शहर-उपनगरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच
स्टेशन रोडवर दुकान फोडले : शाहूनगरात दोन घरफोड्या
बेळगाव : दसरोत्सवाच्या काळातही बेळगाव शहर व उपनगरात चोऱ्या, घरफोड्या सुरूच आहेत. हेडपोस्ट ऑफिससमोरील (स्टेशन रोड) एक मिठाई दुकान फोडून चोरट्यांनी 35 हजाराचा ऐवज पळविला असून चोरट्याचे हे कृत्य सीसीटीव्हीत कैद झाले आहे. विजयादशमी दिवशी शनिवार दि. 12 ऑक्टोबर रोजी सकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला आहे. प्रतापराम दवासी यांनी कॅम्प पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी राजस्थान मिठाईवाला या मिठाई दुकानाचे शटर उचकटून चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. कॅम्प पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. एका चोरट्याची छबी सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतले आहे. शटर उचकटून गल्ल्यातील 30 हजार रुपये रोख रक्कम व दोन हजार रुपयांची चॉकलेट चोरट्यांनी पळविली आहेत. या प्रकरणी कॅम्प पोलीस पुढील तपास करीत आहेत.
शाहूनगरातही चोरी
शाहूनगर परिसरात दोन बंद घरे फोडून पाच लाखांचा ऐवज पळविण्यात आला आहे. गुरुवारी 10 ऑक्टोबर रोजी ही घटना उघडकीस आली आहे. साई कॉलनी येथील निलेश पाटील व परशुराम राठोड यांची घरे फोडून सोन्या-चांदीचे दागिने पळविण्यात आले आहेत. एपीएमसी पोलीस स्थानकात या दोन्ही घटनांची नोंद झाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.