उगार खुर्द येथील घरफोडी प्रकरणी अथणीच्या चोरट्याला अटक
दोन चोऱ्यांची कबुली, 13 लाखांचे दागिने जप्त
प्रतिनिधी/ बेळगाव
उगार खुर्द, ता. कागवाड येथील घरफोडी प्रकरणी अथणी येथील एका युवकाला अटक करून कागवाड पोलिसांनी त्याच्याजवळून 12 लाख 72 हजार रुपये किमतीचे दागिने जप्त केले आहेत. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी सोमवारी पत्रकारांना ही माहिती दिली आहे.
अस्लम मेहबूब सनदी राहणार अथणी असे त्याचे नाव आहे. रेल्वेस्टेशन रोड, उगार खुर्द येथील युवराज शंकर गाडीव•र यांच्या घरी चोरी झाली होती. यासंबंधी 5 सप्टेंबर 2025 रोजी कागवाड पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी अस्लमच्या मुसक्या आवळून दागिने जप्त केले आहेत.
अथणीचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत मुन्नोळी यांच्या मार्गदर्शनाखाली अथणीचे पोलीस निरीक्षक संतोष हळ्ळूर, कागवाडचे पोलीस उपनिरीक्षक राघवेंद्र खोत, मल्लिकार्जुन तळवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी अस्लमला अटक करून त्याच्याजवळून एकूण दोन प्रकरणातील 127 ग्रॅम सोने, 23 ग्रॅम चांदीचे दागिने जप्त केले आहेत.