कोविडविषयी सध्या काळजी करण्याची गरज नाही!
मुख्यमंत्री सिद्धरामय्या : जिल्हा इस्पितळांना खबरदारी उपाययोजनेच्या सूचना
प्रतिनिधी/ बेंगळूर
कोविडबद्दल सध्या काळजी करण्याची गरज नाही. परंतु, खबरदारी उपाययोजना म्हणून जिल्हा इस्पितळांना व्हेंटिलेटर, ऑक्सिजन आणि औषधे यासह आवश्यक साहित्योपकरणे सज्ज ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले आहेत.
कोविड परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सिद्धरामय्या यांनी सोमवारी आरोग्य आणि शिक्षण खात्याचे मंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी सध्या काळजी करण्याची गरज नाही, असे सांगितले. तथापि, संभाव्य परिस्थितीचा अंदाज बांधून सर्व सुविधा आणि वैद्यकीय उपकरणे तयार ठेवावीत. वृद्ध, गर्भवती महिला आणि हृदय किंवा फुफ्फुसाचा त्रास असलेल्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून मास्क घालणे हितकारक ठरेल. यासंबंधी जागरूकता निर्माण करावी, अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिली.
दर आठवड्याला किंवा आवश्यकता भासली तर दर तीन दिवसांनी परिस्थितीचा आढावा घ्यावा. जर गर्भवती महिलांना आरोग्यासंबंधी समस्या असतील तर त्यांना एका इस्पितळातून दुसऱ्या इस्पितळात हलविणे थांबवावे. सर्दी, खोकला किंवा ताप असलेल्या मुलांना पालकांनी शाळेत पाठवू नये. शाळांनीही याकडे लक्ष द्यावे. सर्दी किंवा ताप असलेल्या मुलांना घरी परत पाठवावे. प्रत्येकाने कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार राहावे, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी सल्ला दिला.
हेल्पलाईन सुरू करा!
जनतेची कोणतीही गैरसोय होऊ नये. त्यांना कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत का, याची खातरजमा करावी. जनतेच्या सोयीसाठी कोविड हेल्पलाईन सुरू करावी. येत्या काळात देशाबाहेरून येणाऱ्या प्रवाशांसाठी विमानतळांवर क्रीनिंग युनिट्स सुरू करावेत. सर्व जिल्ह्यांतील जिल्हा इस्पितळे पूर्णपणे सज्ज असावीत, असे निर्देश त्यांनी दिले.
सर्दी, ताप असेल तर मुलांना सुटी द्यावी : दिनेश गुंडूराव
सर्दी, ताप आढळल्यास मुलांना सुटी देण्याची सूचना शाळांना दिली जाईल, असे आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी सांगितले. कोविड परिस्थितीसंबंधी बेंगळुरातील बैठकीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते. आरोग्य खात्याने यापूर्वीच कोविड मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मुलांमध्ये कोविडचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. यासंदर्भात पालकांची काळजी घ्यावी. सर्दी, ताप असेल तर मुलांना शाळा प्रशासनाने सुटी द्यावी, असे ते म्हणाले.