लांजात फ्लॅट फोडून चोरट्यांचा पावणेतीन लाखांच्या ऐवजावर डल्ला !
कोर्ले फाटा येथील घटना, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा
लांजा प्रतिनिधी
दिवसाढवळ्या फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने फ्लॅटमधील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 2 लाख 71 हजार रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला. लांजा शहरातील कोर्ले फाटा येथील रॉयल पार्प या निवासी इमारतीमध्ये रविवारी ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील कोर्ले फाटा येथील रॉयल पार्प या निवासी इमारतीमध्ये 308 नंबरच्या फ्लॅटमध्ये रुहिदा हनीफ नेवरेकर (53) यांचा तिसऱ्या मजल्यावर फ्लॅट आहे. रुहिदा या एकट्याच फ्लॅटमध्ये राहतात. रविवार 29 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता त्या त्याच बिल्डिंगमधील पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या त्यांची जाऊ सहिदा आयुब नेवरेकर यांच्याकडे प्लॅटला कुलूप लावून गेल्या होत्या. याचदरम्यान चोरट्याने रुहिदा यांच्या दरवाजाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करत बेडरूममध्ये असलेले लाकडी कपाट चावीने उघडले आणि आतील सोने, चांदीच्या ऐवजावर डल्ला मारला. यामध्ये 2.5 तोळे वजनाच्या 1 लाख 25 हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या 2 बांगड्या, 12 ग्रॅम वजनाची 50 हजार रुपये किंमतीची सोन्याची चेन, 5 ग्रॅम वजनाच्या 25 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे कानातील रिंग जोड, 5 ग्रॅम वजनाचे 25 हजार रुपये किंमतीच्या सोन्याचे कानातील टॉप जोडी, 2 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या 30 हजार रुपये किंमतीच्या 3 अंगठ्या, 1 तोळा वजनाची 4 हजार रुपये किंमतीची चांदीची चेन आणि 12 हजार रोख रक्कम असा एकूण 2 लाख 71 हजार रुपयांच्या ऐवजावर चोरट्याने डल्ला मारला.
दरम्यान, या घटनेची खबर मिळताच लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक देवकन्या मैंदाड, पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र कांबळे, नासिर नावळेकर, कॉन्स्टेबल सुयोग वाडकर, चालक किरण डोर्लेकर हे घटनास्थळी दाखल झाले होते.