Solapur Crime : मंगळवेढा बसस्थानकावर चोरट्याने पळविले वृद्धेचे दागिने
एसटी बसमध्ये चढताना वृद्ध महिलेला गंडा
मंगळवेढा : मंगळवेढा बसस्थानकावर बसमध्ये चढत असताना एका निराधार व वृद्ध महिलेच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी वृद्ध महिला मालन जगन्नाथ रणदिवे (वय ७७, रा. बोराळे) घरी एकटीच राहावयास आहे. १३ ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजता तिची मुलगी निर्मला वाघमारे (रा. सोलापूर) हिच्याकडे गेली होती. तद्नंतर दुपारी तीन वाजता सोलापूरवरून बोराळे गावी जाण्याकरिता फिर्यादी निघाली. सायंकाळी ४.४० वाजता मंगळवेढा बसस्थानकावर पोहचली.
सायंकाळी पाच वाजता मंगळवेढा-अरळी जाणारी बस असल्याने त्या एसटी बसमध्ये चढताना चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मणीमंगळसूत्र चोरुन नेले. वृद्ध महिला सीटवर बसल्यानंतर लक्षात आले. गळ्यात असलेले सोन्याचे मणी दिसून आले नाहीत. घडला प्रकार नातवाला सांगितल्यानंतर नातू व आजी यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यामध्ये येऊन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, मंगळवेढा बसस्थानकावर प्रवाशांचे दागिने व मोबाईल चोरण्याची मालिका सुरू आहे. या घटनेमुळे बसस्थानकावरील प्रवासी धास्तावले आहेत.