For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आरक्षण नाही होणार तसूभरही कमी !

06:17 AM Sep 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
आरक्षण नाही होणार तसूभरही कमी
Advertisement

हरियाणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घणाघात, जम्मू-काश्मीरमध्ये घराणेशाहीवर हल्लाबोल

Advertisement

वृत्तसंस्था / दोडा, कुरुक्षेत्र

जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रणशिंग फुंकले आहे. जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत दलित, आदीवासी आणि अन्य मागासवर्गियांच्या आरक्षणाला तसूभरही धक्का लागणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन त्यांनी हरियाणातील कुरुक्षेत्र येथे जाहीर सभेत केले. जम्मू-काश्मीरमधील दोडा येथे विशाल प्रचारसभेत भाषण करताना काँग्रेस दुटप्पी आणि दांभिक असून  ‘नफरत की दुकान’ चालवित आहे, असा आरोप त्यांनी केला.

Advertisement

राहुल गांधी यांनी त्यांच्या अमेरिका दौऱ्यात केलेल्या वादग्रस्त विधानांचाही खरपूस समाचार घेतला. अमेरिकेत गांधी यांच्यासमवेत असणाऱ्या काही लोकांनी एका पत्रकाराला मारहाण केल्याचे प्रकरण घडले आहे. संबंधित पत्रकाराने स्वत: तसा आरोप केला आहे. रोहित शर्मा असे या पत्रकाराचे नाव आहे. त्या प्रकरणाचा अप्रत्यक्ष उल्लेख करत त्यांनी, काँग्रेस विदेशात भारताची बदनामी करत असून द्वेषाचे वातावरण निर्माण करण्यात मग्न असल्याचा आरोप केला.

प्रकरण काय आहे ?

रोहित शर्मा या भारतीय वंशाच्या अमेरिकन पत्रकाराने काँग्रेसच्या विदेश शाखेचे प्रमुख सॅम पित्रोडा यांना काही अवघड प्रश्न विचारले. त्यांची समर्पक उत्तरे त्यांना देता आली नाहीत. त्यामुळे त्यांच्या काही सहकाऱ्यांनी या पत्रकारला मारहाण आणि धक्काबुक्की केली असा आरोप या पत्रकाराने केला आहे. या पत्रकाराचा मोबाईलही काँग्रेस समर्थकांनी हिसकावला, असाही आरोप करण्यात येत आहे.

खर्गेंवरही शरसंधान

आम्हाला आणखी 20 लोकसभेच्या जागा मिळाल्या असत्या, तर आमचे सरकार देशात स्थापन झाले असते आणि आम्ही पंतप्रधान मोदी यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना कारागृहात डांबले असते, अशी भाषा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. आम्ही सरकार जनतेच्या हितासाठी चालवतो. पण काँग्रेसकडे लोकांना कारागृहात डांबण्यावाचून दुसरा कार्यक्रम नाही.

घराणेशाहीमुळे मोठी हानी

केवळ तीन कुटुंबांच्या तीन पिढ्यांनी जम्मू-काश्मीरची वाट लावली आहे. या भागाचा विकास करण्याऐवजी या घराण्यांनी स्वत:च्या तुंबड्या भरुन घेतल्या आहेत. आज या भागात शांतता नांदत असून लोक मोकळेपणाने आपला व्यवसाय करीत आहेत. आता पुन्हा हीच तीन घराणी सत्तेवर येऊ पहात असून लोकांनी त्यांना सत्तेपासून दूर ठेवून स्वत:चे हित साधावे, असे आवाहन त्यांनी केले.

आरक्षण सुरक्षितच !

भारतीय जनता पक्षाला 400 जागा मिळाल्यास आरक्षण धोक्यात येईल, असा अपप्रचार काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात केला होता. लोकांची दिशाभूल करण्याचा तो प्रयत्न होता. तथापि, आरक्षण संपविलेही जाऊ शकते, असे विधान राहुल गांधी यांनी त्यांच्या अमेरिका दौऱ्यात केले आहे. काँग्रेसच्या मनातले कारस्थान राहुल गांधींच्या या विधानामुळे बाहेर पडले आहे. तथापि, जोपर्यंत आम्ही आहोत, तो पर्यंत आरक्षणाला तसूभरही धक्का लागणार नाही, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणातल्या कुरुक्षेत्र येथील प्रचंड जाहीर सभेत दिला आहे. हरियाणात भारतीय जनता पक्ष सत्तासंपादनाची हॅटट्रिक करेल. या राज्याने आमच्या 10 वर्षांच्या सत्ताकाळात मोठी प्रगती अनुभवली आहे. आमच कार्य लोकांना माहीत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

दोडाला भेट देणारे प्रथम नेते

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जम्मू-काश्मीरच्या दोडा प्रदेशाला भेट देणारे गेल्या 50 वर्षांमधील प्रथम सर्वोच्च नेते ठरले आहेत. त्यांनी शनिवारच्या जाहीर सभेसाठी दोडाची निवड केली. हा भाग नेहमी दहशतवदी हल्ल्यांमुळे त्रस्त असतो. त्यामुळेच गेल्या पन्नास वर्षांमध्ये येथे कोणत्याही सर्वोच्च नेत्याची सभा आयोजित केली गेली नव्हती. पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवा पायंडा पाडला आहे.

दोन प्रदेशांमध्ये प्रचार रंगात

ड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभांमुळे निवडणूक प्रचार शिगेला

ड राहुल गांधी यांच्या अमेरिकेतील वादग्रस्त विधानांचा खरपूस समाचार

ड घराणेशाहीवरही हल्लाबोल, भाजपच्या विजयाचा व्यक्त केला विश्वास

ड मुहब्बतीच्या आवरणाखाली काँग्रेस चालवत आहे ’नफरत की दुकान’!

Advertisement
Tags :

.