कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हरवळेत पुन्हा वाद होणार नाही

11:54 AM Apr 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दोन्ही गटांच्या बैठकीत दोघांचीही ग्वाही : उपजिल्हाधिकारी रमेश गावकर यांचे यश 

Advertisement

डिचोली : हरवळे येथील श्री रूद्रेश्वर मंदिरात गेल्या महाशिवरात्रीला आणि 7 एप्रिल रोजीच्या मासिक पालखी सोहळ्यावेळी श्री रूद्रेश्वर देवस्थान आणि वरचे हरवळे येथील श्री सातेरी देवस्थान समिती यांच्यात झालेला वाद मिटविण्यात डिचोलीचे उपजिल्हाधिकारी रमेश गावकर यांना यश आले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली श्री रूद्रेश्वर देवस्थान समिती व सातेरी देवस्थान समिती यांच्यातील बैठकीत अखेर हा विषय समोपचाराने मिटल्याचे दोन्ही गटाकडून पत्रकार परिषद घेऊन जाहीर करण्यात आले. मासिक पालखीवेळी निर्माण झालेला वाद व गोंधळ या विषयांवर उपजिल्हाधिकारी रमेश गावकर यांनी काल बुधवारी संयुक्त बैठक घेतली. त्यात रूद्रेश्वर मंदिराच्या सण उत्सवांमध्ये सातेरकर गटाला असलेले पारंपरिक हक्क मिळणार आहेत. तसेच देवस्थान समिती त्यांचे कार्य करणार आहे, असे ठरले आहे. या बैठकीत सर्व काही प्रकरणे मिटली असून यापुढे रूद्रेश्वर देवस्थान समितीबरोबर कोणत्याही प्रकारचा वाद होणार नाही, अशी ग्वाही दिलेली आहे, असे गितेश मळीक यांनी सांगितले.

Advertisement

मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा नाहीच : मळीक

या प्रकरणात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा सातेरकर गटाला पाठिंबा असल्याचा दावा फोल असल्याचे आम्ही यापूर्वीच पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री डॉ. सावंत किंवा खासदार श्रीपाद नाईक यांचा कोणताही पाठिंबा नसल्याचे आम्ही पुन्हा सांगत आहोत, असेही गितेश मळीक यांनी स्पष्ट केले. यावेळी श्री सातेरी देवस्थानचे उपाध्यक्ष प्रकाश मळीक, सचिव लक्ष्मण मळीक यांची उपस्थिती होती.

उत्कृष्ट तोडगा निघालाय : माडकर

याप्रकरणी रूद्रेश्वर देवस्थान समितीतर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देवस्थान समितीचे अध्यक्ष यशवंत माडकर यांनी सांगितले की बैठकीचा इतिवृतांत तयार करण्यात आलेला आहे. बैठकीत वरचे हरवळे येथील सातेरकर गटाने उपजिल्हाधिकाऱ्यांसमोर यापुढे या मंदिरातील उत्सवांमध्ये कोणताही वाद किंवा गोंधळ न घालण्याचे मान्य केले आहे. देवस्थानच्या उत्सवांमध्ये धार्मिक पध्दतीने जे काही त्यांचे कार्य आहे ते करणार आहोत. तसेच मासिक पालखी ही रूद्रेश्वर समिती, महाजनांची आहे. त्यावर आपला कोणताही हक्क नसल्याचे त्यांनी खास करून नमूद केले आहे. त्यांना मंदिरात येऊन दर्शन घेण्यात काहीच हरकत नाही. उपजिल्हाधिकारी रमेश गावकर यांनी घेतलेल्या आजच्या बैठकीत उत्कष्टरित्या तोडगा निघालेला आहे, असेही माडकर म्हणाले.

तोडग्याचा विषय सर्वांपर्यंत जावा : किनळकर

हा विषय केवळ हरवळे व साखळी पुरताच मर्यादित राहिलेला नाही. याविषयी संपूर्ण गोवाभरातील भंडारी समाजातील लोकांना आम्ही हाक दिली होती. त्यानुसार गोवाभरातील लोकांनी पालखीला उपस्थिती लावली होती. त्यांच्यापर्यंत हा तोडग्याचा विषय पोहोचविणे आमचे कर्तव्य आहे, असे रूद्रेश्वर देवस्थान समितीचे सचिव सुभाष किनळकर यांनी सांगितले.

भंडारी समाजाचे काम पुढे नेणारच

हा विषय सामंजस्याने मिटवला असला तरी भंडारी समाज म्हणून आम्ही जो काही समाजाला एकत्रित आणण्याचा संकल्प केला आहे, तो निवडणुकीनंतर पुढे नेणार आहोत. सर्व भंडारी समाजातील लोकांना संघटीत करणारच आहोत. आमच्या आराध्य दैवताबाबत जागृती करायची आहे. त्यासाठी सर्वांसमोर जाणार व हा विषय पुन्हा मांडणार आहे, असेही सुभाष किनळकर पुढे म्हणाले.

देवस्थान व राजकारण वेगळे विषय

सध्या निवडणूक काळ असल्याने राजकारण तापले आहे. सध्याच्या राजकारणाला आमच्या देवस्थानच्या व्यासपीठावर स्थान नाही. देवस्थान व राजकारण हे दोन्ही वेगळे विषय आहेत. त्यामुळे या विषयाचा संदर्भ घेऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, खासदार श्रीपाद नाईक यांच्याबाबत काहीही बोलू नये. या बैठकीत झालेला विषय आमच्या समाजातील सर्व नेते, वकील, लोकांसमोर मांडणार आणि त्यानंतर यावर एक संयुक्तपणे पत्रकार परिषद घेऊन विषय कथन केला जाणार आहे, असे रूद्रेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष यशवंत माडकर यांनी सांगितले.

 श्रीपाद नाईकांवरील वक्तव्य वैयक्तिक : माडकर

या प्रकरणांमध्ये मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचा कोणताही सहभाग नाही. सातेरकर गटातील लोकांवर कारवाई होत नसल्याने सर्वांनाच त्या लोकांना कोणत्यातरी बड्या राजकीय नेत्याचा पाठिंबा असल्याचे दिसून येत होते. परंतु आज हा विषय सर्वांसमोर उघड झाला असल्याने त्यात मुख्यमंत्री किंवा इतर कोणाचाही पाठिंबा नसल्याचे स्पष्ट झालेले आहे. खासदार श्रीपाद नाईक यांच्या विरोधात आपण केलेले वक्तव्य हे आपले वैयक्तिक आहे. नाईक हे आमच्या समाजाचे नेते, या देवस्थानचे महाजन आहेत. तरीही त्यांनी आम्हाला कोणताही आधार दिला नसल्याने आपण त्यांच्या विरोधात वैयक्तिकरित्या बोललो होतो, असेही स्पष्टीकरण यशवंत माडकर यांनी यावेळी केले.

मुख्यमंत्र्यांच्या नावाचा दावा ठरला फोल

उपजिल्हाधिकारी रमेश गावकर यांनी घेतलेल्या या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा होऊन सर्व परिस्थिती दोन्ही गटांच्या समोर उघड झाल्या. याविषयी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे नाव गोवण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांचा सातेरकर गटाला पाठिंबा असल्याचा आरोप झाला होता. परंतु आजच्या बैठकीत झालेल्या तोडग्यानंतर या प्रकरणात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा कोणताही सहभाग नसल्याचे दोन्ही गटांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article