विजापुरात 26 लाखाच्या दागिन्यासह चोरटा जेरबंद
वार्ताहर/विजापूर
विजापूर शहरात सुरू असलेल्या चोरीच्या प्रकरणांचा तपास करण्यात विजापूर पोलिसांना यश आले असून या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून 26,82,500 ऊपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. रविवारी पत्रकार परिषदेत जिल्हा पोलीस अधीक्षक ऋषिकेश सोनावणे यांनी ही माहिती दिली. अश्फाक सैफनसाब शेख जातगार असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. तपासादरम्यान आरोपीचा जलनगर, एपीएमसी यार्ड पोलीस ठाणे आणि आदर्शनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन चोरीच्या गुह्यांमध्ये सहभाग असल्याचे समोर आले. चोरीच्या गुह्यांचा तपास करण्यासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले होते. हे पथक महाराष्ट्रातील सांगली, पुणे, बागलकोट आणि बेळगाव या शेजारील जिल्ह्यात तपास सुरू असताना आरोपीस अटक केली असल्याचे त्यांनी सांगितले. या कारवाईत एएसपी रमण गौडा हत्ती, एस. मारिहाळ, डीवायएसपी बसवराज यलीगार, पोलीस अधिकारी मल्लया मठपती, सीताराम लमाणी, प्रेमा कूचबाल, कर्मचारी वाय. पी. कबाडे, एस. ए. बनपट्टी, महेश सालकेरी, जे. एस. वनंजकार सहभागी झाले होते.