमधील सीसीटीव्हीत दिसलेल्या एका संशयितापासून मिळाले. त्याच्याच छायाचित्रावरून तपासाचा थांगपत्ता मिळू लागला. तांत्रिक तपास, डंप डेटा व टॉवर लोकेशन विश्लेषणातून पोलिसांना टोळीचा सांगलीपर्यंतचा मागोवा मिळाला. त्यानंतर कोल्हापूर आणि पुढे गोव्यातील हालचाली स्पष्ट झाल्या.
निवडणूक आचारसंहिता लागू असताना “कडेकोट” बंदोबस्त असल्याचा दावा केला जात असतानाही ही टोळी सांगली–कोल्हापूर–गोवा असा मार्ग काढत ३० नोव्हेंबरला गोव्याहून विमानाने दिल्लीला पोहोचते. हा तपासातील सर्वात धक्कादायक भाग.
नंतर तांत्रिक जाळं अधिक घट्ट होत गेलं आणि टोळी नवी दिल्ली रेल्वे स्टेशन परिसरात आढळली. त्याठिकाणी सीपीडीएसच्या तेजस्विनी पथकाने ही ४ जणांचीe टोळी जेरबंद केली.
या टोळीचा प्रमुख ३४ वर्षीय कुलदीप हा हरियाणातील जिंद जिल्ह्यातील रहिवासी. त्याच्यासोबत अमित कुमार (४५), हवा सिंग (६५) आणि मोनू (३२) असे तिघे होते. या सर्वांनी एकत्र येऊन २३ तोळ्यांची चोरी फत्ते केली होती.
निवडणूक काळातील कडक सुरक्षा असूनही या टोळीने सलग ३ शहरांतून सुटत उड्डाणापर्यंतचा प्रवास केला. हा पोलिसांसाठी तितकाच चकित करणारा मुद्दा. मात्र शेवटी तांत्रिक तपास आणि सततच्या पाठलागामुळे पोलिसांनी प्रतिष्ठा राखत या टोळीला पकडलं.
आता या चोरट्यांकडील २३ तोळ्यांचे दागिने परत मिळवणे हेच पोलिसांसमोरचं पुढचं मोठं आव्हान आहे.