पुण्यात मोबाईल शॉपीवर चोरट्यांचा डल्ला, 53 लाखांचा ऐवज लंपास
पुणे / वार्ताहर :
कोथरूड परिसरातील डहाणूकर कॉलनीतील मोबाईल शॉपी फोडून चोरटय़ांनी रोख रकमेसह तब्बल 200 मोबाईल चोरुन नेले. 23 आणि 24 सप्टेंबरला ही घटना घडली. याप्रकरणी गौरव शिंदे (31 रा. वारजे) यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार गौरव शिंदे यांची डहाणूकर कॉलनीतील कलाकृती हौसिंग सोसायटीमध्ये मोबाईल शॉपी आहे. 23 आणि 24 सप्टेंबरला मध्यरात्रीच्या सुमारास तीन चोरटय़ांनी शॉपीचे शटर उचकटून आतमध्ये प्रवेश केला. गल्ल्यातील 1 लाख 64 हजारांची रोकड आणि वेगवेगळ्या कंपनीचे नवीन 200 मोबाईल असा 53 लाख 13 हजारांचा ऐवज चोरुन नेला. दुसऱ्या दिवशी सकाळी दुकान उघडण्यासाठी आलेल्या गौरवला मोबाईल शॉपीत चोरी झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी त्यांनी तातडीने कोथरूड पोलीस ठाण्यात धाव घेउन तक्रार दाखल केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक बालाजी सानप पुढील तपास करीत आहेत.
कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी सांगितले की सदर चोरीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. यामध्ये दोन चोरटे दुकानाचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश करताना तर एक चोरटा दुकानाच्या बाहेर देखरेख करताना आढळून आला आहे. पोलिसांची पदके आरोपींचा शोध घेत आहेत.