दिल्लीत आतिशींच्या हस्ते होणार नाही ध्वजारोहण
दिल्ली सामान्य प्रशासन विभागाचा आक्षेप
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीत मुख्यमंत्री विरुद्ध उपराज्यपाल या संघर्षात आणखी एक अध्याय जोडला जाणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या तुरुंगात असल्याने स्वातंत्र्यदिनी कुणाच्या हस्ते ध्वजारोहण करायचे हा प्रश्न उभा ठाकला आहे. केजरीवालांनी तुरुंगातून पत्र लिहून उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांना आपल्या अनुपस्थितीत आतिशी स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण करतील असे कळविले. प्रथम या पत्रावर तिहार तुरुंग प्रशासनानेच आक्षेप घेतला आणि आता दिल्लीच्या सामान्य प्रशासन विभागाने स्वत:चेच मंत्री गोपाल राय यांना पत्र लिहून ध्वजारोहणासंबंधी मंत्र्याचे निर्देश मानणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
आतिशी यांच्या हस्ते ध्वजारोहणाची तयारी करण्यास विभागाने नकार दिला ओ. याचदरम्यान जामिनावर तुरुंगातून बाहेर पडलेले आप नेते मनीष सिसोदिया यांनी ‘स्वातंत्र्य दिना’च्या मुद्द्यावरून होणारे राजकारण दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. दिल्लीचे सामान्य प्रशासन मंत्री गोपाल राय यांनी सोमवारी स्वत:च्या विभागाला स्वातंत्र्यदिनी आतिशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करविण्यासाठी तयारीचा निर्देश दिला होता. परंतु दिल्ली तुरुंग नियमाच्या अंतर्गत झालेला संपर्क योग्य नाही. या प्रकरणी आता वरिष्ठ स्तरावरून निर्णयाची प्रतीक्षा केली जात असल्याचे सामान्य प्रशासन विभागाने म्हटले आहे.
स्वातंत्र्यदिनी दिल्ली सरकारचा मुख्य सोहळा छत्रसाल स्टेडियममध्ये आयोजित केला जातो. या सोहळ्याला मुख्यमंत्री संबोधित करतात. अरविंद केजरीवाल हे सध्या तुरुंगात असून त्यांनी उपराज्यपालांना पत्र लिहून मंत्री आतिशी ध्वजारोहण करणार असल्याचे कळविले होते. तर तिहार तुरुंग अधिकाऱ्यांनी केजरीवालांना नियम अन् कायद्यांची आठवण करून दिली आहे. केजरीवालांनी पत्राद्वारे केलेली सूचना दिल्ली तुरुंग नियमांच्या अंतर्गत देण्यात आलेल्या विशेषाधिकारांचा गैरवापर असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
केजरीवाल हे तिहारच्या मध्यतर्वी तुरुंग क्रमांक 2 मध्ये कैद आहेत. तेथील अधीक्षकांनी दिल्ली तुरुंग नियम, 2018 चा दाखला देत केजरीवालांना बेकायदेशीर कृती टाळण्याचा सल्ला दिला आहे. अन्यथा त्यांच्या विशेषाधिकारात कपात करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. केजरीवालांनी लिहिलेले पत्र उपराज्यपालांना पाठविण्यात आले नसल्याचे अधीक्षकांनी स्पष्ट पेले. तुरुंगातून केजरीवाल केवळ स्वत:चे कुटुंबीय, मित्र किंवा स्वत:च्या प्रकरणाशी संबंधित लोकांनाच पत्र लिहू शकतात.