रामाच्या जबानीत मंत्र्यांचा उल्लेख नव्हताच
पोलिस अधीक्षक राहूल गुप्ता यांनी केले स्पष्ट : मंत्र्यांच्या नावाच्या उल्लेखाचा तपास करणार
पणजी : रामा काणकोणकर यांच्यावरील हल्ला प्रकरणाचा पोलिस कसून तपास करीत आहे. 2 ऑक्टोबर रोजी रामा काणकोणकर यांची जबानी नोंद करण्यात आली आहे, त्यात कुणाही राजकारण्याच्या नावाचा उल्लेख त्यांनी केलेला नाही. मात्र नंतर गोमेकॉतून डिस्चार्ज मिळाल्यावर काणकोणकर यांनी पत्रकारांशी बोलताना दोन मंत्र्यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. त्याबाबतही तपास केला जाईल असे पोलिस अधीक्षक राहूल गुप्ता यांनी सांगितले. रामा काणकोणकर आणि त्यांच्या कुटुंबियांना पोलिस सुरक्षा कायम ठेवण्यात आली असल्याचेही गुप्ता म्हणाले.
शनिवारी रामा काणकोणकर यांना डिस्चार्ज देण्यात आला तेव्हा त्यांना पत्रकारांनी गराडा घालून प्रश्नांचा भडीमार केला होता. तेव्हा रामा काणकोणकर यांनी आपल्यावर झालेला हल्ला हा राजकीय षडयंत्र असून त्यात दोन मंत्र्यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला होता. तसेच पोलिस हल्ला प्रकरणात हलगर्जीपणा करीत असून आपला पोलिसांच्या कामावर विश्वास नसल्याचे सांगून पोलिस खात्यावर अविश्वास व्यक्त केला होता. काल रविवारी सकाळी पोलिस मुख्यालयाच्या सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पोलिस महासंचालक अलोक कुमार, उत्तर गोवा पोलिस अधीक्षक राहूल गुप्ता, पणजी उपविभागीय अधिकारी सुदेश नाईक, आणि पणजी पोलिसस्थानकाचे निरीक्षक विजयकुमार चोडणकर उपस्थित होते.
राहूल गुप्ता म्हणाले की, जबानी नोंद करणे आणि उलटतपासणी करणे यात मोठा फरक असतो. जबानी नोंद करताना पीडिताच्या मनात जे काय असेल किंवा काय वाटत असेल ते त्याने सांगायचे असते. पीडिताला पोलिस कोणताही प्रश्न करू शकत नाहीत. मात्र एखाद्या संशयिताची उलट तपासणी करताना पोलिस प्रश्न करतात आणि संशयिताकडून उत्तर काढून घेतात. त्यामुळे राजकीय व्यक्तीचा सहभाग आहे की नाही, असे विचारायचा प्रश्न येत नाही, असे राहूल गुप्ता म्हणाले.
रामांनी जबानी देणे नाकारले
हल्ला झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी रामा काणकोणकर पोलिसांना जबानी देऊ शकतात, असे डॉक्टरांनी सांगितले होते. त्यामुळे त्या दिवसापासून त्यांची जबानी नोंद करण्यासाठी पोलिस गोमेकॉत जात होते. मात्र त्यांनीच जबानी देणे नाकारले हेते.
रामांनी न्याय दंडाधिकाऱ्यांनाही दिला नकार
पोलिसांनी न्यायदंडाधिकाऱ्यांना कळविले होते. 22 सप्टेंबर रोजी न्यायदंडाधिकारीही गोमेकॉत गेले होते मात्र त्यांच्याशीही बोलणे त्यांनी टाळले होते. दरम्यान पोलिसांना तपास कामासंदर्भात जे काही करणे शक्य आहे ते पोलिसांनी केले आहे. हल्ला प्रकरणातील संशयित जेनिटो कार्दोझ याच्यासह सात संशयितांना अटक करून त्यांची सखोल उलटतपासणी करण्यात आली त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मारहाणीत वापरलेला केबल तसेच मारेकऱ्यांनी घटनास्थळावरून पळून जाण्यासाठी वापरलेल्या दुचाकी जप्त केल्या आहेत. 2 ऑक्टोबर रोजी रामा काणकोणकर यांची जबानी नोंद करण्यात आली असून पोलिस तपास करीत आहेत, असेही राहूल गुप्ता म्हणाले.
हल्ल्याच्याच दिवशी सुरु केला तपास
रामा काणकोणकर यांच्यावर 18 सप्टेंबर रोजी करंजाळे येथे हल्ला झाला होता. याबाबत त्याच दिवशी संध्याकाळी तक्रार नोंद करून पणजी पोलिसांनी संशयित अँथनी नादार, फ्रान्सिस नादार, मिंगेल आरावजो, मनीष हडफडकर, सुरेश नायक, फ्रांको डिकॉस्ता आणि साईराज गोवेकर या सात संशयितांना अटक केली होती. त्यानंतर अटक केलेल्या संशयितांमधील काही जणांच्या उलट तपासणीत मिळालेल्या माहितीनुसार 21 सप्टेंबर रोजी जेनिटो कार्दोझ याला अटक केली. 2 ऑक्टोबर रोजी रामा काणकोणकर यांची जबानी नोंद केली. मिंगेल आरावजो हा आपला पाठलाग करीत होता. तसेच हल्ला करताना हल्लेखोरांनी आपल्याला ‘गावडो’ आणि ‘राखणदार’ म्हटल्याचे त्यांनी जबानीत सांगितले आहे. याची दखल घेऊन पोलिसांनी तक्रारीत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (छळ प्रतिबंध) कायद्याखाली कलम जोडले आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपअधीक्षक सुदेश नायक यांच्याकडे देण्यात आला आहे. काणकोणकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिलेल्या माहितीची दखल घेऊन गरज पडल्यास काणकोणकर यांची जबानी परत घेतली जाईल. तसेच काणकोणकर न्यायदंडाधिकाऱ्यांसमोरही जबाब नोंद करु शकतात, असेही गुप्ता यांनी सांगितले.