सराईत चोरट्यास अटक, 10 तोळे सोने, अर्धा किलो चांदीसह 7 लाखांचा मुद्देमाल जप्त
स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
कोल्हापूर प्रतिनिधी
गेल्या 2 वर्षात जिह्यात विविध ठिकाणी 8 घरफोड्या करणाऱ्या सराईत परराज्यातील चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सापळा रचून जेरबंद केले. सुमित महादेव निकम (वय 27 रा.गजबरवाडी, ता.निपाणी, बेळगांव) असे या त्याचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 10 तोळे सोन्याचे दागिने व अर्धा किलो चांदी असा सुमारे 7 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मार्केट यार्ड परिसरात सापळा रचून मंगळवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूर जिह्यातील घरफोडीचे गुन्हे उघड करा असे आदेश पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी जिह्यतील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना क्राईम आढावा बैठकीत दिले होते. त्यानुसार घरफोड्या रोखण्यासाठी तसेच झालेल्या घरफोड्या उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली एका विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. या पथकातील अंमलदार सुरेश पाटील, सागर माने, तुकाराम राजीगरे यांना गोपनिय सुत्रांकडून माहिती मिळाली होती की, कर्नाटकातील सराईत गुन्हेगार सुमित निकम हा चोरीतील दागिने विक्रीसाठी कोल्हापुरात येणार आहे. त्यानुसार पोलीसांनी मार्केट यार्ड परिसरात 13 फेब्रुवारी रोजी सापळा रचला होता. पोलीसांनी सुमितला ताब्यात घेवून त्याची कसून चौकशी केली. त्याने गेल्या दोन वर्षात कोल्हापूर जिह्यात मुरगूड,राधानगरी, शहापूर, आजरा, कुरुंदवाड या ठिकाणी आठ ठिकाणी घरफोड्या केल्याची कबूली दिली. या घरफोड्यातील 10 तोळे सोन्याचे दागिने व चांदीचे 500 ग्रॅम वजनाचे दागिने असा 6 लाख 78 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शेष मोरे, तुकाराम राजीगरे, सुरेश पाटील, सागर माने, आयुब गडकरी, अमित मर्दाने, सुप्रिया कात्रट, यशवंत कुंभार, संजय पडवळ, संतोष पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.