For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजप आमदार मुनिरत्न यांना अटक

06:25 AM Sep 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
भाजप आमदार मुनिरत्न यांना अटक
Advertisement

कंत्राटदाराला धमकी, लाचेची मागणी, जात अवमाननेचा आरोप : बेंगळुरात दोन एफआयआर दाखल

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

बेंगळूरमधील कंत्राटदार चेलुवराजू यांनी शुक्रवारी भाजप आमदार मुनिरत्न नायडू यांच्यावर जीवे मारण्याची धमकी, लाच देण्याची मागणी आणि जात अवमानना केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात एफआयआर दाखल झाल्यानंतर फरार होण्याच्या प्रयत्नात असताना मुनिरत्न यांना पोलिसांनी कोलार जिल्ह्याच्या मुळबागिल तालुक्यातील नंगली येथे अटक केली. त्यामुळे मुनिरत्न यांच्या अडचणीत भर पडली आहे.

Advertisement

घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे कंत्राट देण्याकरिता 30 लाख रुपयांची लाच मागत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बेंगळूरच्या राजराजेश्वरीनगरचे आमदार मुनिरत्न यांच्यासह चौघांविरुद्ध कंत्राटदार चेलुवराजू यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार शनिवारी मुनिरत्न यांच्याविरुद्ध बेंगळूरच्या वय्यालिकावल पोलीस स्थानकात दोन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. धमकावल्याप्रकरणी एक आणि वेलू नायक यांनी दाखल केलेल्या जात अवमाननेच्या तक्रारीवरून मुनिरत्न यांच्याविरुद्ध दुसरा एफआयआर दाखल करण्यात आला. चेलुवराजू यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे मुनिरत्न, त्यांचे निकटवर्तीय अभिषेक, वसंतकुमार आणि अधिकारी विजयकुमार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एफआयआर दाखल होताच मुनिरत्न शनिवारी दुपारपासून अज्ञातस्थळी होते. मुनिरत्न हे आंध्रप्रदेशला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. कोलारहून आंध्रप्रदेशच्या चित्तूर येथे जात असताना मोबाईल लोकेशनच्या आधारे मुळबागील तालुक्यातील नंगली येथे त्यांना अडवून ताब्यात घेण्यात आले. कर्नाटक-आंध्रप्रदेश सीमेवर ही कारवाई करण्यात आली. कोलार पोलिसांनी रात्री त्यांना बेंगळूरला आणून बेंगळूर पोलिसांकडे हस्तांतर केले.

भाजपच्या शिस्तपालन समितीकडून नोटीस

लाच, धमकी आणि जात अवमाननेप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या बेंगळूरच्या राजराजेश्वरीनगर मतदारसंघाचे भाजप आमदार मुनिरत्न यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राज्य भाजपच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष लिंगराज पाटील यांनी त्यांना आरोपासंबंधी स्पष्टीकरण देण्याची सूचना केली आहे. मुनिरत्न यांनी कंत्राटदाराशी फोनवर संभाषण करताना अवमान केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ही बाब पक्षाच्या शिस्तीचे उल्लंघन करणार आहे. त्यामुळे नोटीस पोहोचल्यानंतर पाच दिवसांच्या आत शिस्तपालन समितीसमोर हजर राहून स्पष्टीकरण द्यावे, अशी सूचना त्यांना देण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या कंत्राटासंबंधी आमदार मुनिरत्न आणि त्यांचे निकटवर्तीय वसंतकुमार यांनी आपल्याकडे 30 लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास रेणुकास्वामीसारखी वेळ येईल, अशी धमकी दिल्याचा आरोप बेंगळूर महापालिकेतील कंत्राटदार चेलुवराजू यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली होती. शिवाय त्यांनी मुनिरत्न यांच्याशी संभाषण केलेली ध्वनिफितही उघड केली होती. या प्रकरणासंबंधी चेलुवराजू यांनी आणि अनुसूचित जमातीतील एका नेत्याने जात अवमानना प्रकरणी तक्रार दाखल केली होती.

Advertisement
Tags :

.