विमानात नव्हता कोणताही यांत्रिक दोष
दुर्घटनेवर एअर इंडिया मुख्य अधिकाऱ्याचे वक्तव्य
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अहमदाबाद येथे 12 जूनला एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेसंबंधी या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विल्सन कँपबेल यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. विमानात कोणताही यांत्रिक दोष नव्हता, असे प्रतिपादन त्यांनी केले. हे प्रतिपादन या संदर्भात जो प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला आहे, त्याच्या आधारावर केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
दुर्घटनेचे कारण विमानांच्या इंजिनातील दोष किंवा त्यांच्या देखरेखीशी संबंधित नाही, हे या प्रकरणाच्या चौकशीच्या प्राथमिक अहवालातून स्पष्ट होत आहे, असे प्रतिपादन त्यांनी एअर इंडियाच्या काही निवडक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधताना सोमवारी केले. या दुर्घटनेत 260 जणांचा बळी गेला होता. विमान दुर्घटना अन्वेषण प्राधिकरणाकडून या दुर्घटनेची चौकशी केली जात आहे.
विमानचालकांचे स्वास्थ्यही उत्तम
विमानाच्या उ•ाणाआधी नियमाप्रमाणे दोन्ही चालकांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती. तसेच त्यांच्या उच्छ्वासाचेही परीक्षण करण्यात आले होते. त्यांचे शारीरिक स्वास्थ्य उत्तम होते, असे या परीक्षणांवरुन स्पष्ट होत आहे. प्राथमिक अन्वेषण अहवालातही त्यांच्या स्वास्थ्यासंबंधी कोणतेही नकारात्मक विधान करण्यात आलेले नाही. कंपनीच्या माध्यमातून सातत्याने प्रत्येक विमानाची वेळोवेळी तपासणी केली जाते. तसेच विमानाच्या यंत्रणेच्या कामगिरीवर दक्षतापूर्वक लक्ष ठेवले जाते. यासंबंधांमध्ये दुर्लक्ष केले जात नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले.
अहवालातील कारण
विमान दुर्घटना अन्वेषण प्राधिकरणाने या दुर्घटनेसंबंधात प्राथमिक अन्वेषण अहवाल सादर केला आहे. विमानाने उ•ाण केल्यानंतर त्वरित दोन्ही इंजिनांचे इंधन स्वीच एका सेकंदाच्या अंतरात बंद झाले. त्यामुळे कॉकपिटमध्ये गोंधळ निर्माण झाला. तू स्वीच बंद का केलास असे एका चालकाने दुसऱ्या चालकाला विचारले. मी स्वीच बंद केला नाही, असे उत्तर पहिल्या चालकाने दिले. ही माहिती विमानाच्या व्हॉईस डाटा रेकॉर्डर किंवा ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून समोर आली आहे. त्यामुळे दुर्घटना नेमकी कोणत्या कारणास्तव घडली, यासंबंधी बरेच प्रश्न निर्माण झाले आहेत. या 15 पृष्ठांच्या प्राथमिक अहवालात स्वीच बंद कसे झाले, यासंबंधी कोणतीही कारणमीमांसा करण्यात आलेली नाही, असे दिसून येत आहे.
घाईघाईने निष्कर्ष नको
केवळ प्राथमिक अहवालावरून या दुर्घटनेच्या कारणांसंबंधी कोणताही निष्कर्ष कोणीही घाईगडबडीने काढू नये. तसेच यासंबंधी अपप्रचारही करू नये, असे आवाहन एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विल्सन कँपबेल यांनी केले आहे. तसेच नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांनीही अशाच प्रकारचे आवाहन केले आहे. ही दुर्घटना असून घातपात आहे, अशा प्रकारची चर्चा सध्या सोशल मिडियावरून केली जात आहे. विमान चालकांच्या प्रसिद्ध झालेल्या संवादातूनही अनेक अर्थ काढले जात आहेत. तथापि, जोपर्यंत अन्वेषणाचा अंतिम अहवाल हाती येत नाही, तोपर्यंत सर्वांनी संयम बाळगावा. अन्यथा, समाजात मोठा गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. काही विदेशी प्रसारमाध्यमांनीही या दुर्घटनेसंबंधात अपप्रचार चालविला आहे. सर्व संबंधितांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे प्रतिपादन केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनीही अनेकदा केले आहे.
अंतिम अहवाल लवकरच
या विमान दुर्घटनेच्या अन्वेषणाचा अंतिम अहवाल येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये सादर केला जाऊ शकतो, अशी माहिती देण्यात आली आहे. या दुर्घटनेच्या विविध पैलूंवर साकल्याने विचार आणि अभ्यास करून अंतिम अहवाल देण्यात येईल. या अहवालात जी कारणे दिली जातील, तीच अंतिम असतील.